२८|पुस्तक परिचय, अण्णाभाऊ साठे:जीवन आणि साहित्य





📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚

२८|पुस्तक परिचय

अण्णाभाऊ साठे:जीवन आणि साहित्य

लेखक-नानासाहेब कठाळे  🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

      अण्णाभाऊंच्या जन्मावेळी आत्त्याच्या ओंजळीत सुरती रुपयांचे दान देणा-या 'फकिरा'च्या ऋणातून उतराई होण्यासाठी'फकिरा' ही कादंबरी प्रतिभावंत साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. उपेक्षित असणाऱ्या  फकिराला अंधारातून प्रकाशाकडे आणलं.याच लोकप्रिय कादंबरीला १९६१साली महाराष्ट्र शासनाने प्रथम  पारितोषिक देऊन साहित्यसम्राट प्रतिभावंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव केला.

    गावकुसाबाहेर अठरा विश्व दारिद्यात उपाशीपोटी उपेक्षितांचे जीवन जगणाऱ्या समाजातील व्यक्तीरेखांचे जीवंत बोलके चित्र रेखाटले आहे.ग्रामीण रांगडी बोलीभाषा अफलातून शैलीत कथा,कादंबरी,पोवाडे आणि नाट्य रुपाने साहित्य रेखाटन करणारे 'साहित्य भूषण अण्णाभाऊ साठे'यांच्या आत्मचरित्र आणि साहित्यसंपदेची ओळख उठावदारपणे अधोरेखित केली आहे.'क्रांतीपिता लहुजी साळवे वस्ताद' यांचे चरित्र लेखक आणि सामाजिक जाणिवेचे 'अण्णाभाऊ साठे'साहित्याचे अभ्यासक नानासाहेब कठाळे यांनी ,"अण्णाभाऊ साठे:जीवन आणि साहित्य"या ग्रंथाचे लेखन केले आहे.

    वाटेगावच्या शाळेत केवळ दोनच दिवस शाळेचं तोंड बघितलेले अण्णाभाऊ,आपल्या कुटूंबासह उदरनिर्वाहासाठी मुंबईला मजल दरमजल जातात.तिथंमिळेल ते कष्टाचं काम वडिलांसोबत करतात.गिरणी कामगार होतात.कॉम्रेड डांगे यांच्या प्रभावाखाली साम्यवादाकडे झुकतात.चित्रपट बघण्याच्या छंदातूनच लिहणं वाचणं घडलं.भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, बॅरिस्टर सावरकर यांची क्रांतिकारी भाषणं ऐकायचा छंद जडला.

     १९४२च्या चलेजावच्या आंदोलनातही सहभाग घेतला होता.अटक वॉरंटमुळे पुन्हा मुंबईला आले.पक्षाचे पुर्णवेळ प्रचारक बनले. गिरणी कामगार,कष्टकरी,आणि शेतकरी यांच्या प्रबोधनासाठी पोवाडे रचून सादर केले.पहिला रचना 'मच्छर'आणि दुसरा 'स्तालीनग्राडचा' पोवाडा रचला.सादर करून कामगारांची वाहवा मिळविली.इथूनच साहित्य प्रांतात त्यांची लेखणी बहरु लागली.'स्तालिनग्राडचा पोवाडा' कम्युनिस्ट पार्टीला अर्पुण दोन लाख रुपये कला पथकातून पार्टीला मिळवून दिले.आता अण्णा  लोकशाहीर झाले होते.कष्टकरी माणसाच्या जीवनातील पैलू पोवाड्याच्या रचनेतून दर्शन घडवू लागले.अनेक संत, विचारवंत,तत्त्वज्ञ,लेखक,साहित्यिक आदींच्या साहित्याचे वाचन करून चिंतन मनन केले.शब्दांशी इमान राखून शब्दांशी नाते जोडले.शब्दांच्या सहवासात शब्दांशीच जगले.चिरागनगरच्या पत्राचाळीतील झोपडीत साहित्य निर्मिले.अण्णाभाऊं या साहित्यसम्राटाने आपल्या सिध्दहस्त लेखनितून एकापेक्षा एक सुरस लोकप्रिय कथा,कादंबऱ्या,नाटकं,प्रवासवर्णनं,लोकनाट्ये ,शाहिरी वाड्मय आणि त्यावर कळस म्हणजे मराठी चित्रपट कथाही लिहिल्या.त्यांची मुंबईच्या जीवनावरील छक्कड लावणीला तर रसिक श्रोत्यांनी डोक्यावर घेतले होते.'माझी मैना. गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली|'आजही अनेक शाहीर ही लोकप्रिय लावणी अनेक उत्सव समारंभात आवर्जून सादर करतात.त्यांच्या साहित्य संपदेने शंभरी पार केलेली आहे.. या सगळ्या साहित्यकृतीतून त्यांनी सामाजिक जाणीवांच्या व्यथा कथेत मांडल्या आहेत.उपेक्षितांचे अंतरंग विद्रोही बाण्यात लिहिणारे अण्णाभाऊ.फकिरा कादंबरी बाबासाहेबांच्या लेखणीस अर्पण करणारे अण्णाभाऊ.वीरांच्या शौर्य गाथा गाणं हा शाहीरांचा धर्म,अन्यायाची सांगड घालणे हे तिचं कर्म आणि लोकनिष्ठा व देशनिष्ठा ही शाहीराची लेणी,असं मानून कामगार कष्टकरी वर्गांच्या संवेदनाचे मर्म पोवाड्यात रचून सादर केले.त्यांचे लालबावटा कलापथकातील वगनाट्य सुध्दा गाजत असत.

  'अकेलेची गोष्ट'या लोकनाट्याने तर धमाल उडवून दिली होती.त्यांच्या साहित्याचे रशियन सह इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.ते रशियाला कामगार वर्गाच्या जीवनाचा अभ्यास करायला गेले होते.त्यांच्या लोकप्रिय कथाकादंबरीवरुन मराठी चित्रपट निर्मिती झाली आहे.डोंगरची मैना,फकिरा,वारणेचा वाघ,बारा गावचं पाणी,अशी ही साताऱ्याची तऱ्हा आदी सिनेमा होत.फकिरा चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे.या ग्रंथातूनसाहित्य- 

सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे जीवनचरित्र आणि साहित्यसंपदा यांची माहिती आपणाला लेखक नानासाहेब कठाळे यांनी करून दिली आहे.सर्वच पुस्तकांचा गाभा अभ्यास करून समीक्षणात्मक वास्तव स्थितीवर प्रकाश टाकून साहित्य  कष्ट, संघर्ष आणि जाणीवांमुळे व्यक्तींची व्यथा मांडली आहे.वर्णनशैलीला संवेदना लगडली आहे.जीवनगाथा तळमळीने गुंफली आहे.प्रसंगान्वये भावफुलोरा फुलला आहे.साहित्यसम्राट शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यातील भावना विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुंदर गुंफण करून या ग्रंथात प्रुस्तत केलेल्या आहेत.

हा ग्रंथ समग्र विश्लेषणातून साकार झाला आहे.अण्णाभाऊंच्या कथांतील जीवनसंदेशाचा ऊहापोह विवेचन सुंदर शब्दात मिमांसा परखडपणे मांडली आहे.सामाजिक राजकीय ऐतिहासिक विनोदी मनोविश्लेषणात्मक कथा लिहून स्वातंत्र्यपूर्व काळातील ललित जीवनाचे दु:ख जगासमोर मांडले."जग बदल घालूनि घाव |सांगूनि गेले हे भीमराव|"इतक्या स्पष्टपणे त्यांनी आपली आंबेडकरी निष्ठा सांगितली आहे.आशयघन शब्दात चरित्र आणि साहित्यातील विचार धारेचा उलगडा वाचकांना करून दिला आहे.अण्णाभाऊंच्या साहित्य संपदेची ओळख वैशिष्टयपूर्ण शब्दांकनाने केली आहे.

✒️श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई


🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

अण्णाभाऊ साठे:जीवन आणि साहित्य

लेखक-नानासाहेब कठाळे

आवृत्ती-प्रथमावृत्ती 

प्रकाशन- अण्णाभाऊ साठे साहित्य प्रकाशन मंच, नागपूर 

पृष्ठे-१४१

किंमत-५०₹

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड