माझी भटकंती मैत्री टूर चितोडगड राजस्थान भाग क्र.९२
चितोडगड
🥀☘️🥀☘️🥀☘️🥀☘️🥀☘️🥀☘️🥀☘️🥀☘️
माझी भटकंती
🚘मैत्री टूर🚘
क्रमशः भाग-९२
सन १९९७ पाचवा दिवस
🔆चितोडगड🔆
💫💫💫💫💫💫💫
उदयपूर ते चितोड हे अंतर अंदाजे शंभर ते एकशेवीस किलोमीटर असेल.प्रवासात एका हॉटेलमध्ये दुपारचे जेवण उरकून चितोडगडाकडे निघालो.पाचच्या दरम्यान आम्ही किल्ल्यावर पोहोचलो.सात दरवाजे ओलांडून किल्ल्यात प्रवेश केला..
राजपुतांच्या शौर्याचा, पतिव्रता महाराणी सौंदर्यवती पद्मिनी आणि राजपूत स्त्रियांच्या अस्सीम त्यागाचा (जोहार) प्रतिक असलेला साक्षीदार चितोडगड.. गड पाहतानाच प्रथम नतमस्तक झालो.अभिवादन केले.
तिथला इतिहास ऐकून मन सुन्न होते.अनेकदा या किल्ल्यावर आक्रमणं झालेली आहेत.
एका टेकडीवर वसलेला किल्ला आहे.भव्यदिव्य वास्तू नजर खिळवून ठेवते.जाताना वाटेत पराक्रमी सेनापतींची स्मारके(छत्री) दिसतात.
पराक्रमाची गाथा सांगणारा शिलालेखही आहे.
तळ्याकाठी महाराणी पद्मिनी महाल आहे.संत मीराबाईचे श्याममंदिर आहे.ही स्थळेही प्रेक्षणिय आहेत.
महाराणा प्रताप यांच्या शौर्य आणि पराक्रमाचा वैभवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा गडावरील अनेक वास्तू आणि वीरभूमी पहाताना धन्यता वाटते.
गडकोटातील विजयस्तंभ किर्तीस्तंभ बघताना तर मेवाड घराण्यातील महाराजे आणि महाराणा प्रताप यांच्या महापराक्रमाची आणि गौरवशाली जाज्वल्य देशभक्तीच्या इतिहासाची साक्ष देतात.ऐतिहासिक माहोल नजरेसमोर उभा राहतो.त्यातील प्रसंग डोळ्यांसमोर रुंजी घालतात..
राजस्थानात महाराणा प्रताप पूजनीय आणि वंदनीय राजे आहेत.राजे महाराणा प्रताप आपल्या छोट्याशा मेवाड राज्याच्या स्वातंत्र्या- साठी मूठभर फौजेसह लढत होते. त्यासाठी त्यांनीआपल्या
आरामदायी आणि विलासी जीवनाचा त्याग करून अकबराच्या बलाढय़ फौजेशी सामना करणारे वीर महाराणा प्रताप.महाराणा प्रताप ज्या किल्ल्यात जन्मले तो कुंभलगड किल्ला, ज्या किल्ल्यात त्यांचा सर्वाधिक काळ गेला तो चितोडगड आणि ज्याभागात अकबराची सेना आणि महाराणा प्रतापांची सेना यांचे युद्ध झाले ती हल्दीघाटी ही सर्व ठिकाणे उदयपूर पासून जवळच आहेत.महाराणा प्रताप यांची प्रेरणादायी इतिहासाची आठवण मनात साठवत गड उतार होऊन अजमेर पुष्कर कडे मार्गस्थ झालो.
अप्रतिम चितोडगड शौर्य आणि त्यागाचा प्रतिक.
〰️➖〰️➖〰️➖〰️
चितोडगड पासून अजमेर सुमारे २०० किलो- मीटर असावे.लांब अंतराचा पल्ला गाठायचा होता.रात्रीची सातसाडेसातची वेळ असेल.
आम्ही पुढे निघालो होतो. महाराणा प्रताप आणि चितोडगडच्या इतिहासात मन हरवलं होतं.सारखे तीच ठिकाणं डोळ्यासमोर येत होती.गाणी ऐकत , गप्पागोष्टी आणि हास्यविनोद करत प्रवास मजेत चाललेला होता.
सगळेच समवयस्क शिक्षकमित्र असल्याने आमचा छान ग्रुप झालेला होता.चर्चेत ,गप्पात आणि फोटोग्राफीत एकमेकांना सहकार्यकरायचे.उल्लेखनीय बाब म्हणजे पोतदार सर,नाळे सर, जाधव सर आणि पंडित सरांचा पर्यटनाचा अभ्यास चांगला होता.पुढचं प्लॅनिंग सर्वांशी संवाद करूनआखणी करत. दहाच्या सुमारास आम्ही एका धाब्यावर गाडी भोजनासाठी थांबवली.
सारखा गाडीत बसून कंटाळा यायचा,पाय अवघडायचे ,पण कुरकुर न करता सगळे अॅडजेस्ट करायचे. धाब्यावर काथ्याने विणलेल्या खाटेवर बसून छानपैकी बैठक मारुन जेवणाचा आस्वाद घेता येतो. सर्वांच्या पसंतीच्या नॉनव्हेज डीशची फर्माईश केली.
छानपैकी जेवण केलं. थोडावेळ तिथेच घुटमळत होतो. शतपावली केली.
गाडीचालकालाही दोन तासांचा निवांतपणा मिळाला.श्री संभाजी जाधव सरांच्या विश्र्वासातील चालक होता.मध्यंतरी दोन एक तासांची विश्रांती त्यास पुरेशी व्हायची.
तदनंतर आम्ही पुढे निघालो.बाराएक पर्यंत गाडी चालवून सुयोग्य जागा बघून पंपावर थांबून विश्रांतीच नियोजन होतं.त्याप्रमाणे लॉगड्राईव्ह नंतर आम्ही एका पेट्रोलपंपावर थांबून विश्रांती घेतली.शुभ रात्री. भेटूया उद्या अजमेर आणि पुष्करची भटकंती करायला......
💫🌱💫🌱💫🌱💫
क्रमशः भाग-९२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे ,वाई
https:// raviprema.blogspot.com
माझी भटकंती
सुंदर प्रवास वर्णन
ReplyDelete