माझी भटकंती अडालज वाव गांधीनगर क्रमशःभाग ९९









🍁❄️🍁❄️🍁❄️🍁❄️
माझी भटकंती

  क्रमशः भाग-९९
       
   🏝️ कलाकुसर वाव( विहीर)अडालज
🔆  साबरमती आश्रम:गांधी  स्मारक संग्रहालय अहमदाबाद💎
   दिनांक १९ ऑगस्ट  २०१८ व १२ डिसेंबर २०१८
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अहिंसेचे पूजारी.
           "वैष्णव जन तो तेने कहिए
        जो पीड पराई जाने रे " "माझे जीवन हाच माझा संदेश" जगाला देणारे राष्ट्र पिता महात्मा गांधी यांचा साबरमती नदीतीरावरील " गांधी आश्रम" स्वातंत्र्य चळवळीतील इतिहासाच्या घटनांचे केंद्रबिंदू असलेले राष्ट्रीय स्मारक पाहिले.दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी याच आश्रमात रहात होते.चरखा,सूत व ग्रामोद्योग द्वारे जनतेची आर्थिक स्थिती सुधारण्याची प्रयोगशाळा होती.असहकार, मीठाचा सत्याग्रह इत्यादी घटनांचा हा आश्रम प्रेरणास्थान आहे.त्यांच्या सार्वजनिक जीवनातील अनेक प्रसंगांचे  चित्ररुप,वस्तुरुप व आश्रम  रुपातील चिरंतर ठेवा पाहून त्यांच्या स्वातंत्र्यचळवतील कार्याचा उजाळा झाला. तेथील कुटीत चरख्या शेजारी बसून सूत कसे काततात याचे अवलोकन केले. पवित्र वास्तु शेजारी साबरमती नदीतीरावर " रिव्हर व्ह्यू पॉइंट" हे अलिकडे सुंदर प्रेक्षणिक पर्यटनस्थळ  झाले आहे.आश्रमापासून साबरमती नदी परिसराचे विलोभनीय दृश्य दिसते.शांत प्रवाहा सोबत फोटोग्राफीला उत्तम ठिकाण आहे.सन१९९७ साली बघितलेला गांधी आश्रम आणि साबरमती नदी परिसरात बराच बदल झालेला दिसून आला.जुन्या वास्तूचे सौंदर्य अबाधित ठेवून केलेले सुशोभीकरण नजर खिळवून ठेवते.
आश्रम पाहून आम्ही गांधीनगर कडे निघालो.प्रशस्त रस्ते दुतर्फा वृक्षांची सावली आखीवरेखीव गांधीनगर  शहर दिसते.तेथून आम्ही १० किमी अंतरावर अडालज या गावात आलो. तिथे युनोस्कोने घोषित केलेले जागतिक वारसा स्थळ  आहे.जगप्रसिद्ध विहीर  "राणीची वाव",
अद्भुतकलेची वाव (step well ). या नावाने प्रचलित आहे.
आपल्याकडील  विहीराला तिथं 'वाव' म्हणतात.ही अद्भुत वास्तूकलेची विहीर आहे.तिचे बांधकाम कलाकुसरयुक्त अष्टकोनी प्रकारात आहे.
पाचमजली  व खांबावर नक्षीकाम पाहून आपण मंत्रमुग्ध होतो. ते पाहताना सातारा जिल्हातील लिंब येथील बारामोटेच्या विहीरीची आठवण आली.लाल दगडातील बांधकाम शैली म्हणजे स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे. जगातील हौशी पर्यटक भारतीय कलेचे अप्रतिम कलाकुसरयुक्त  सौंदर्य पहायला आवर्जून भेट देतात. संपूर्ण बांधकामावर पशुपक्षी , विविध मूर्ती व इतर प्रकारची नक्षीकाम , वेलबुट्टी व आकार कोरलेले  आहेत.नक्षीकामाची उत्कृष्ट वास्तू बघून आनंदाला पारावार उरत नाही..नजर फिरवू तिकडं आपल्याला सुबक नक्षीकाम केलेले पहायला मिळते..सात टप्प्यातील पायऱ्या उतरून आपण आत जातो.
पायऱ्यावरही रेखाटन केलेले आहे.आतील  वातावरण थंडगार व आल्हाददायक आहे.आतमध्ये एक मंदिर आहे.राणीच्या विहीरीचे विहंगम दृश्य दिसते. विहीरीचे उत्तम डिझाईन बघायला मिळाल्याने खूपच अद्भुत वाटले.नजर खिळवून दृश्यमानी ठिकाण. दृश्य पहाताना विविध पोजमध्ये आणि पॉइंट्सवर सतत पर्यटक फोटोग्राफी करण्यात उत्साही असतात.
मोबाईल मध्ये वास्तूकलेची उत्तम दृश्ये कधी क्लिक करुन टिपतोय असं वाटतं. परिसरही  हिरवागार आहे.लॉन मुळे विरंगुळ्यासाठी उत्तम ठिकाण आहे. जवळच एक मंदिरही आहे.अप्रतिम मानवनिर्मित सौंदर्य स्थळ पाहून आनंद मिळाला.अविस्मरणीय ठिकाणअत्तराच्या कुपीत  जसं अत्तर जपून ठेवतात.तशी येथील नक्षीदार दृश्ये  स्मृतीत जपून ठेवावी वाटतात.
भेटूया उद्या नवतंत्राच्या आविष्कारातील दांडी कुटीर संग्रहालय बघायला.
तोपर्यंत नमस्कार...
क्रमशः भाग-९९

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com










Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड