३७|पुस्तक परिचय, प्रकाशवाटा
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
३७|पुस्तक परिचय
प्रकाशवाटा
लेखक-डॉक्टर प्रकाश आमटे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
जंगलापलीकडच्या जगातील माडिया गोंड आदिवासी लोकांच्या जीवनातील अंधार दूर करणारे विकासपुरुष डॉक्टर प्रकाश आमटे यांचे आत्मचरित्र"प्रकाशवाटा"हा ग्रंथ आहे.आत्मकथन हे स्वत:च्या प्रकाशवाटेत खडतर संघर्षमय प्रवासातील जंगलातीलआदिवासींच्या विकासासाठी निरपेक्षपणे उभारलेला अक्षर सोहळा आहे.जीवनातील कार्याचा आरसा आहे.आत्माविष्कार ही आत्मचरित्राची प्रेरणा असते.डॉक्टर प्रकाश आमटे यांनी आदिवासी लोकांच्या जीवनात आरोग्यसेवा मार्गाने जाऊन त्यांच्या विकासासाठी तळमळीने केलेल्या कार्याचा मापदंड होय.
त्यांचे कार्य मानवतावादी सेवा व्रत आहे.शून्यातून विश्व निर्माण करणारे कार्य दोघा उभयतांनी केलेले आहे.
अनेक सेवाभावी संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे.
आशिया खंडातील उच्चकोटीचा बहुमानांकन असलेला मॅगसेसे पारितोषिक विजेते डॉक्टर प्रकाश आमटे आहेत.
भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मानित केले आहे."आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं,त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळवून द्यावी,असं बाबांच्या मनात होतं.याकामाची जबाबदारी मी घेतली आणि सर्वांनी मिळून ती पार पाडली.बाबांनी दाखवलेला विश्वास,
ताईची माया नि मंदाची भक्कम साथ यामुळेच हे काम इथवर येऊन पोहोचलं.बाबांचं हे स्वप्न हेमलकशात प्रत्यक्षात कसं उतरतंय त्याची ही गोष्ट.म्हटली तर माझ्याही जीवनाची गोष्ट."अशा विचारधनाने या चरित्रात्मक पुस्तकाने अलौकिक सामाजिक बांधिलकीच्या कार्याची ओळख करून दिली आहे.
'प्रकाशवाटा'हा चरित्रग्रंथ डॉक्टर प्रकाश आमटे यांनी प्रकाशवाटा शोधण्याची प्रेरणा देणारे ताई आणि बाबा, सुरुवातीपासून पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले आनंदवन ,या कामासाठी आपली सुस्थित आयुष्य सोडून साथ देणारे जिवाभावाचे कार्यकर्ते आणि माझं नि मंदाचं अवघं जीवनच बदलून टाकणारे आदिवासी,या सर्वांना सादर केला आहे.
हेमलकसा येथे आदिवासींच्या आरोग्यासाठी कामास सुरुवात करुन शिक्षण, उपजिविका आणि वन्यजीव संरक्षणासाठी गेली पाच दशकं आमटे कुटूंबिय काम करत आहेत."हेमलकसा युवक बिरादरी" या संस्थेची स्थापना उदात्त हेतूने केली.आज तिथेच मुलं शिकली.तीच मुलंही हा वारसा नवनवीन प्रयोगांनी पुढे घेऊन जात आहेत.जंगली प्राणी आणि माणूस यांच्यातील वेगळं नातं जपायचं ठिकाण म्हणून'आमटेज पार्क'अनाथालय प्रसिद्ध झाले आहे.
सुरभिवरील माहितीपटाने प्रकल्पाला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि मदतीचा ओघ वाढला.प्राण्यांच्या सोबतीमुळे आमच्यात आणि त्यांच्यात आगळं विश्र्व निर्माण झाले आहे.
वाहणाऱ्या नद्या,जंगली श्वापदं आणि पाखरांच्या आवाजा पलिकडे कोणताच आवाज ऐकू येत नव्हता.तिथं जगापासून तुटलेल्या समाजाला मुख्य प्रवाहाची ओळख करून देण्याचं आव्हानं स्विकारुन यशस्वी करुन दाखविण्याच्या कामाची डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाने उत्तुंग भरारी घेतली आहे.जंगलाच्या आतील माणसाच्या चाहुलीत चैतन्य निर्माण केले आहे.
हे आत्मचरित्र वाचताना आपण अंतर्मुख होऊन जातो.
रौद्र रुपातल्या निसर्गावर मात करून अस्तित्वहिन समाजाला दिशा देण्याचे बहुमोल कार्य आपणाला घडोघडी वाचताना दृष्टीस पडते.आवश्यक तिथं स्मृतींच्या छायाचित्रांचा समावेश केल्यामुळे त्यांचे घटना प्रसंग उठावपणे प्रत्ययास येतात.साधी सोपी सहज सुंदर आशयाशी निगडित शैलीतील लेखन वाचकांना भावते.
अफलातून निरखलसपणे केलेल्या मानवतावादी कार्याचा डोंगर उभा केला आहे.आज याच आदिवासी समाजातील मुलं शिक्षित होऊन डॉक्टर, इंजिनिअर,सेवक झालीत.
प्रामाणिकपणे केलेली कामे आकाशाला गवसणी घालणारी ठरतात.अशीच कामे जनमानस आणि स्वयंसेवी संस्थांच्या आर्थिक बळावर उभी राहतात. हेमलकशातील समाजाला अंधारातून उजेडाकडे नेहण्याचं काम डॉक्टर 'प्रकाश'आमटे यांनी केलेले आहे.
'प्रकाशवाटा'या पुस्तकात १५ लेखमालेतून जीवनपट उलगडून दाखविला आहे.'मॅगसेसे'चा आनंद,
आनंदवनातले दिवस,आनंदवनाबाहेरच्या जगात,
मुक्काम हेमलकसा,अखेर हेमलकशानं स्विकारलं!
कसोटीचे प्रयोग,विस्तारती वैद्यकीय सेवा,जिवावरचे प्रसंग,शाळेची सुरुवात,अनोखे नवीन प्रयोग,प्राण्यांचे गोकुळ,पुढची पिढी,समाजमान्यता,जगन्नाथाचा रथ
नदीच्या त्रिवेणी संगमातील भोवऱ्यात पोहणं, दवाखान्याच्या गुडवीलचा उपयोग शाळेसाठी करुन घेणं,छोटे तंटे गावातच मिटविणे,प्राण्यांच्या अनाथालयातील प्रसंग,नेगलचं सोडून जाणं,जीवावर बेतलेलं अनेक कसोटीचे क्षण आणि मुख्यत: आरोग्य सेवा पुरविताना आलेले बिकट प्रसंग अशा अनेक घटना प्रसंग वाचताना हृदयात गलबलून येते.डोळ्यांच्या कडा पाणावतात.अंगावर काटा येतो.
सामाजिक कार्याचा हा प्रकाशरुपी ऊर्जा देणारा आलेख खरोखरीच वाचनिय आहे.मानवतेची सेवा दुर्गम भागात राहून करणारे व्रतस्थ माणसं दुर्मिळच आहेत.वाचताना आपण भारावून जातो.सीमा भानू यांनी सहज सुंदर सोप्या शब्दात हे अक्षरशिल्प रेखाटले आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या सेवाव्रतास त्रिवार वंदन अन् सलाम!
हाती घेतलेला आरोग्याचा वसा...समाजसेवेचं व्रत...म्हणून त्यावर असणारी निष्ठा...त्या सगळ्या गोष्टी करताना असणाऱ्या अडथळ्यांच्या शर्यतीपासून त्यावर मात करण्यासाठीचा केलेला विचार अन् तरीही येणाऱ्या अडचणींवर मात करून आपला वसा टाकायचा नाही, हे त्यांचं वागणं महत्त्वाचं दिसते.हेच त्यांचे आदर्श कार्य
बहुपेडी व्हावं.एक दस्ताऐवज झाला तो त्यांच्यावरील मराठी चित्रपट "प्रकाशवाटा'.प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी अप्रतिम भूमिका या सिनेमात करून डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे यांच्या सेवाभावी कार्यास न्याय दिला आहे.या सिनेमाने त्यांचे कार्य जगाच्या नकाशावर ठळक झाले.
परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment