३३|पुस्तक परिचय,स्त्रीकोष
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
३३|पुस्तक परिचय
स्त्रीकोष
लेखिका-स्वाती शिंदे-पवार
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
गुलाल आहे हातात तुझ्या
उधळण्यात तो आनंद आहे,
गवसल्या सुखाला पिवून घेण्यात
किती मोठा स्वानंद आहे.
पंख नवे फुटले आहेत
आकाश कसं हसतं आहे,
तुझ्या स्वागता मोर होऊन
वारा सुध्दा नाचत आहे.
'त्या डोक्यांची शपथ सये'या कवितेतील ही रचना मनाला स्पर्शून जाते.सुप्रसिध्द कवयित्री स्वाती शिंदे-पवार यांच्या 'स्त्रीकोष 'या कवितासंग्रहातील आहे.काव्यलेखन आणि काव्यवाचन या दोन्हीत त्या सिध्दहस्त आहेत.यातील अनेक कविता त्यांनी काव्य संमेलनात सादर केल्या आहेत.अतिशय उत्तम आणि वेचक कवितांचा संग्रह आहे.या काव्यसंग्रहाला व कवितेला उत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.
ग्रंथ गौरव, साहित्य सेवा,, कविवर्य टिळक काव्य पुरस्कार तर यातील कवितांची नोंद केंब्रिजच्या'हूज हू' पुस्तकात झाली आहे.
सन २०१०सालातील मे महिन्यात जिल्हास्तरीय सूत्रसंचालन कार्यशाळा दैनिक सकाळचे पत्रकार जयंत लंगडे यांनी आयोजित केली होती.तेव्हा 'निवेदन कसे करावे' याविषयी कवयित्री स्वाती शिंदे-पवार यांच्या विषयांची श्रावणसर ऐकायला मिळाली होती.तेव्हा हा कविता संग्रह खरेदी केला होता.हे काव्यपुष्प त्यांंनी कविता रचनेचे पहिले श्रोते आजोबा श्री. बाबुराव गायकवाड गुरुजी आणि आजी सौ. गोदनबाई गायकवाड यांना अर्पण केला आहे.तसेच कवितेला आत्मभान देणाऱ्या गडकिल्ले बाणूरगड व परिस स्पर्शाच्या मृत्तिकेस कृतज्ञतापूर्वक अर्पण केला आहे.
कमल देसाई यांनी आशीर्वादपर शुभेच्छापत्रात या काव्यसंग्रहातील कवितांचा आशय सहज सुंदर शब्दात गुंफला आहे. एक मात्र खरे की जेव्हा कविता उचलून धरते तेव्हा जनतेचा कौल हा देवाचा शब्द असतो. लोकशाहीत कलेची मूल्य अशी लोकांधिष्ठित असतात हे नि: संशय आहे. स्वाती शिंदे पवार यांच्या कविता आशयघन असतात. त्या तुम्हाला अंतर्मुख करून चिंतन करायला लावतात. कविता स्त्रीवादाच्या पलीकडे नेतात.
संसारातील आनंद, स्त्रियांची होणारी पिळवणूक, पुरुषांचा अरेरावीपणा याशिवाय स्त्रीला लाभणारा मातृत्वाचा सर्वोच्च आनंद आणि असा अशा या थोर आनंद घेऊन जीवनातील अस्तित्व फुलवण्याची संधी, त्या संधीच्या कविता करून मोठ्या प्रासादिपणे या संग्रहात त्यांनी रचलेल्या आहेत.या काव्यसंग्रहाच्या बांधणीला साहित्य क्षेत्रातील प्रतिभासंपन्न रामदास फुटाणे,महावीर जोंधळे,कमल देसाई,म.द.
हातकणंगलेककर,अंजली कुलकर्णी आणि शैला सायनाकर यांनी मायेचा हातभार लावला आहे.
उजेडाचे गाणे या कवितेत घराचा उंबरठा ओलांडून तुझ्या सवे स्वच्छंंदी बागडत चांदणं शोधत जगण्याची कल्पना मांडतात.
आता गाईन म्हणते उजेडाचे गाणे
घेईन म्हणते सुंदर तराणे….
तम घेऊन पोटात सारा
भरावा म्हणतेय ओठात वारा….
बाई जातीच्या रचनेत दु:खाची वेदना आणि संवेदनाचे गाऱ्हाणे व्यक्त होतंय.
माझ्या कवितेला यावा
सखे घामाचा गं वास
पिंगा घालावा जातीने
दु:खी जनांच्या आसपास..
स्त्री मनाच्या हृदयाची स्पंदन आशयगर्भ आशयघन व्यक्तता कवितेतील रचनेतून उलगघडत जाते.त्यांची कविता स्त्रीवादी असलीतरी सर्व जीवनाला व्यापून टाकणारी आहे.या कविता आशयघन असून अंतर्मुख करायला लावतात.त्यांच्या कवितांना काव्य संमेलनातील रसिकांनी भरभरून दाद दिली आहे.आयुष्यातील रंगीबेरंगी आस्वाद म्हणजे काव्य होय.
अनुभवाने कविता लेखन केले.असं मत कवयित्री स्वाती शिंदे-पवार यांनी व्यक्त केले आहे.बाईपणाचं सभोवार असणारं घट्ट आवरण म्हणजे 'स्त्रीकोष'होय.मोत्यावानी शब्दांचे दाणे रसिकांच्या हृदयभूमीवर पेरताना एखाद्या टोकदार कवितेची तिफण आतवर घुसली तर त्यात नवविचाराचं बीजारोपण व्हावं,कारण त्यातून उगवाई बहरणार आहे.स्त्रीकोषातून बाहेर पडलेली रंगीबेरंगी फुलपाखरं स्वानंदाने बागडतील.या काव्यमालिकेत ४५ कवितांचे संकलन आहे.संसारातील आनंद,स्त्रियांची पिळवणूक,पुरुषांचा अरेरावीपणा, दु:खाणे प्रसंग आणि मातृत्वाचा आनंद आदी विषयांवर रचना केली आहे.'बाई जातीची' कवितेतील ओळी हृदयाला स्पर्श करतात.
मातृत्वाचं ममत्त्व दिसतं.
हंबरुनी तिने कधी
व्हावे परसात गाई
बाई जातीची कविता
व्हावी साऱ्यांचीच आई
अश्रु पुसावे शब्दांनी
मना आधार द्यावा
पान्हा फुटतो मायेचा
झरा आईचा व्हावा
अशा भावस्पर्शी रचना आहेतस्त्रीकोष,अंगण,सौदामिनी,
आमच्या वेदना,उजवं घर,मी आणि झाड आणि तूच सांग सख्या आदी रचना अप्रतिम व सुंदर आशयघन रचना या काव्यसंग्रहात आहेत.
श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
पुस्तकाचे नाव-स्त्रीकोष
लेखिका-स्वाती शिंदे-पवार
प्रकार-कवितासंग्रह
आवृत्ती- चतुर्थावृत्ती
प्रकाशन- स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस,पुणे
पृष्ठे-१००
किंमत-१००₹
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
उत्तम लेखनातून मांडलेलं पुस्तक परीक्षण
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete