माझी भटकंती मैत्री टूर उज्जैन क्रमशःभाग ९६
💫☘️💫☘️💫☘️💫☘️
माझी भटकंती
🚘मैत्री टूर🤝
क्रमशः भाग-९६
सन १९९७ दिवस सहावा
🛣️जयपूर ते उज्जैन
〰️➖〰️➖〰️➖〰️
आता जळगांवला अधिवेशनाला जायचं वेध लागले होते.जयपूर ते जळगाव हा ९०० किलोमीटरचा प्रवास होता.जळगावला मध्यप्रदेशातील उज्जैन ,इंदोर ,खांडवा मार्गे आम्ही जाणार होतो. दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही मार्गस्थ झालो.ड्रायव्हरला सांगितले ,'"आज जमेल तेवढे अंतर तोडायचे आहे.आठदहाएक तास प्रवास करुया ' उज्जैन पर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करुया.'' त्याने होकार दर्शविला. फक्त पुढं माझ्याशेजारी बोलका आणि जागसूद जोडीदार द्या, असं त्याने सुचवलं.जाधव सरांनी फरांदे सरांचे आणि पोतदार सरांचे नाव सुचविले.
सगळ्यांनी संमती दिलीआणिलॉगड्राईव्हला सुरुवातझाली. गप्पागोष्टी करत,गाणी ऐकत निघालो.रात्रीचे जेवण एका धाब्यावर केले.जेवणानंतर दोन एक तासांनी ड्रायव्हरला चहापाणी करत.प्रवास सुरू होता.
गाडीतल्या खिडकीच्या काचेतून किंवा समोरच्या काचेतून गावांच्या नावाचे बोर्ड आणि माईलस्टोन येणाऱ्याजाणाऱ्या वहानांच्या लाईटमध्ये दिसत.ते पाहून, चहापाणी केलेल्या धाब्यावर विचारत आम्ही वनस्थली, टोंग,देवली,बुंदी,तलेरा,कोटा,रामगंज मंडी,सोयत आणि आगर करत उज्जैनच्या अलिकडे मध्यरात्री पोहोचलो.पेट्रोलपंप बघून गाडी थांबवली आणि जागा बघून वळकटी अंथरली.विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला.
________&________________________________
सातवा दिवस
🛕उज्जैन 🛕
सहलीतल्या शिरस्त्याप्रमाणे सकाळी लवकर आवरून आणि चहापाणी उरकून पुढे निघालो.महाराष्ट्र-गुजरात-राजस्थान या राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देऊन मध्यप्रदेशात आलो होतो.मध्यप्रदेशातील , ऐतिहासिक,धार्मिक आणि पौराणिक तीर्थक्षेत्र उज्जैन बघायला निघालो..
मध्यप्रदेश राज्यातील क्षिप्रा नदीच्या किनारी वसलेले आहे. या शहराला ऐतिहासिक वारसा असून पूर्वी विक्रमादित्यच्या राज्याची राजधानी येथे होती. तसेच प्रख्यात महाकवी कालिदास यांची ही नगरी आहे.या शहराला मंदिरांचे शहर अशीही उपमा आहे.कारण शहरात अनेक प्राचीन, सुंदर आणि वैशिष्ट्यपूर्ण हिंदू मंदिरे आहेत.तसेच दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळ्यात जगभरातून भाविक येथे जमा होतात. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.चौकशी करत करत मंदिराजवळ आलो. मंदिर रुद्रसागर सरोवराच्या कडेला आहे स्वयंभू तीर्थक्षेत्र आहे.सभोवती रमणीय बाग आहे. ओम् नमः शिवाय ॐ, हर हर महादेव असा जयघोष करत मंदिरात प्रवेश केला.सकाळचं भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण होतं..महाकाल रुपी भगवान शंकराची विधिवत पूजा केली जाते.गर्दी कमी असल्याने लवकर दर्शन झाले. ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेऊन थोडावेळ शांतपणे मंदिरात ध्यानस्थ बसलो.अनामिक ऊर्जा मिळाली.प्रसादपुडा आणि मुलांना खेळणी घेतली .आणि इंदौरकडे प्रवास सुरू झाला.
भेटूया उद्या इंदौर शहराची महती घ्यायला, तोपर्यंत नमस्कार...
क्रमशः भाग-९६
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment