४३|पुस्तक परिचय, झाडांचे जगणे असे..
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
४३|पुस्तक परिचय
झाडांचे जगणे असे….
लेखक/कवी-अनिल बोधे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
''होईन अंकुर तुमच्यासाठी
होईन रोप तुमच्यासाठी
उगवण्याची सवय माझी
अन् फुलण्याचा तो बाणा आहे
आभाळभरच्या चिमण्या लेकरासाठी
माझा देह उभ्या पिकातील दाणा आहे''
'देहबोली झाडांची' या कवितेतील ही रचना जगण्याची उमेद दर्शवितात.साताराजिल्ह्यातील प्रतिथयश व्याख्याते आणि लेखक अनिल बोधे यांच्या "झाडांचेजगणे असे'' याकाव्यसंग्रहातील वरील रचना आहे.
झाडांचे जगणे असे'' हा काव्यसंग्रह २०१२ साली महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या जनप्रसारार्थ या पुस्तकाची शिफारस केली आहे."एक व्यक्ती एक झाड" हा उपक्रम कृतीत आणण्यासाठी उद्बोधक व प्रेरक काव्यविचार प्रबोधनात्मक आहेत.हा काव्यसंग्रह रंगीत छायाचित्रांसह काव्यरचना आहेत.जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ व निवृत्त शिक्षण संचालक वि.वि.चिपळूणकर यांनी या काव्यसंग्रहाचे कौतुक केले आहे.'बकुळीच्या फुलांसारखं चिरगंधित स्फुरण यासम हेच.'
झाडांचं असं भावपूर्ण व लोभस दर्शन घडविताना अनिल बोधे यांनी माणसांचं उघड उघड बेगडी प्रेम,कृतघ्नता आणि क्रौर्य व्यथित करतं.''दिसते झाडाहून महाकाय इमारतींची उंची आणि दारात अथवा गॅलरीत झाडे नऊ इंची''माणसेही आता माणसाला खायला लागली हे विदारक सत्य सांगून झाडांना परंपरावादी ठरविणारे आपण बुद्धिवादी कसे?
असा प्रश्नही उपस्थित करतात.तर कवीला झाडांच्या रुपात आईचे रुप,विठ्ठलाचे रुप, बाळाचं रुप,संतांचे परोपकारी रुप जाणवतं.
चिरतरुण निसर्गकवी अनिल बोधे आणि त्यांच्या रचनांचा स्वरसाज चढवून लोकांपर्यंत "गीतवृक्षायन"घेऊन जाणारे तरुण संगीतकार विश्वनाथ दाशरथे यांचेही शुभचिंतक करतात.झाडांचा एकेक संदेश वेचनारा हा कवी आर्त स्वरात काव्यातून आपणास विचारीत राहतो.
झाड होऊन आपण कधी झाडाजवळ गेलात काय? फांद्या,फुले अन् पानांवर हळूवार मायेचा हात फिरवून आलात काय?असं हे झाडांचं हरितजीवन काव्य रचनेतून कविता वाचताना उलगडत जाते.
काव्यात्मक अलंकारिक शब्दसाजही अप्रतिम आहेत.
पालवीचा सूर्य, हिरवीगार रानभाषा, चैतन्याचा गर्भागार आदी शब्दांची पेरणी समर्पकता दर्शवितात.'जग सुंदर करण्याचा वसा झाडांकडून घ्यावा.'ही नवकल्पना कवी अनिल बोधे देतात.आणि 'झाडांचे जगणे असे' बालपणापासून आजवर भेटलेल्या झाडांचे काव्यरुप चिंतन केल्याचे नमूद करतात.झाडांची सृष्टी जीवापाड सांभाळण्याचे आवाहन करत त्यांच्या कविता मार्मिक,तात्त्विक व आशयघन शब्दविचारांनी मनाचा ठाव घेतात.त्यांच्या भाषेतले सौंदर्य,विचारातले औचित्य आणि झाडांच्या जगण्याला समाजमनस्क करण्याचे काव्यातील वेगळेपण लक्षणीय आहे.यातील सगळी काव्यपुष्पे आशयघन आणि विचार करायला लावणारी आहेत.
झाडांच्या संवेदना,झाडे देतात झुळूक,वठलेले झाड, झाडाखाली,एक झाड,सोन्याचे झाड,हसत हसत जगतात झाडे, झाडांचे प्रश्न,लावाल काय झाडे, माणूस आणि झाडे, व्यवहार माणसांचा,माणसानेही रुजायचे असते,अक्षरांचे दिवे,झाडापणातील देवपण,छंद,जीवासारखे झाड,नव्या जगाची आशा,वृक्षवेडा माणूस, आणि झाडांचे जगणे असे आदी कवितांचा संचय या काव्यसंग्रहात आहे.
झाडांचे रहस्य कविता वाचताना उलगडते.
झाडांचे जगणे असे
झाड एका जागेवर उभे
म्हणून ते परंपरावादी
आणि आपण जागा बदलू शकतो
सावली देण्याचे- घेण्याचे
आपले रिवाज बदलू शकतो
म्हणून आपण बुध्दीवादी
असे माणसे मानून घेतात…
नदीकाठी
नदीकाठानं ओल्या ,उंच धिप्पाड झाडी
वारा झळाळत जाई ,त्याची वेगळीच गोडी
वड पिंपळ बाभळी, लिंब चिंचेच्या ओळी
उंबराच्या झाडामागे, करंज जांभळीची डहाळी
घर घर येई वारे,पाणी नदीचे पिवून
लव्हाळीची पाती पाहती,खोल पाण्यात लवून
नदीकाठावर ही झाडी,वाढे भन्नाट मस्तीत
देव विठ्ठलाची मंदिरे,ह्या झाडीतल्या वस्तीत…
झाडाखाली गौतमबुद्ध
असाच कधी बसला होता
अहिंसेची पालवी फुटून
असाच कधी हसला होता……
झाड आणि महात्मा फुले
एकदा दोघे बोलत होते
बहुजनांच्या मुळावर जेव्हा
घाव कोणी घालत होते……
माणुसकीचा पाऊस
झाडांनी आपल्या आयुष्यात अनेकांना दिली सावली…
माणसांजवळ शोधली त्यांनी माणुसकी पण ती नाही घावली..…..
तेव्हापासून झाडे आता माणसांजवळ नाहीत काहीच मागत…..
दिवस रात्र उभी असतात आभाळाकडे डोळे लावून बसतात….
माणुसकीचा पाऊस
झाडांना वाटते कधीतरी पडेलच माणुसकीचा पाऊस……
पावसामध्ये चिंब होईल माणसांचे रान
जिथे कुठे पेरले असेल नियतीने,
तिथे तरी उगवेलच की माणुसकीचे वाण!!
झाडापहाडात
मुक्त जग हसे या जंगलाच्या वाटेवर
किती ऋषी साधू जन्मले या झाडांच्या लाटेवर
सरांच्या निसर्गप्रेमाला सलाम आणि कविता संग्रहातील काव्यांच्या शब्दगंधांनी रसिक वाचकांनी एक तरी झाडं रोपण करून संवर्धित करण्याची किमया घडो!
"लोभस गारवा देणाऱ्या झाडांचे ऋण कधी विसरु नये."
झाडांचे असे जगणे
झाडांचा आई अन् देवासारखा आधार घेवूया
झाडातील देवपण अक्षरांच्या दिव्यांनी जपूया
कल्पवृक्षाच्या शोधात पालवीचा सूर्य ओळखूया
फुलापानांशी संवाद साधत वृक्षदिंडी काढूया||
माणुसकीचा पाऊस पाडायला रोपटी लावूया
सोन्याचे झाड पावसात बहरुद्या फुलूद्या
झाडांच्या सावलीत फांद्याव पाखरं बागडूद्या
हसत हसत झाडांना समाधानाने जगूद्या||
झाडांचे झाडपण जपत मनोगत ऐकूया
झाडांचा वसा माणसामाणसात रुजवूया
'झाडांचे जगणे असे' काव्य पुष्प वाचूया
वठलेल्या झाडांची संवेदना जाणवूया||
लहानांसवे झाड होऊन जावूया
मुळांवर घाव घालणारे ओळखूया
झाडांचा छंद जीवापाड जपूया
वाटेवरंच्या झाडांकडून शिकूया||
परिचय कर्ता -श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
पुस्तकाचे नांव- झाडांचे जगणे असे...
लेखक/कवी- अनिल बोधे
साहित्य प्रकार- काव्यसंग्रह
प्रकाशन-आलेख प्रकाशन, रहिमतपूर, कोरेगाव
आवृत्ती-प्रथमावृत्ती
पृष्ठ संख्या-७४
मूल्य-१५०₹
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
अप्रतिम
ReplyDelete