माझी भटकंती भीमाशंकर अभयारण्य क्र.८०








     🌳🍀☘️🌳🍀☘️🌳🍀
        माझी भटकंती
   क्रमशः भाग--८०
दिनांक १८ फेब्रुवारी २०२०

 🍁भीमाशंकरअभयारण्य🍁
 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
      सकाळी लवकर उठून भटकंतीला भीमाशंकर अभयारण्यात साडेसहाच्या दरम्यान निघालो. मंदिरा शेजारील वन्यजीव विभाग भीमाशंकर अभयारण्याकडे जाताना वाटेत ओपन जीमची काही खेळणी होती.त्यावर काहीजण व्यायाम करीत होते.प्रवेशद्वारातून आत मध्ये गेलो.'निसर्ग परिचय महादेव वन 'या नावाने हा परिसर ओळखला जातो.जवळच मुंबई पॉईंट आहे.तेथून समोरील विहंगम दृश्य नजरेस पडते.काही ठिकाणी झाडाखाली बसून गप्पा मारायला किंवा विरुंगळ्या साठी बाके ठेवलेली आहेत.
सकाळच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत उंचच उंच झाडीतून पुढे पुढे निघालो होतो.सूर्यनारायणाचालालबुंद तांबूस आकार नजरेत भरत होता.आज अरुणोदय जंगलात बघायला मिळाला. चराचराला ऊर्जा, चेतना आणि प्रकाश द्यायला सज्ज झाला.. मनोभावे नमस्कार केला..त्यांचे विलोभनीय दृश्य चित्रबद्ध केले.
   महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दुर्मिळ प्राणी शेकरू खार इथं आढळते.हे जंगल औषधी वनस्पतींचे माहेरघर आहे.
वन्यजीवांचे अधिवासामुळे हे राखीव जंगल आहे.वाटेतच निसर्ग पर्यटन केंद्र महादेव वन नावाची वास्तू दिसते.ती बंद होती.लोखंडी कमानीवर शेकरु खारीचे चित्र व शिल्प नजर वेधून घेते..परिसराची मनसोक्त फोटोग्राफी सुरू होती...दाट झाडीतल्या वाटेने सीताराम बाबा आश्रमाकडे निघालो.तेव्हा स्थानिक गुरांचा एक कळप जंगलात निघाला होता.थोड्या वेळाने आश्रमाजवळ येताच झाडावरील माकडांची छोटी छोटी पिल्लं फांद्यावरुन उड्या मारत  खाली यायची ,
काही तरी खायला मिळेल या आशेने आमच्याकडे बघत होती.थोडावेळ आश्रमा जवळील एका लाकडाच्या खोडावर बसलो.बाकीचे दगडावर बसले.मस्तपैकी एकमेकांचे फोटो काढले..दोन मंदिरे होती.त्या समोर बांधीव तलाव होता.तलावात एक-दोन ठिकाणी मुर्ती होत्या.कमलपुष्प आकाराचे कारंजे होते.एका बाजूला आश्रमाची इमारत होती. मंदिरात पूजा व मंत्र पठण सुरू असल्याचा आवाजकानी येत होता. थोड्यावेळाने एक साधू बाहेर आले.त्यांना नमस्कार करून नागफणीची वाट विचारली,त्याने  तुमच्या मागील पायवाटेने जावा ,असं सांगितलं.मग आम्हीनागफणी बघायला निघालो..अरुंद वाट होती.एका बाजूला ओढा तर दुसरीकडे झाडी  होती.. झाडांच्या मधून जाणारी लाल पिवळ्या वाटेने  चढत वरवर निघालो...पुढे गेल्यावर एक मंदिर दिसले.तिथून दगडांना पकडत पकडत वर आलो..
घसरटी वाट होती...वर आल्यावर झाडं विरळ होती.एक छोटेखानी पठार दिसत होते.गवत वाळून गेले होते.पाठीमागे भीमाशंकर मंदिर व गाव नजरेसमोर येत होते.वरुन छानच दृश्य सकाळच्या प्रहरी दिसत होते. कातळी चढण्याच्या वाटेने  वर आल्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या.तसेच वर येऊन कड्याकडे गेलो..
वाऱ्याचा वेग सुसाट जाणवत होता.. आवाज ऐकू येत होता.. थंडगार वाटायला लागले.कड्यातून कोकण परिसराचे दृश्य पाहून मन मोहरले.सुंदर रमणीय दृश्य.
मस्तपैकी फोटोग्राफी केली.. अभयारण्यातील सर्वात उंच भाग होता.कोकणातून हा भाग नागाच्या फणीसारखा दिसतो म्हणून याला " नागफणी " म्हणतात.. थोडावेळ विसावा घेताना आम्ही आलो त्याच रस्त्याने चौघेजण नागफणीकडे  येताना दिसले.साधूंच्या वेषात होते.आल्यावर इधर क्या है ❓आप क्या देखते हो❓असे विचारु लागले..आप कहासे आयो हो❓हिंदीतच  विचारले.ते कलकत्त्यावरुन ज्योतिर्लिंग यात्रेसाठी आले होते.जंगल बघत बघत आलो,असे ते म्हणाले.मग हिंदीत त्यांना या स्थळाची माहिती  सांगितली.अगोदर मला वाटले आश्रमातील असतील.आपण इथल्या जंगलाची ओळख करून घेऊ या, पण झालं भलतंच...
       त्याच वाटेने सावकाश उतरत उतरत माघारी फिरलो. वाटेतील काही झाडांना पैसे ठोकलेले दिसले.एका खाली आलेल्या झाडाच्या फांदीस धरुन झोके घेतले..मस्तच वाटले..त्या साधूंबरोबर खाली  उतरताना एक फोटो काढला.
तेवढीच आठवण.फिरताना शेकरु खार पहायला मिळाली नाही याचीही  खंत वाटली.
जंगल व भीमाशंकर मंदिर प्रवेशद्वाराजवळ फोटो काढले.मंदिरपरिसरात  औषधी वनस्पतींची  दुकाने आढळली.
    मस्तपैकी अमृततुल्य चहा घेतला..चहावाल्याला कोकण कडा पहायला कसं जायचं.तो म्हणाला ,'स्टॅंण्डच्यापाठीमागे.मग आम्ही स्टॅडवरआलो.तिथं फरशी बसवण्याचं काम सुरू होते.पश्चिमेकडे डोंगर पठारावरुन समोरील कोकण परिसराचे विहंगम दृश्य नजरेस पडले.हॉटेलवर येऊन स्नान उरकले. सकाळच्या फिरण्याने उत्साही ऊर्जा मिळाली होती.नाष्टा करायला बाहेर पडलो.. रात्रीच्याच हॉटेलमध्ये गेलो.मेनूकार्ड पाहून कुणाला काय पाहिजे ते सांगा,मी म्हणालो.मालक भेटले नमस्कार केला..सहज विचारले पोळी भाजी तयार आहे का? ते ,हो म्हणाले,मग तीन पोळी भाजी व एक  उपवासाचे द्या,अशी ऑडर दिली.बायकोचा उपवास होता.तीने राजगिरा लाडू व वेफर्स आणि आम्ही  मटकीचा रस्सा,गरमागरम लुसलुशीत चपाती आणि ताजा वाफाळलेला इंद्रायणी भात.घरच्या सारखं नाष्ट्या ऐवजी जेवण झाले..
भीमाशंकर मधून घोडेगाव मार्गे शिवनेरी किल्ल्याकडे कूच केले...
ओम् नमो शिवाय........
➖➖➖➖➖➖➖➖
क्रमशः भाग--८०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com


Comments

  1. मस्त फिरायला सकाळी मिळाले।।।

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड