माझी भटकंती मैत्री टूर सूरत भाग क्र.८५
मैत्री टूर
क्रमशः भाग-८५
मैत्री टूर
क्रमशः भाग-८५
🛣️सूरत🚘
दुसरा दिवस
सन १९९७
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
पहाटं पहाटं आम्ही सुरतला पोहोचलो.एका गेस्टहाऊसला उतरलो.तिथं स्वतंत्र रुम उपलब्ध नसल्याने कॉमन रुममध्ये थांबलो.तिथं दोन-चार तास थांबण्याची सोय होती.तेथील स्वच्छता व स्नानगृहे बऱ्यापैकी होती.सर्वजण शुचिर्भूत झालो.आवराआवर केली.तदनंतर आम्ही आठच्या सुमारास बाहेर पडलो.एका हॉटेलमध्ये मस्त पैकी हेवी नाष्टा आणि चहापान केला. काहींनी एसटीडी बुथवरुन घरी संपर्क साधला.मी सोसायटीत व आमच्या शेजारी फोन लावला पण संवाद काय झाला नाही.एंगेज लागायचा.नंतर करुया म्हणून प्रयत्न सोडून दिला.
तदनंतर आम्ही होलसेल व्यापारी मार्केटकडे चौकशी करत करत निघालो...
बालपणी शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना ऐतिहासिक प्रसंग 'सुरतेची लूट' एवढीच या शहराची ओळख होती.तेव्हा या प्रसंगामुळे हे शहर भरपूर श्रीमंत असेल असं तेव्हा वाटायचं... "सूरत " त्याकाळातीलही व्यापारी केंद्र आजही भारतातील अग्रगण्य कापड उद्योग (कापड ते प्रॉडक्ट्स)आणि डायमंड उद्योगाचे माहेरघर आहे... आम्ही मार्केटजवळ आलो. गाडी पार्क करून मार्केट मध्ये निघालो.प्रशस्त आणि तिनमजली वास्तू होती.
ठिकठिकाणी पार्सलचे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू होते. ग्राहकांची ,कामगारांची आणि व्यापाऱ्यांची बऱ्यापैकी गर्दी दिसत होती.
प्रत्येकजण आपापल्या कामात दंग.आमच्यासारखे अनाहुत प्रवासी तुरळक असतील.हौस म्हणून होलसेल मार्केट बघायला आणि या शहराची आठवण भेट रहावी म्हणून साडी खरेदी करायला. साडी,
ड्रेसमटेरियल आणि रेडिमेड यांची कितीतरी स्वतंत्र छोटी-छोटीशी शोरुमवजा दालनं दिसत होती. ग्राहकांचे मनपसंद व नामांकित होलसेल मार्केट.दर्जेदार व सुप्रसिद्ध फॅक्टरींचे आउटलेटही बघायला मिळाले.एकच डिझाईन ,रंग आणि पोत असणाऱ्या अनेकविध साड्या.दुसऱ्या दुकानात वेगळीच डिझाईन रंग.पारंपरिक ते फॅशनेबल साड्यांचे अनेकविध प्रकार सुती,रेशमी,जरीकाम आणि फॅशनेबल यांचे स्वतंत्र विभाग.शोकेसमधून बघतानाच कोणती घ्यावी असा प्रश्न पडायचा.शोरुम्स पाहून मन हरखून जायचे . पहिल्या मजल्यावरील दुकानातील शोकेस मधील साड्या बघत बघत ,चौकशी करत करत दुसऱ्या मजल्यावर गेलो..तिथं एका-दोन साडी डेपोत गेलो..साडी पाहून किमती विचारल्या.साड्यांच्या पिशव्या आणि कव्हरही आकर्षक.तेथील शोरुम मध्ये नामवंत अभिनेत्रीचे त्या फॅक्टरीच्या प्राॅडक्टच्या जाहिरातीचे बोर्ड ठिकठिकाणी झळकत होते.' ग्राहकालाखरेदी करण्यासाठी एकाच प्रकारच्या व किंमतीच्या कमीतकमी पाच साड्या होलसेल रेटमध्ये मिळतील ,असं व्यापारी म्हणायचे.फिक्स रेट.मग पुढे चार-पाच दुकानात चौकशी करुन आपापसात चर्चा करून समूहाने दोघातिघांत १५० ते २०० रेंजच्या एकूण पन्नासएक साड्या खरेदी केल्या.त्यांची मागणीप्रमाणे रितसर विगतवारी करून.ओळखण्यासाठी पिशव्या वर नांवे टाकून.एकत्र गठ्ठे केले.गाडीत मागील साईडच्या सीटखाली अलगद बसले... घरच्यांसाठी स्वत:च्या पसंतीने घेतलेल्या साड्या पसंत पडतायत का नाही याची काळजी होतीच.पहिली ट्रीपमधील खरेदी कुटूंबासाठी केली.काहींनी इतर गरजेच्या कपड्यांची खरेदी केली....
मग आम्ही पुढील प्रवासाला निघालो .सूरत वरुन मुंबई-अहमदाबाद हायवेला आलो.चारपदरी रस्ता,प्रचंड वहानांची येताजाता गर्दी होती. त्यामुळे प्रवास सावकाश चालला होता.सिनेमा,क्रिकेट, राजकारण आणि शिक्षण यावर गप्पागोष्टी करत आमचा प्रवास सुरु होता...
भाग-क्रमशः
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment