माझी भटकंती गाणगापूर भाग १०७
⚡☘️⚡☘️⚡☘️⚡
माझी भटकंती
भाग क्रमांक १०७
धार्मिक तिर्थक्षेत्र सहल
सन २००० दुसरा दिवस
🛕गाणगापूर🛕
➖➖➖➖➖➖➖➖
पहाटेच्या भक्तीमय शांत वातावरणात मंदिरातील
आरतीचे सुर कानावर आल्याने जागं आली.सर्वांची आवराआवर सुरू झाली. जसंजसं आवरेल तसं ते मंदिरात देवदर्शनाला जात होते.सगळ्यांचे देवदर्शन झाल्यावर आम्ही गाणगापूरकडे निघालो.
खिडकीतून येणारी थंडगार हवा छान लागत होती.
अक्कलकोट पासून गाणगापूर दोन तासांचा प्रवेश होता. दत्त संप्रदायाचे पवित्र धार्मिक स्थळ म्हणून गाणगापूरचा लौकिक आहे.आम्ही साडेआठ
नऊच्या सुमारास गाणगापूरला पोहचलो.नेमाडे दाजी म्हणाले, 'आपण प्रथम संगम बघायला जावू आणि मग मठात जाऊया.'त्याप्रमाणे संगमावर आलो.भीमा आणि अमरजा या दोन नंद्यांच्या संगमावरील पवित्र ठिकाण.
तिथं जाऊन हातपाय स्वच्छ धुतले आणि निर्गून पादुका मठात आलो.श्री दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली पवित्र भूमी.इथं निर्गुण मठ, संगमेश्वर मंदिर,औंदुंबर वृक्ष आणि कल्लेश्वर मुक्तीधाम आहे.इथं अष्टतीर्थे आहेत.
त्रिमुर्ती दत्ताची बैठक स्थितीतीलमुर्ती असून तिथंच श्री दत्तात्रेय गुरूंच्या निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत.
त्यांचे आम्ही दर्शन घेतले.
मनोभावे नमस्कार केला. एका हॉटेलमध्ये नाष्टा व चहापान केले.एसटीडी बुधवरुन प्रत्येकाने घरी अथवा शेजारी फोनवरून संपर्क केला.कुठं आहे याची माहिती दिली.तदनंतर आम्ही परत गाणगापूर निघालो.
येताजाता एकच रस्ता आणि तोही खड्ड्यांचा असल्याने गाडीचा वेग कमी होता.कोणता खड्डा चुकवून गाडी चालवावी असं दाजींना वाटत होतं.धुरळाही बराच उडायचा.त्यामुळं अधूनमधून खिडक्या बंद कराव्या लागायच्या.माग तर सारखी गाडी आदळायची आणि आमच्या भैयाची घाबरगुंडी उडायची.कधी चांगला रस्ता येतोय याची आतुरता लागली होती..एकदीडच्या सुमारास अक्कलकोटला पोहोचलो.
दाजींना गाडी अन्नछत्राकडे घ्यायला लावली.सगळे खाली उतरलो.चेहरे धुळीने माखले होते.तोंड,हातपाय स्वच्छ धुतले आणि आत बसलेल्या पंगतीत जाऊन जेवायला बसलो.सात्त्विक भोजन केले.छान आणि गरमगरम भोजन भुकेच्या तडाख्यात मिळाले.यथेच्छ जेवलो.मग दोन दिवस मोफत भोजनाची सोय झाली होती.त्यामुळे मदत करण्याची इच्छा महिलांनी व्यक्त केली.मग सर्वानुमते आमच्या सहलीच्या ग्रुपतर्फे श्री स्वामी समर्थ संस्थानला देणगी स्वरुपात मदत केली.आता सोलापूर मार्गाने तुळजापूर कडे प्रस्थान केले.हे अंतर अंदाजे ९० किलोमीटर असावे म्हणजे तीन तासांचा प्रवास करुन आम्ही तुळजापूरला पोहोचणार होतो.
जेवणानंतर प्रवास सुरू झाला होता.गाडीत महिलांच्या खाद्यसंस्कृतीच्या मेनूवर चाललेल्या गप्पा आम्ही ऐकत पुढं निघालो होतो.भेटूया उद्या धार्मिक तीर्थक्षेत्री तोपर्यंत नमस्कार
भाग क्रमांक १०७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment