धार्मिक तीर्थक्षेत्र सहल पूर्वरंग व भाग १०५






☘️🛕☘️🛕☘️🛕☘️🛕  
माझी भटकंती
   भाग क्रमांक -१०५
    नागपूर अधिवेशन धार्मिक  सहल
   सन २००० पहिला दिवस
पूर्वरंग पुसेगाव व गोंदवले 
〰️➖〰️➖〰️➖〰️➖ 
प्राथमिक शिक्षक संघाचे दैवत आदरणीय श्री शिवाजीराव पाटील आण्णा यांनी नागपूर येथे त्रैवार्षिक अधिवेशन आयोजित केले होते.या अधिवेशनाला माझ्या ओझर्डे गावातील शिक्षक मित्रांच्या समवेत अधिवेशनाला जायचं निश्चित झाले.यावेळी जोडीजोडीने पत्नीपतीसह जायचं पक्कं झालं.मग धार्मिक तीर्थक्षेत्री देवदर्शन करत करतजाऊयात असा विचार होता.मगपुसेगाव मार्गे,सोलापूर,तुळजापूर,
लातूर ,बीड,परभणी,हिंगोली,माहूर करुन नागपूर अधिवेशनाला जाऊया . परतीचा प्रवास अमरावती, बुलढाणा, अजिंठा, देवगिरी,शिर्डी ,शनिशिंगणापूर करून शिरूर आणि मोरगाव मार्गे घरी असं नियोजन झालं.
साधारणपणे फेब्रुवारी महिना असावा.गावातीलच श्री सुनील नेमाडे दाजींची गाडी फायनल केली.त्यामुळे त्यांच्या सौ सुनिता नेमाडे मॅडम तयार झाल्या.श्री रामचंद्र पिसाळ गुरुजी,सौ प्रभावती पिसाळ बाई,श्री हणमंत कुंभार,सौ जिजा कुंभार मॅडम,श्री राजेन्द्र जाधव सर,सौ निर्मला जाधव मॅडम,सौ प्रेमा लटिंगे, आणि मी ,आणखी दोन लहान मुलं हर्षद लटिंगे आणि  शुभम जाधव असा आमचा शिक्षक फॅमिली ग्रुप तयार झाला.
  जायच्या दिवशी प्रवासातले आवश्यक साहित्य घेऊन,
पैसापाणी आणि कोरडा खाऊ घेऊन सकाळी नाष्टा पाणी उरकून आम्ही निघालो.सडकेला एस.टी. स्टॅण्डजवळील स्वयंवर मंगल कार्यालया जवळ  जाणाऱ्या गाडीचं पूजन केले,श्रीफळ वाढवले.गाडीला पोस्टर लावले.सगळ्यांच्या घरचे आई-वडील व मुलं उपस्थित होती.त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या.
दररोज फोन करत जा असही सांगितलं. मग प्रवासाला मार्गस्थ झालो.जोशिविहीरला पुणे बंगलोर हायवेला लागलो.आमच्या साथीला भुईंज मधील शिक्षक मित्रही सहभागी झाले.
सातारा बॉम्बे रेस्टारंट आल्यावर कोरेगाव रस्त्याने निघालो.. ड्रायव्हर दाजी परिचयातील असल्याने सगळ्यांशी छान सुत जुळले. नेहमी सारखी चेष्टा मस्करी न करता,गाणी ऐकत,घरगुती गप्पा मारत आमचा प्रवास सुरु होता.. पुसेगावला आलो. मंदिर रस्त्यालगत आहे.इथं श्री सेवागिरी महाराजांच्या  पुण्यस्मरणनिमित्त रथोत्सव सोहळा सेवागिरी ट्रस्ट साजरा करते.मोठी यात्रा भरते. लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित रहातात.जातीवंत जनावरांची  प्रदर्शनरुपी जंगी यात्रा भरविली जाते.
 पुसेगाव आल्यावर सेवागिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात आलो.पहिलं सप्त्निक देवदर्शन केले.तिथला सभामंडप आकर्षक व  प्रशस्त आहे.तदनंतर आम्ही गोंदवलेकडे निघालो.पुसेगाव ते गोंदवले अंतर 30 किलोमीटर असावे.अर्ध्यापाउण तासाने आम्ही गोंदावले येथे पोहोचलो.बाहेरुनच मंदिराचे देखणं रुप दिसते.तिथं देवस्थानाचे भक्तनिवास, प्रसादालय आणि  गोशाळा  आहे.
  गोंदावले येथील मंदिरात भाविकांची रीघ लागलेली असते..आपण तिथं आरती पूर्वी पोहोचलो तर आरतीचा आणि महाप्रसाद लाभ घेता येईल असे दाजी म्हणाले.चालेल आपण पोहोचतोय तिथं वेळेत....
मग दीडएक तासाने आम्ही गोंदावले येथे पोहोचलो.. मंदिराच्या रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याच गाड्या अधिवेशनाला जाणाऱ्या दिसत होत्या.त्यामुळं बरीच गर्दी दिसत होती.रांगेने आम्ही सभागृहात पोहोचलो... थोड्याच वेळात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आरतीला सुरुवात झाली. शांतचित्ताने आरतीत सहभागी झालो.आरतीनंतर समाधीचं मनोभावे दर्शन घेतले. आणि प्रसादालयात महाप्रसाद घ्यायला गेलो.बैठ्या पंगतीची व्यवस्था होती.मुखाने 'श्रीराम जयराम जय जय राम'मंत्रघोष सुरू होता.तिथल्या सात्त्विक भोजनाचा लाभ घेऊन आम्ही पंढरपूर कडे मार्गस्थ झालो.
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
भाग क्रमांक १०५

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड