पाऊले चालती प्रवास वर्णन शुभेच्छा! माने सर निकम सर
सौंदर्यशोधक दृष्टी , प्रसन्न मन अन अपरिचित वाटा तुडवणारे पाय घेऊन सदैव निसर्गातील अलौकिक सुंदरतेचा मागोवा घेत सातत्यानं फिरणं यातच काहींच स्वर्गीय सुख असतं.असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे रवींद्रकुमार लटिंगे. सह्याद्रीच्या कुशीत राहून विंध्याचल पार करून हिमालयापर्यंत मुशाफिरी करत अवघा भारत मित्रमंडळी सोबत फिरून आपल्या साध्यासोप्या भाषेत शब्दबद्ध करण्याचं काम सरांनी केलं.वाई महाबळेश्वर च्या रम्य परिसरात राहून जवळची पठारे, नद्या,ओहळ,रानवाटा पायाखाली घातलीच पण अनेक किल्ले ,अभयारण्य ,समुद्रकिनारे अन पर्यटन ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या ,
पर्यटनाचा आनंद त्यांनी घेतलाच पण तो इतरांना मिळावा म्हणून शब्दबद्धही केला.
खरतरं आजकाल प्रवासाची अनेक साधनं अन इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे आणि पर्यटनाची आवड निर्माण होत आहे,अशा नवपर्यटकांसाठी सरांचं 'पाऊले चालती' हे पुस्तक मार्गदर्शक आहे.त्यांच्या लेखनाचं वैशिष्टय म्हणजे साधे सोपे नेहमी आपल्या बोलण्यात येणारे शब्द सहज पेरत तिथली बारीकसारीक माहिती मांडण्याचं कसब. जणूकाही ते आपल्या समोर बसूनच प्रवास वर्णन करत आहेत.आपलं मनही त्यासोबत प्रवास करीत राहते. त्यांचे लेख वाचत असताना, त्यातील वर्णनाने त्या स्थळाला भेट देण्याचा मोह वाचकांना झाल्यावाचून राहणार नाही.
'पाऊले चालती 'या प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा!
उद्धव निकम
छायाचित्रकार,वाई
श्री रवींद्रकुमार लटिंगे सरांच्या माझी भटकंती या सदरातील एकेक अफलातून प्रवासवर्णने सरांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारली आहेत.सरांच्या सातत्य व जिद्दीला सलाम.तसेच भेटी दिलेल्या सर्व स्थळांची तपशीलवार माहिती वाचणे म्हणजे एक अभूतपूर्व पर्वणीच लॉक डाऊनच्या काळात होती.त्यांच्या निसर्गातील प्रवासवर्णनाने शौर्य, धैर्य, ज्ञान, दया, प्रेम आणि चातुर्य मिळते.खरा मोठेपणा भ्रमंती मधून साध्य होतो तसेच या भ्रमंती मधून त्यांनी स्वतः बरोबर दुसऱ्यांनाही सामावून घेतले आहे.मी त्यांच्या सोबत वासोटा ,कासपठार, ठोसेघर आणि औंध-खरसुंडी-पोशेवाडी भटकंती केली आहे. भ्रमणशीलता जपून आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सर्वांना अनुभवण्यास दिली आहे. सरांना 'आशा' आणि 'डोळस श्रद्धा'या नावाचे दोन ज्ञानचक्षू लाभले आहेत.त्यामुळे भ्रमंती मधून सकारात्मक विचारांची शिदोरी आम्हाला सापडते.अशी स्वकर्तृत्वाने पुढेज्ञआलेली माणसे पसरलेल्या जगाच्या मंदिरात प्रेमाचा घंटानाद करत असतात. किर्तीमान,यशवंत होतात. थोडक्यात जीवनाचा खरा अर्थ दुसऱ्याला संतुष्ट ठेवण्यात असून तेच खरे जीवनाचे सत्य आपणाला सरांच्या भ्रमंती वरुन कळते. सरांच्या पदभ्रमंतीची प्रेक्षणियस्थळे आपणास दृढविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्तीने केलेल्या प्रवासाची दुनियादारी वाचायला मिळते. यापुर्वी सरांच्या वाचलेल्या साठवणीतल्या आठवणींचे 'माझी भटकंतीचे ', 'पाऊले चालती' या प्रवासवर्णनरुपी पुस्तकास माझ्याकडून मनपुर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
श्री शिवाजी निकम
क्रिडा समन्वयक वाई, महाबळेश्वर
शुभम्
बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचे धनी श्री.रवींद्र लटिंगे यांनी लिहिलेले त्यांचे पहिलेच "पाऊले चालती" हे प्रवासवर्णन प्रकाशित होत आहे,हे समजल्यावर अतीव आनंद झाला.
प्रवासातून ज्ञान मिळावं, आणि ज्ञानातून प्रवास कळावा,असा हा दुतर्फा प्रवास त्यांनी केला आहे. प्रयत्नपूर्वक,कष्टातून प्रवास करावा. प्रवास वर्णनपर लेखन करावं,वाचकांहाती ते द्यावं.लेखन ज्यांच्या डोळ्यांपुढून जाईल,त्यांना एक दृष्टी प्राप्त व्हावी,त्यांनी त्यांच्या भ्रमंती-भटकंतीच्या कक्षा वाढवाव्या. पर्यावरणाच्या निकट सानिध्यात जावं आणि त्यातूनच पर्यावरणस्नेही बनावं.नव्या पर्यटनाच्या जागा,त्यांचे स्थानमहात्म्य या परिघाचा विस्तार व्हावा,या हेतूने त्यांनी लिहिलेली लेखमाला उपयुक्त आहे.
शिक्षण क्षेत्रात कामच करणारे,त्या क्षेत्रावर आपला ठसा उमटवणारे,त्या क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकणारे श्री.लटिंगे सर आहेत. सुवर्णाक्षरांनी मढवावी,एवढ्या तोलामोलाची शिक्षण क्षेत्रावरील त्यांची स्वाक्षरी आहे!
त्यांचं पाऊल ज्या रान-वाटांवर दगड-धोंड्यावर,पहाड- टेकड्यांवर,सागर-
किनाऱ्यांवर पडले, त्याचे दर्शन येणाऱ्या नव्या पिढ्यांना घडावं.त्यातून त्यांनी निसर्ग सहवासाची,संवर्धनाची प्रेरणा घ्यावी.एवढे सामर्थ्य या लेखांमध्ये नक्कीच आहे!
या शब्ददीपांतून आपल्याही वाटा उजळून निघतील- निघाव्यात,या शुभेच्छा!
▫️ विठ्ठल माने
वाई (सातारा)
Comments
Post a Comment