माझी भटकंती शिवनेरी भाग क्र.८१
माझी भटकंती
🚩🍀🚩🍀🚩🍀🚩🍀🚩
माझी भटकंती
क्रमशः भाग--८१
दिनांक १८ फेब्रुवारी २०२०
🔆शिवनेरी किल्ला🔆
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
भीमाशंकर वरुन आम्ही घाटांचा रस्ता उतरत व डिंबे धरणाचा लुक पहात घोडेगाव मध्ये आलो.तिथंवाटेतच एका
थांबलेल्या दुचाकी स्वाराकडे शिवनेरीच्या रस्त्याची चौकशी केली आणि आर्वि मार्गे निघालो.आता रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार बागायती शेती दिसत होती.
भाजीपाल्याची शेती,द्राक्षांच्या बागा, फुलझाडे आणि ऊसाचे मळे दिसत होते. रस्ता ही प्रशस्त व चांगला होता. काहीवेळाने जुन्नर शहरात आलो. मुख्य चौकातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळील डावीकडील रस्त्याने निघालो..उजवीकडे शिवनेरी किल्ला भारदस्त रुपात दिसत होता..त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला भगवेध्वज,टोप्या व स्टीकर विक्री साठी ठेवलेले स्टॉल होते.. दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती.जुन्नरशहरात सगळीकडे रस्त्याच्या दुतर्फा पताका ,भगवेध्वज व फ्लेक्स दिसत होते.शिवजयंतीमय वातावरण दिसत होते.गाडी बाजूला थांबवून हर्षद व पप्पूने एक मोठा भगवा ध्वज आणून गाडी पुढे विराजमान केला..सरळ त्याच रस्त्याने शिवज्योती घेऊन शिवभक्त येत होते.काही शिवभक्त शिवज्योत आणायला जात होते.त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव व जय भवानी जय शिवाजी या घोषणांमुळे चेतना व उत्साह येऊन शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांना ऊर्जा मिळत होती.. गडाच्या पायथ्याशी उजवीकडे वळून अर्धा किमीवर गाडी बाजूला घेऊन पार्क करायला पोलिसांनी लावली. शिवज्योतीमुळे ट्रॅफिक जॅम होवू नये म्हणून गडापर्यंत नो पार्किंग झोन केला होता..भर उन्हात डांबरी सडकेने शिवनेरी किल्ल्याकडे आमची पायवारी निघाली.संपूर्ण चढणाचा रस्ता होता.
वडज धरणाचा जलाशय आणि डोंगर बघत बघत निघालो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आमची पोलिसांनी तपासणी केली. रजिस्टर मध्ये नोंदणी करुनच गडावर जायला परवानगी दिली.शिवनेरी किल्ला प्रथमच पहात होतो.तेथील पर्यटनाच्या बोर्डवरुन किल्ल्यावर अलिकडील काळात सुशोभीकरण केल्याचे दिसत होते.. जागोजागी पोलिस पथके व शिवभक्तांना शिवज्योत घेऊन जाताना शारीरिक त्रास झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथकही तातडीच्या उपचारासाठी दिमतीला दिसत होते.किल्ल्यावर शिवज्योत घेऊन येणारे जाणारे शिवभक्त दिसत होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषणेने त्यांच्यात अमाप उत्साह व चैतन्य सळसळत होते.
आदल्या दिवशीच गडावरील वातावरण शिवजयंतीमय झालेले दिसत होते.
ठिकठिकाणी स्वच्छता व साफसफाई सुरू होती.
पायऱ्यांच्या रस्त्याने आम्ही पहिल्या प्रवेशद्वारातून आत आलो.. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले..स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असणारा किल्ला.
🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवनेरी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची सुमारे ३५०० फुट आहे.
महादरवाज्यातून गडावर आलो.जागोजागी सात दरवाजे आहेत.त्यांच्या नावाचे बोर्डही लावलेले आहेत.
दरवाजाच्या वर जाण्यासाठी दगडी पायऱ्यांचे जिने आहेत.
त्यावरुनही किल्ल्याचा व इतर परिसर सुंदर दिसतो.. गडावरील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य अबाधित ठेवून मोकळ्या जागेचेसुशोभीकरण
अप्रतिम रचनेने केले होते.. जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय आहे.सुशोभित बागांना स्वराज्याच्या शिलेदारांची नावे दिली आहेत.जागोजागी झाडांची सावली असल्याने ऊन्हाच्या झळा जाणवत नव्हत्या..
विविध रंगांची फुलझाडे नजरेत भरत होती.पायऱ्या व दोन्ही बाजूला कठडे बांधलेले आहेत.पाचव्या दरवाज्यातून आत गेल्यावर आम्ही गडावरील शिवाई देवीच्या दर्शनाला गेलो.. छोटेखानी छान मंदिर आहे.मंदिरा शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्पचित्र बघितल्यावर इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकावरील मुखपृष्ठाची आठवण झाली..
तदनंतर पायऱ्या चढून पुढील दरवाजा कडे गेलो.
तिथल्या ढेलजेत थोडावेळ विसावा घेतला.सातव्या दरवाज्यातून आत गेल्यावर अंबरखान्याची पडझड झालेली इमारत दिसली.तेथून पुढं जाताना एका बाजूने प्रशस्त पायवाट आहे..तीचे वृक्ष संवर्धन करुन सुशोभीकरण केले आहे.
विविध प्राणी,पक्ष्यांची चित्रे लावलेली आहेत.तसेच पुढे शिवकुंजावर गेलो.तिथं उद्यान व इमारत आहे.स्वराज्य जननी जिजाऊ माता व बाल शिवाजींची प्रतिमा आहे.. तिथल्या मैदानावर उद्याच्या शिवजयंती सोहळ्याची तयारी सुरू होती.गडावर ठिकठिकाणी पाण्याची टाकी आहेत.कमानी मशिद पाहून वेगळाच मशिदीचा प्रकार समजला.बघायला मिळाला.
गडावरील सर्वात महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक वास्तू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान.तिथं आदराने अभिवादन व त्रिवार वंदन करून दुमजली वास्तूचे दर्शन घेतले. पायऱ्या चढून आत मध्ये गेलो.तेथील कमानी खिडकीतून शहराचे दृश्य नजरेस पडते. छानच नयनरम्य दृश्य पाहिले.
शिवजयंतीच्या पूर्व दिवसाला ऐतिहासिक वास्तूचे दर्शन झाल्याने समाधान लाभले.
सहलीतील मुलांच्या घोषणांचा आवेश पाहून त्यांनाही साथ केली.. छत्रपती शिवाजी महाराज की जय, ऽऽऽ,हर हर महादेव,जय जय जय जय शिवाजी,जय जय जय भवानी, जिजाऊ माता की जय....अशा घोषणा निनादत होत्या.घोषणे बरोबर भगवे ध्वजही मुले गगनी फडकवित होते.शिक्षकमित्र मुलांना या किल्ल्यावरील शिवजन्मोत्सवाची कथा वीर रसात ओघवत्या शैलीतसांगत होते. ते ऐकताना आणि बघताना अंगावर रोमांच उभे राहिले.
छानपैकी फोटोग्राफी केली. ऐतिहासिक वास्तूंचे चित्र डोळ्यात व मोबाईलवर साठविले. वास्तू बघताना शिवजयंतीचा ऐतिहासिक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहिला होता.पुनश्च एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करून पवित्र वास्तूस अभिवादन केले.. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की जयऽऽऽ
तेथून त्याच मार्गाने गडउतार झालो. किल्ल्याची डागडुजी व सुशोभीकरण अप्रतिम केलेले आहे.तेथून मग आम्ही ओझरला येऊन अष्टविनायक यात्रेतील श्री गणपतीचे दर्शन घेऊन नारायणगाव,खेड मंचर राजगुरुनगर व पुणे करत हायवेने वाईला आलो.एक अभयारण्य,तीन तिर्थक्षेत्र आणि दोन किल्ले अशी भ्रमंती दोन दिवस केली... सुंदर भटकंती सफल झाली.....
भेटूया उद्या धार्मिक तीर्थक्षेत्री तोपर्यंत नमस्कार.....🌹☘️🌹☘️🌹☘️🌹🌹☘️
क्रमशः भाग--८१
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment