माझी भटकंती तुळजापूर १०८
माझी भटकंती
भाग क्रमांक-१०८
धार्मिक तीर्थक्षेत्र सहल
सन२००० दुसरा दिवस
तुळजापूर
सोलापूरात आल्यावर गाडीत डिझेल भरले.पंपाशेजारील टपरीवर चहा घेतला आणि तुळजापूरला निघालो.श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आशिर्वाद देणारी कुलदेवता श्री भवानी देवी,महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान, शक्तीभक्तीचे महनमंगल स्त्रोत असणारं शक्तीपीठ म्हणून लौकिक असलेल्या तुळजापूरला पोहोचलो.तदनंतर मंदिराकडे निघालो. राजे शहाजी महाद्वारावरील भगवा ध्वज आपले लक्ष वेधून घेतो.इतिहासाच्या पाऊलखुणा इथं स्पष्ट दिसतात.महाद्वारातून आत मध्ये मंदिराकडे निघालो. काही पायऱ्या उतरून गेल्यावर महाद्वार लागते.त्यावर कोरलेली शिल्पे हेमाडपंथी आहेत.त्यापुढे कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ लागते.इथं हातपाय धुतले.आणि पुढं निघालो.पुढे अमृतकुंड लागले.तदनंतर निंबाळकर दरवाजा ओलांडून आत गेले की मंदिराच्या कळसाचे दर्शन होते.दर्शनी बाजूला होमकुंड असून त्यावर शिखर बांधलेले आहे.मंदिराचा सभामंडप सोळा खांबी असून पश्र्चिमेला गाभारा आहे.इतिहास आणि पुरातत्त्वीय दृष्टीने हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली श्री भवानी मातेची मूर्ती आहे.विविध शस्त्रे धारण केलेले
रुप तेजोमय दिसते.आम्ही जोडीने देवीचे मनोभावे दर्शन घेतले.तेजपुंज शक्तीभक्तीचे दर्शन झाल्याने अनामिक ऊर्जा मिळाली.समाधान झाले.
येथील नवरात्र काळातील दसरा महोत्सव प्रसिध्द आहे..अलोट गर्दीत श्री भवानी मातेच्या या उत्सवाला होते.तदनंतर मंदिराच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानांच्या रांगेतील एका दुकानातून प्रसादपडा व चुडे घेतले.
सायंकाळी सहाच्या दरम्यान आम्ही लातूरकडे निघालो.अंदाजे अंतर८० किमी असावे .त्यामुळे तीन तासांचा प्रवास होता.रस्ता बऱ्यापैकी होता.
मुक्कामाचे नियोजन लातुरमध्येच होते.उजनी,औसा करत आम्ही लातूरला पोहोचलो.तिथं पोहोचल्यावर शहरातच दोन-तीन ठिकाणी जाऊन लाॅजिंगची चौकशी केली.सर्वांच्या संमतीने दोन रुमचे बुकिंग केले. जवळच असणाऱ्या भोजनालयात प्रत्येकाने आवडीप्रमाणे शाकाहारी अथवा सामिष भोजनाचा लाभ घेतला.जेवण चांगलच होतं.शतपावली करून रुमवर आलो.दाजींबरोबर आम्ही उद्याच्या नियोजनवर चर्चा केली.. किती वाजता गमन करायचं हे ही सांगितले
आणि छान पैकी निद्रेच्या अधिन झालो.शुभ रात्री.
भाग क्रमांक-१०८
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment