माझी भटकंती मैत्री टूर माऊंटआबू भाग क्र.८९



🌀🔆🌀🔆🌀🔆🌀🔆🌀
        माझी भटकंती
मैत्री टूर
क्रमशः भाग--८९
🏞️ माऊंट आबू
      सन १९९७
चौथा दिवस
 〰️🥀〰️🥀〰️🥀〰️🥀〰️
सकाळी सकाळी मस्तपैकी शॉवर बाथ घेतला. एकदम डोक्यावर फवारा उडाल्याने  जरा भंबेरी झाली. थंड पाण्याने अंग  शहारले,पण  वेगळाच अनुभव मिळाला.दरम्यान मित्रांची आवराआवर सुरू होती.सर्वांचे उरकल्यावर एका हॉटेलमध्ये नाष्टा व चहापान आटोपलं.जवळच्याच एसटीडी बुथमधून प्रत्येकाने घरी फोनवरून संपर्क साधून सहलीची माहिती कळवली.घरची खुशाली विचारली.आमच्या घरी फोन सुविधा नव्हती.त्यामुळे इतरांकडे फोन करावा लागे.आमच्या आळीतील श्री शामराव शिंदे यांच्या घरी फोन होता.ते आमच्या घरी दुधाचा रतिब घालायला सकाळी नऊच्या सुमारास येत असतं.त्यांना फोनवरून सांगितले की ते पमूदादाचा फोन आला होता.ते कुठल्या भागात आहेत ते सांगत.सगळ्यांचे फोनायन झाल्यावर लाॅजिंग चेक आउट केले. साहित्य कॅरेजवर बांधून  आम्ही माऊंट आबू शहरातील प्रमुख पर्यटनस्थळे पहायला निघालो.
       माऊंट आबू जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासून ३९३७ फूट उंचीवर आहे.जागतिक दर्जाचे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून लौकिक आहे.खजूराची झाडं,अरवली पर्वताच्या डोंगररांगांमध्ये प्राकृतिक तलाव आहे.तो "नकी झील" या नावाने प्रचलित आहे.. मौजमजा आणि आनंदानुभव घेण्याचे मनपसंद लोकेशन. हे शहर म्हणजे निसर्गाचा अनोखा आविष्कार ,निळेशार पाणी, सभोवताली डोंगररांगा,
नौकाविहार करणारे हौशी पर्यटक, खाऊच्या स्टाॅलची रेलचेल, राजस्थानी प्रसिद्ध वस्तूंची छोटीछोटी दुकाने, मुलांसाठी खेळणी.जणूकाही एखाद्या गावचा मेला(जत्रा) भरल्यासारखी गर्दी दिसत होती.आणखी खासियत म्हणजे प्रादेशिक पेहरावात फोटाशूट करणे. नवीन प्रकार बघायला मिळाला.पगडी, मलमली शेरवानी व हातात तलवार घेऊन फोटोग्राफी.
महिलाही प्रादेशिक पेहराव करून फोटोग्राफी करत होत्या.जोडींची फोटोग्राफी कॅमेरामन विविध पोजमध्ये क्लिक करून लगेच फोटोप्रिंट  मिळायची.त्याचे कुतूहल वाटायचे.हौशी पर्यटक तिथं आकर्षित होऊन आवर्जून फोटोग्राफी करुन आठवण भेट घ्यायचे.आम्ही त्या फंदात न पडता फक्त अवलोकन केले...
    नकी झीलचा परिसर नजरेने आणि कॅमेऱ्याने टिपत टिपत आम्ही फिरत होतो. दुकानातील हरतऱ्हेच्या  वस्तु आणि किंमती विचारत पुढं जात होतो.एका जर्किन व स्वेटर स्टॉलवर विविध सॅम्पल बघून,अंगात घालून बघून ,इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मी एक स्वत:ला बिनाबाहीचे जर्किन व घरच्यांना स्वेटर  खरेदी केले..इतरांनी स्वेटर, जर्किन खरेदी केले.तदनंतर खेळण्याच्या दुकानावर मुलांसाठी बाज्या व बाहुली घेतली.तिथं कट्यार आणि गुप्तीचे विविध शोपीस नाविन्यपूर्ण व कल्पक होते...
   लगेचच नवीन जर्किन परिधान करून एका बागेत श्री दिलीप जाधव सरांबरोबर फोटो काढला.जर्किन घातल्यावर आॅर्केस्ट्रातील कलाकार दिसतोयस. निवेदक म्हणून छान दिसतोयस,अशी मित्रांची प्रतिक्रिया.
सगळ्यांची बऱ्यापैकी खरेदी झाल्यावर आम्ही जैन मंदिराच्या दिशेने निघालो.धर्म आणि स्थापत्य कलेचे अद्भुत वास्तू म्हणजे देलवाडा जैन मंदिर.संगमरवरावरील कलाकुसर वाखाणण्याजोगी आहे.बघतानाच आपण  आश्र्चर्यचकित होतो.इथं पाच मंदिरे वेगवेगळी आहेत.ती पाच जैन तीर्थंकरांना अर्पण केली आहेत.तदनंतर आम्ही आत्मा, परमात्मा यांचे आध्यात्मिक ज्ञान देणाऱ्या 'प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे मुख्य केंद्र पहायला आलो. प्रथमतः आम्ही तेथील प्रदर्शनिय गॅलरी पाहिली..आत्मा व परमात्मा याविषयी तेथील माताजींनी आम्हाला पंधरा-वीस मिनीटात या संस्थेच्या कार्याची ओळख करून दिली.
मानवकल्याणासाठी आध्यात्मिक ज्ञान.मनन, चिंतन आणि मनशांती अनुभवायला पवित्र धार्मिक स्थान.. तिथं ॐ या  अतिभव्य प्रतिकृतीजवळ फोटो काढले.. खूपच छान पर्यटन स्थळ आहे.
आणि पुढील पर्यटनस्थळी मार्गस्थ झालो.
क्रमशः भाग-८९
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema. blogspot.com




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड