३६|पुस्तक परिचय, सहावे सुख





📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚

३६|पुस्तक परिचय

         सहावे सुख 

लेखक - प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

   जीवन उन्नत करणारे साहित्य आकाराने छोटे-मोठे असो ते काळाच्या उदरात गडप होत नाही.जीवनाला उन्नत करणाऱ्या या साहित्यकृतींना समाजाच्या विस्मृतीचा शाप नसतो.रसिक वाचकांच्या अंत: करणावर पिढ्यानपिढ्या सत्ता प्रस्थापित केलेल्या साहित्यकृती आणि त्यांचे वाचक हे सदैव चिरतरुणच राहतात.निदान आपले उमदेपण जपण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी, मनव्यापक उदार होण्यासाठी अंतर्यामी हे साहित्याचे झरे खळाळले पाहिजेत. हे झरे जीवनाला प्रवाही ठेवतात.जगण्याला नाद देतात.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते वाचण्याची तृष्णा भागवून मनाला तृप्त करतात.मनाचे बळ वाढवायला असे काही ग्रंथ असावेत.त्यापैकीच एक ग्रंथ'सहावे सुख' हा ख्यातनाम साहित्यिक व्याख्याते म्हणून नावलौकिक असलेले आचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांचा आहे.

         गेल्या तीन दशकांपासून मानवतेचा अखंड जागर मांडणारे साध्या सरळ विचारांचे जागरण करणारे,समाज सुधारकांना दैवत मानून सुधारणांचे विचारवैभव लोकांपर्यंत वाणी आणि लेखणीने पोहचविणारे प्रभावी व्याख्याते प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांचा हा ग्रंथ आहे.त्यांना अनेक पारितोषिके आणि पुरस्कार देऊन  सन्मानित केले आहे.महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार,

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार आणि उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार मिळाले आहेत.

         'सहावे सुख'हा ग्रंथ साहित्य वाचनाचा आस्वाद घेऊन जीवनात आनंद कसामिळवावा याची जाणीव करून देतो.

संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि मनाच्या उन्नयनासाठी घराघरात छोट्या स्वरुपात का होईना'ग्रंथघरांची' गरज

आहे.जसं देवघर सात्त्विक भावनांसाठी तसं ग्रंथघर आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे.जसं शरीर वाढीसाठी अन्न तसं आत्म्यासाठी चांगले पुस्तक गरजेचे आहे.यातील ३९ ललित लेख वाचन चळवळीचे सकस संवर्धन करतात.साहित्य क्षेत्रातील अनेक प्रकारचे साहित्य कसं वाचावं.हे सहज सोप्या भाषेत समजावून सांगतात.

   आरोग्य, संपत्ती, प्रतिष्ठा, साथीदार आणि मुले या पाच सुखांच्या सोबतीला सहावे सुख कोणतं यांचा मागोवा अत्यंत सुंदर शब्दांकनात मांडला आहे."

प्रयत्नांच्या पाऊलवाटेने जाताना आपल्या आयुष्यात अचानक असा एखादा क्षण अथवा प्रसंग घडला की आपण आतून बाहेरून मोहरुन जातो.आभाळात इंद्रधनू प्रगटल्यावर जसा आनंद होतो.तसेच चैतन्यात न्हाऊन जातो. आपल्या श्रमाचे,कष्टाचे,प्रतिभेचे,

प्रयत्नांचे उभ्या वाटचालीचे सार्थक करणारा तो क्षण म्हणजेच "सहावे सुख"आहे.हे नमूद करून यासुखाचा आत्मानंद घेण्यासाठी लोकप्रिय साहित्यिकांची विपुल ग्रंथसंपदा वाचायला उद्युक्त करतात.

      अनेक प्रतिभावंत लेखक,कवी आणि व्याख्याते यांच्या गाजलेल्या साहित्याची आणि चरित्रांची ओळख समर्थपणे समर्पक शब्दांत केली आहे.त्यातील काही कथा,काव्य, गोष्टी आणि सुविचार असे शब्दांच्या धनांची पेरणी केली आहे.मला तर वाचन करताना वाक्यांवाक्यागणिक वचन आणि विचार दृष्टीस पडतात.विचार वैभव उत्तमोत्तम आहेत.वाचतानाच चिंतन आणि मनन करण्याची गरज भासते.अनेक लेखकांच्या चांगल्या पुस्तकांची यादी मिळते.त्यांचे साहित्य वाचण्याची रुची निर्माण होते.

   'स्नानाने शरीराची स्वच्छता तर मनाच्या उन्नयनासाठी पारायणाचे प्रांगण आणि ग्रंथाचे पारायण प्रेरक ठरते.

आपट्याच्या पानाने दसरा तर आंब्याच्या पानाने पाडवा साजरा केला जातो.पण उभे साजरे व संपन्न करण्यासाठी उत्तम ग्रंथांची पानेच उपयोगी पडू शकतात.अशी पाने निर्माण करण्यासाठी साहित्यिक- कलावंतांना शब्द-शब्द जुळवावे लागतात.त्यानंतर कुठे वाचकाला सुमधूर फळे चाखायला मिळतात.उत्तम ग्रंथ हे लेखकांच्या विचारांनी सजलेली मधाची पोळीच असतात.'असे विचारधन डॉक्टर यशवंत पाटणे यांनी ललित लेखनातून व्यक्त केले आहेत.या ग्रंथांत ऋषितुल्य प्रतिभावंत साहित्यिक वाणीचे माधुर्य आणि विचारांचे ऐश्वर्य लाभलेले प्राचार्य शिवाजीराव भोसले,

मराठी ग्रामीण साहित्यिक प्रा.व.बा.बोधे यांचे 'रानपालखी'

आत्मचरित्र, साहित्य पंढरीचे वारकरी प्रा.डॉ.दशरथराव भोसले,प्रसन्न शैलीचे लेखक अरुण शेवते, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर नरेंद्र जाधव, पुरोगामी विचारवंत डॉक्टर आ.ह.साळुंखे,लोकप्रिय कवी इंद्रजित भालेराव,रसिकमान्य वक्ते प्रा.डॉ.निर्मलकुमार फडकुले,लोकमनाचे समाजप्रिय नेते आर.आर.आबा, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ऋषितुल्य प्रतिभावंत साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या 'ययाती'व 'मुरली या ग्रंथाची 'मुरलीचे सूर' ही कथा,यांच्या सह इतर साहित्यसम्राटांची आत्मचरित्रपर ग्रंथ आणि पुस्तकांची अक्षरयात्रा कथांमधून सजली आहे. तसेच संस्काराचे मंगलकलश,उत्तम ग्रंथ कसे वाचायचे,सुविचारांचे अमृत कुंभ,जय महाराष्ट्र,सातारा ग्रंथ महोत्सव ,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि माझा मऱ्हाठीचा बोलू इत्यादी लेख खरोखरंच रसिक वाचकांना सत् विचार देतात.मराठीची गोडवी व्यक्त करतात.ललितलेख अक्षरसोहळे सजवितात.

शब्दफुले उद्याच्या पिढीला प्रेरणा देतात.अत्यंत सुंदर शब्दातील अभ्यासपूर्ण लेखांमधून  मौलिक विचारधन रसिकांना वाचायला आवडतील.

एकमेका ग्रंथ देवू,

    देता देता मित्र होऊ,

संस्कृतीचे गाणे गावू,

    चैतन्याचा मंत्र जपू

परिचयकर्ता-श्री रवींद्ररकुमार लटिंगे ओझर्डे वाई

 🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

पुस्तकाचे नाव-सहावे सुख

लेखक-डॉक्टर यशवंत पाटणे

प्रकार-ललित लेखन 

आवृत्ती- सातवी

प्रकाशन- शब्द प्रकाशन, सातारा

पृष्ठे-१५६

किंमत-२००₹

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड