३४|पुस्तक परिचय, आचार्य अत्रे विनोद आणि आठवणी
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-३४
पुस्तकाचे नांव--आचार्य अत्रे विनोद आणि आठवणी
लेखकाचे नांव--पुंडलिक सिदू लव्हे
प्रकाशक-पुंडलिक प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-डिसेंबर २०११/ प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-१६४
वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--
मूल्य--१५०₹
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
३४|पुस्तक परिचय
आचार्य अत्रे विनोद आणि आठवणी
लेखक-पुंडलिक सिदू लव्हे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
महाराष्ट्राचे साहित्यसम्राट दैनिक'मराठा' वर्तमानपत्रातून ज्वलंत समस्येवर वास्तववादी परखडपणे अग्रलेख लिहिणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे.फर्डेवक्ते, शिक्षण,
राजकारण, पत्रकारिता,साहित्य,नाटकं आणि सिनेमा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन रसिक श्रोते आणि वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अनभिषिक्त सम्राट म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे साक्ष देणारे,पैलूंचा उलगडा करणारे "आचार्य अत्रे विनोद आणि आठवणी'हे आचार्यांचे चाहते आणि निस्सीम भक्त लेखक पुंडलिक लव्हे यांनी हे पुस्तक रसिकांना रसग्रहणासाठी अनमोलभेट दिले आहे.
आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राच्या वैचारिक क्षितीजावर असामान्यपणे फर्ड्या अस्सल शैलीत हजरजबाबीपणे घणाघात करणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य प्रभावी नेते.या पुस्तकात साहित्य वाड़्मयातील वेचक वेधक विनोद व किस्से निवडून त्यांच्या जीवनाचे परिपूर्ण चित्र उभे केले आहे.अत्यंत आत्मियतेने आणि मेहनतीने लेखकांनी हा साहित्य संग्रह तयार केला आहे.त्यांच्या हजरजबाबीपणाचे साक्षीदार हे पुस्तक आहे.'हशा आणि टाळ्या यांच्या गजरात वाढले,लढले आणि मोठे झाले.'अशा शब्दात नामवंत मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.
हे पुस्तक मला ओझर्डे येथील नाट्य चाहते मित्रवर्य श्री रवींद्र जाधव (बाळू दादा) यांनी अभेपुरी येथे घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्नेह्याचीभेट देवून कौतुक केले होते."आचार्य अत्रे विनोद आणि आठवणी"या संकलित संग्रहात नामवंत मान्यवरांची कौतुक स्तुती सुमने अक्षरशिल्पात आहेत.त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची छायाचित्रेही रेखाटली आहेत.त्यांच्या वाणी आणि लेखणी तून हजरजबाबीपणा आणि विनोदबुद्धीने घडलेले बहारदार प्रसंग, विनोद, किस्से आणि मुद्दे यांचे एकत्रिकरण केले आहे.मराठीची अस्मिता जपणारे स्वाभिमान निधड्या छातीचे स्वत:च्या बाण्याने वागणारे अग्रलेखांचे लेखणी सम्राट आचार्य अत्रे यांचे विनोदी किस्स्यांचे संकलन वाचायला उपलब्ध करून दिले आहे.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे माझे दैवत माझे आई-वडील जेवढे प्रिय तेवढेच ते.. मराठी चौथीमध्ये शिकत असताना 'चुरगळलेला पतंग'हा धडा आम्हास होता.व त्याचे लेखक होते आचार्य अत्रे.हा धडा वाचल्यानंतर त्यांच्या प्रेमात पडलो तो कायमच.विलक्षण ओढ लागली. तद्नंतर त्यांचे जमेल त्याप्रमाणे 'मराठा' या दैनिकातील अग्रलेख वाचत असे.सासवड येथील प्रचारसभेतील भाषण ऐकण्याची संधी मिळाली.हे मी माझे भाग्य समजतो. असं लेखक पुंडलिक लव्हे मनोगतातून व्यक्त झालेत.त्यांनी आचार्य अत्रे यांच्या अनेक पुस्तकांचा रसास्वाद घेतला आहे.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या महतीची साक्ष आणि मोठेपणा अनेक प्रतिभावंत आणि मान्यवरांनी लिखित केला आहे.
हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणतात की,''आचार्य अत्रे म्हणजे महाराष्ट्राचा पुरुषार्थ होता.ते म्हणजे मराठी अस्मितेचे,स्वाभिमानाचे बलदंड प्रतिक होते.लेखणी आणि वाणी यात श्रेष्ठ कोण हे सांगणे कठीण आहे.
दोन्ही शस्त्रे त्यांनी हवी तशी वापरली.ते अष्टपैलू होते.हशा आणि टाळ्यांचे बादशहा होते."
आचार्य अत्रे यांच्याशी आमचे कऱ्हेचे नाते आहे.त्यांचे साहित्य आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मितीमधील कार्याविषयी योगदान गौरवशाली आहे", असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी म्हटले आहे.
तर महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल.देशपांडे गौरव करताना व्यक्त होताना म्हणतात की,"गेली तीस वर्षे हा चौघडा झडतो आहे.आणखी काही वर्षे झडायला हवाय.लाख लोकांच्या हसण्यातून जो प्रचंड निनाद उठतो,लाख लोकांच्या टाळ्यांच्या कडकडाटातून जे वादळ निर्माण होते.त्याची बेहोषी काही अलौकिक असते.राष्ट्रावर आणि महाराष्ट्रावर प्रत्येक आणीबाणीच्या प्रसंगी आचार्य अत्रे यांनी आपली लेखणी बेफाम घोड्याच्या वेगाने दौडविली आहे.
आचार्य अत्रे नसते तर संयुक्त महाराष्ट्राची ठिणगी विझली असती."
आचार्य अत्रे यांची कन्या शिरीष पै म्हणतात की,
'साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जीवन इतिहासातील पानन् पान त्यांना मुखोद्गत आहे.
वाड्मयातील वेचक वेधक विनोदांचे संकलन या साहित्य कृतीत मांडले आहेत.'
खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही अभिप्रायात त्यांच्या आठवणी नमूद केलेल्या आहेत.त्या म्हणतात की,
''आचार्य अत्रे यांच्या विविध छटा या पुस्तकात जागोजागी विखुरलेल्या आहेत.''
संग्रहीत आठवणीतील विनोदांचा आस्वाद घेताना त्यावेळचा काळ डोळ्यासमोर उभा राहतो.'असे विचार कृष्णकांत कुदळे यांनी व्यक्त केले आहेत.
तसेच मधूकर राव, शारदाबाई गोविंदराव पवार,तात्यासाहेब शिरवाडकर, मधूकर भावे,साथी एस.एम.जोशी ना.ग.गोरे,वि.स.खांडेकर,मधून दंडवते आदींचे गौरवोद्गार रसिक वाचकांना उपलब्ध करून दिली आहेत. तसेच साधारणपणे २५० किस्से या पुस्तकात संग्रहित असून कृष्णधवल छायाचित्रे त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देतात.'आचार्य अत्रे आणि पुणे' या लेखात पुणे महानगरपालिकेत असताना केलेल्या विकासाचा अहवाल वाचायला मिळतो.आचार्य अत्रे यांचे किस्से म्हणजे रसिक वाचकांना अनमोल भेट होय.अप्रतिम ! संग्राह्य असावे असे 'आचार्य अत्रे विनोद आणि आठवणी' पुस्तक आहे.
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
पुस्तक सारांश व परिक्षण खूपच छान..!!! अनेकदा आपल्या लेखनाचा उपयोग सूञनिवेदन करतानाही निश्चितपणे होणार ..खूपच छान शब्दांकन...!!!
ReplyDeleteधन्यवाद दोस्त नितीन जाधव सर
ReplyDelete