माझी भटकंती कणेरीमठ क्रमशःभाग क्र.१०१








☘️🛕☘️🛕☘️🛕☘️🛕
माझी भटकंती
     क्रमशः भाग- १०१
    🥀कणेरी मठ 🥀
प्रवास दिनांक २९ मे २०१८
➖➖➖➖➖➖➖
     ग्रामीण संस्कृतीचे यथार्थ दर्शन
   उन्हाळी सुट्टीत गोवा आणि कोकणात फिरायला सपत्नीक जायचं आम्हा मित्रांचे पक्के झाले.२९ मे रोजी  सकाळी लवकर वाईतून निघालो. कोल्हापूर येथील कणेरी मठातील सिध्दगिरी ग्रामजीवन संग्रहालय पाहून आजरा चंदगड आंबोली करत गोव्याला जायचे आहे. ,असं तुषारला सांगितले.गाडी आणि ड्रायव्हर नेहमीचा होता त्यामुळं निःशंकपणे  प्रवास रमतगमत सुरु होता.पेठनाका येथील उडपी हाॅटेलमध्ये दाक्षिणात्य मेनूचा हेवी नाष्टा आणि चहापान केला.मग पुढे मार्गस्थ झालो.बायपासला कोल्हापूर  नाका आल्यावर पुढे हायवेला १२ किमी कणेरी मठ अशी पाटी बघून गाडीने हायवे रस्ता सोडला. दहाएक मिनीटात आम्ही कणेरी मठाच्या प्रवेशद्वाराजवळ आलो.सगळे खाली उतरलो आणि गाडी पार्किंग मध्ये लावली.रस्त्याच्या  दुतर्फा नवलाईची दृश्ये बघत बघत निघालो.अतिभव्य स्वरुपात हे संग्रहालयआहे.जातानाच आकर्षक कमान, भारदस्त गजराज व नंदी  शिल्पाने  आमचे लक्ष वेधले.आपण प्रथम संग्रहालय पाहूया अशी सूचना करुन तडक  तिकिट खिडकीकडे निघालो.
     वाटेत जाताना खाद्याचे आणि इतरही स्टॉल्स नजरेत भरत होते.
तिकिट खिडकीजवळील पोतराज शिल्प बघून आम्ही भारावलो.
खरोखरच जीवंत माणसच पोतराजाचा खेळ करुन दाखवत आहे.
 अप्रतिम शिल्पासमोर सर्वांचा समूह फोटो घेतला.ग्राम जीवनातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडविणारे हे स्थळ .
ग्रामीण जीवनाची व संस्कृतीची जपणूक,ओळख आणि संवर्धनासाठी सिध्दगिरी मठ आणि संग्रहालय आहे.अभेपुरी शाळेची सन २०१२ मध्ये सहल घेऊन आल्याची आठवण इतरांशी शेअर केली.तिकीट काढून संग्रहालय बघायला निघालो.
      आमचा प्रथम अंधाऱ्या गुहेत आमचा प्रवेश झाला.प्राचीन काळातील ऋषीमुनींचे हे प्रदर्शनिय दालन होते.अंधाऱ्या गुहेत मंद प्रकाशात आपणास प्रसंग शिल्पे पहायला मिळतात.प्रत्येक ऋषींची स्वतंत्र ओळख होते.त्यांचे नांव,विद्या आणि योगदान याची माहिती मिळते.ही शिल्पचित्रे अस्सल आणि हुबेहूब वाटतात.त्यांचे डोळे बोलके दिसतात.चेहऱ्यावरील भावना दिसते.ऋषींचे योगदान प्रसंग शिल्पातील मुर्ती , साजेसे डेकोरेशन, आवश्यक प्रॉपर्टी आणि समर्पक शब्दवर्णाने आपली  नजर वेधून घेतात.बघताना आपले पाय खिळवून राहतात.भिंतीही कोरीव दगडकाम केल्यासारख्या दिसतात.हे दालन बघायला साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो.
                  तदनंतर आम्ही मोकळ्या जागेतील ग्रामीण जीवनातील मुख्य कणा शेतकरी राजा आणि पूरक व्यवसायिकांचे शिल्प बघायला आलो.शेतकरी आणि शिवारात कामं करताना माणसं बघितली की खरोखरच  त्यांच्यात जीवंतपणा जाणवतो.शिल्पातील मुर्ती आणि वस्तुंची अप्रतिम रंगसंगती, आखीव-रेखीवपणा आणि प्रसंगानुरूप रचना पाहून आपण आश्चर्याने थक्कच होतो.प्रशांत वाडकर ,फरांदे सर आणि आम्ही सगळेच जाम खुश झालो.बघत बघत फोटोग्राफीही सुरू होती.. लयभारी,मस्तच किती छान,सो नाईस सुंदर डेकोरशन अशा कितीतरी प्रतिक्रिया बघणाऱ्यांच्या ऐकायला येत होत्या.
       शेतातील पीकांची पेरणी ते मळणी अशा सगळ्या कामांची शिल्पे बहारदार दिसतात.पाणवठा, पारंपरिक खेळ ,पार आणि  शेती पूरक व्यवसायिक यांची शिल्पे बघताना खूपच आनंद होतो.विशेषतः शहरातील मुलांसाठी ही सफर आनंदा सोबत अस्सल गावातील जीवनाची प्रतिक व प्रतिकृती स्वरुपातील माहिती मिळते.इथले सगळ्यात बोलकं शिल्प म्हणजे" बैलगाडी आणि बैलं  "सुंदर साजाने सजलेली रुबाबदार बैलं आणि गाडी बघताना कुतूहल वाढते.सेल्फी आणि फोटोग्राफी करण्याचा मोह झाला नाही तर नवल वाटेल.आम्हीही छानपैकी फोटोग्राफी करुन तिथल्या आठवणी मोबाईल अन् मनात जतन केल्या.शिल्पे न्याहाळताना आपण भारावून गेल्यामुळे घुटमळतच बघत उभं राहतो इतकी सुबक आणि छान  आकर्षक सजलेली शिल्पे दिसतात.ही ग्रामशिल्पे आपणाला शेतकरी राजाची दैनंदिन कामाची आठवण करून देतात.
           तदनंतर आम्ही खेडेगावातील समाजजीवन  बुलुतेदार -अलुतेदार पहायला शिल्प ग्रामला निघालो.गावातील संस्कृतीची ओळख खऱ्या अर्थाने इथं होते.उदर- निर्वाहाच्या विनियोगासाठी लागणारा सरजाम कसा बलुतेदारी पध्दतीने मिळतो हे प्रत्यक्ष बघायला मिळाले.व्यवसाय कर्मी,त्यांचे कुटूंब, घरे, अंगण,राहणीमान, पेहराव, दागिने,त्यांचे दैवत आणि व्यवसायाची साधने यांचे इत्यंभूत दर्शन प्रत्येक शिल्पमुर्तीतून घडते.अप्रतिम ग्रामजीवन शिल्प आहे.
    तदनंतर आम्ही ग्रामजीवनातील विविध सण उत्सव समारंभ,बाजार,
यात्रा, रथ सोहळा इत्यादी शिल्पे म्हणजे संग्रहालयाची मानाचे  शिरपेच आहेत.अस्सलता, हुबेहुबपणा ,भावना ,कृती आणि बोलकेपणा दिसून येतो.सर्वत्र दिशादर्शक फलक आहेत.तसेच एकाच मार्गाने प्रवेश आहे.
तसेच तिथं प्रवेश शुल्क भरून हॉरर शो पहायला मिळतो.जवळच काडसिध्देश्वर मठ आहे.तिथं मोफत महाप्रसाद उपलब्ध असतो.आम्ही सहलीच्या वेळी सर्वांनी महाप्रसाद घेऊन तिथेच आमचे डबेही खाल्ले होते.
 कोरीव दगडकामातील मंदिरातील शिवपिंडीचे दर्शन घेतले.समोरील बागेत निवांतपणे विसावलो.मग हत्तीच्या शिल्पासमवेत विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली.सुंदर सुबक सजलेले हत्ती होते.आज प्राचीन काळातील ऋषी आणि ग्रामीण सामाजिक जीवनातील व्यवस्थेचे दर्शन झाले.कणेरी मठ अप्रतिम संग्रहालय पाहून आम्ही पुढील प्रवासाला निघालो.
सर्वच शिल्पे उत्तमोत्तम आहेत.सर्व ठिकाणांचे वर्णन एकाच लेखात होणे अशक्य आहे.तसेच काही स्थळांची माहिती रहाण्याची शक्यता वाटते.त्याबद्दल क्षमस्व....
भेटूया उद्या धार्मिक तीर्थक्षेत्री गोकर्ण महाबळेश्वरची भ्रमंती करायला तोपर्यंत नमस्कार....
क्रमशः भाग-१०१
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com







Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड