४९| पुस्तक परिचय, दैनंदिन पर्यावरण




📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚  

  ४९|पुस्तक परिचय

           दैनंदिन पर्यावरण

लेखक-दिलीप कुलकर्णी

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

    पर्यावरणाच्या समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहेत.त्यामुळे उद् भवणाऱ्या  समस्यांनी माणसं व्यथित होतात.भययुक्त परिस्थिती निर्माण होते.रोज कानांवर येणाऱ्या अथवा वाचायला, पाहायला लागणाऱ्या या समस्यांवर आपण खारीचा वाटा उचलावा असे प्रत्येकाला वाटत असते.पण 'काहीतरी'नेमके काय हे उमजत नाही.हे सांगणारं लेखक दिलीप कुलकर्णी यांचे 'दैनंदिन पर्यावरण'हे पुस्तक आहे.पर्यावरणाच्या पार्श्र्वभूमीवर काहीतरी  उपाय चिंतन या पुस्तकात मांडले आहेत.

रोजच्या जगण्यात कमीतकमी साधनांचा वापर करताना ऊर्जा संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्‍न असतो. वाळलेल्या लाकडांचा वापर करून त्यांच्या घरी स्वयंपाक केला जातो. रेडिओचा अपवाद वगळता स्वयंपाकाचा गॅस इत्यादी आधुनिक साधने ते वापरत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या मालकीचे वाहनसुद्धा नाही.

लेखक दिलीप कुलकर्णी हे विविध सामाजिक विषयांवर व्याख्याने देणे आणि मराठी व इंग्रजीतून स्फुट लेखन करतात.पर्यावरणाचा संदेश पोचविण्यासाठी 'गतिमान संतुलन' नावाचे मासिक ते चालवतात. 'निसर्गायण', 'ग्रीन मेसेजेस' आदी पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पुस्तकांप्रमाणेच भाषणांतून, कार्यशाळांमधून ते पर्यावरण संरक्षणासाठी आग्रही असतात. कुडावळे येथील देवराई टिकविण्याचा त्यांचा मोठा प्रयत्‍न आहे.निसर्गात रमून निसर्गावर प्रेम करुन निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न करणारे निसर्ग प्रेमी आहेत.

जगातील पर्यावरणवादी चळवळींनी मंत्र दिला आहे. 'विचार वैश्विक-कृती स्थानिक-प्रतिसाद वैयक्तिक!' ,पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी असा वैयक्तिक प्रतिसाद साध्या सोप्या कृतीमधून सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे.एखाद्या प्रयोगाचा निष्कर्ष समाजशास्त्रीय असू शकतो.परिस्थिती एकदम खूप बदलली तर सजीव प्राणी फाईट किंवा फ्लाईट अशा प्रकारचा प्रतिसाद देतो.पळून जाईल अथवा जीव वाचवेल.मात्र परिस्थिती सावकाश बिघडत राहिली तर, कोणतीही प्रतिक्रिया न येता,सजीव प्राणी त्या सावकाश बिघडणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेत राहतो.जीवनाचे मूलाधार हवा पाणी जमीन यांचं प्रदूषण झाले आहे.पृथ्वीचे तापमान वाढत आहे.त्यामुळे वातावरण सतत बदलतं आहे.परस्परांवर अवलंबून असणारे चक्र अथवा साखळी टिकून राहण्यासाठी पर्यावरणाची गरज असते.तसेच नवीकरणक्षम संपदा आणि पुनरुत्पादन यातून साधनसंपत्तीत वाढ होत असते.पण भरमसाठ साधनसंपत्तीचा वापर केल्यामुळेऊर्जासाधनांचे साठे कमी होत आहेत.यास्तव सुचविलेल्या चतुसुत्री प्रमाणे काही साधनांचा वापर पूर्णपणे टाळणं, कमीतकमी वापर, पूर्णपणे न वापरणे आणि पुनर्वापर करणे.याचा उपयोग करणं महत्त्वाचं आहे.हे पुस्तक वाचनातून आपणाला विचार मंथन करायला लावते.कृतीयुक्त घटक अथवा उपक्रम अंगिकारायला सूचित करते.बऱ्याच उपक्रमातून आपल्याला नव्याने माहिती मिळते.छोटीशी कृती सुध्दा अंगिकारणे किती महत्त्वाची आहे हे समजते.काटकसर , गरजेपुरता वापर कसा करावा हे सोदाहरण स्पष्ट केले आहे.लाईटचा गरजेपुरता वापर कसा करावा.रद्दी कागदाचा पुनर्वापर,

घरच्याघरी कचऱ्याची विल्हेवाट, परसबाग आदी उपक्रमांचे स्पष्टीकरण सहज सोप्या भाषेत केले आहे.

    दिलीप कुलकर्णी हे पर्यावरण या विषयाशी जोडले गेले आहेत.मूलगामी आणि एकात्म विचार पर्यावरणाविषयी असलेलं 'निसर्गायन'हे पुस्तक प्रसिद्धआहे.पर्यावरण संवर्धनाचे सूत्र यात खुसखुशीत शैलीत आणि विनोदाची पखरण करीत एकशेएक कृती या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत.घरात,शेतात, शाळेत, कार्यालयात, स्वयंपाकघरात,न्हाणीघरात आणि प्रवासात पर्यावरण दृष्टीने काय काय करता येईल याची कृतीयुक्त माहिती दिली आहे.

आवश्यक तिथं आकृत्या व चित्रांचे रेखाटन केले आहे.प्रत्येक कृती ध्येयनिश्चिती आणि ध्येयपूर्ती नोंद करण्यासाठी अनुक्रमणिकेत सोय केली आहे.प्रत्येक कृती मार्मिकपणे शब्दबध्द केली आहे.त्यातील प्रबोधनात्मक विचार सहजपणे लक्षात येतात.नको असलेले दिवे बंद करणे.तोंड धुताना नळ चालू न ठेवणे.पुस्तकांची निगा, घातक ड्रायक्लिनिंग,लाल कचरा -हिरवा कचरा, प्लॅस्टिक पिशवी न वापरणे, सौरऊर्जेची साधने वापरणे अन्नाची नासाडी आदी कृतींची माहिती चित्रांसह दिलेली आहे.


परिचय कर्ता-रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

📚पुस्तकाचे नांव-दैनंदिन पर्यावरण

लेखक-दिलीप कुलकर्णी

प्रकाशन-राजहंस प्रकाशन,पुणे

आवृत्ती-सहावी

पृष्ठे-१२०

मूल्य-६५₹

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड