२३|पुस्तक परिचय क्रांतिसूर्य
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
२४|पुस्तक परिचय
क्रांतिसूर्य
लेखक- विश्वास पाटील
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
सह्याद्रीचा क्रांतिसिंह तू शिवबांचे देणे
जागृत केला महाराष्ट्र तू सिंहगर्जनेने ||
ऋषितुल्य प्रतिभावंत आचार्य अत्रे यांचे कवन क्रांतिसूर्य देशभक्त नाना पाटील यांच्या भूमिगत चळवळीतील कार्याची प्रचिती येते."क्रांतिसूर्य"ही लोकप्रिय महानायक, संभाजी आणि पानिपत आदी ऐतिहासिक कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची क्रांतिसिंह झुंजार नेते नाना पाटील यांच्या जीवन चरित्रावरील कांदबरी आहे.प्रतिभावंत जेष्ठ साहित्यिक माधव गडकरी यांची प्रस्तावना या कादंबरीला लाभली आहे.
भारतीय लोकसभेत महाराष्ट्राचा मराठी भाषेतला आवाज प्रथम ऐकविणारे नाना पाटील! ढाण्या वाघासारखी अनाहुतपणे क्राॅंग्रेसची सभा गाजविणारे पहाडी आवाजाचे नाना! या कादंबरीतील सर्वच व्यक्ती संवादातून रेखाटलेल्या आहेत.सहज सुंदर ग्राम्यबोलीत लेखनशैली रसिक वाचकांना खिळवून ठेवते.त्यामुळे सर्व व्यक्ती वाचताना आपल्याशी बोलतात.
देशभक्त,स्वातंत्र्यसैनिक, महाराष्ट्राचे झुंजार नेते,प्रभावी वक्ते नाना पाटील, जबरदस्त आत्मविश्वासाने सभा गाजविणारे फर्डे वक्ते.गावखेड्यातील कुस्तीच्या आखाड्यात पैलवान जसे चपळाईने आखाडे गाजवितात.तसे नाना आपल्या रांगड्या भाषेत खेड्यातील शेतीभाती आणि शेतकऱ्यांची उदाहरणे,दाखले देऊन आपला विषय ठामपणे मांडून श्रोत्यांना गुंगवून टाकीत.लोक नानांचे भाषण ऐकायला उत्सुक असायचे.जनसेवा करत देशसेवा करुन आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्ततेसाठी भूमिगत राहून अलौकिक कार्य केले.सतत अहोरात्र साथ देणारे क्रांतिअग्रणी जी.डी.लाड,शाहीर शंकरराव निकम नागनाथ अण्णा नायकवडी इत्यादी जीवाभावाचे सहकारी होते.नानांवर युवक काळात सत्यशोधक समाजाच्या विचारांनी गारुड केले.समाज सुधारणेचे व्रत हाती घेतले.
त्यांनी वंचित अज्ञानी समाजातील लोकांची 'सत्यशोधक पध्दतीने' तर महात्मा गांधीचे विचारांनी प्रेरित होऊन 'गांधी पध्दतीने ' मानपान,हुंडा आणि जेवणावळी नघालता अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने लग्न लावून दिले होते.क्रांतिसूर्य नाना पाटील यांच्यावर ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव होता.त्यांनी स्वत:पत्नी आकूला साक्षर केले.त्यांच्या मनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सारखे पत्नीला बहुजन समाजातील शेळ्या मेंढ्यांच्या मागं जाणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षिका करायचे होते. पण ते मनीचं स्वप्न अधूरं राहिलं.
भारतभर 'प्रतिसरकार'म्हणून लोकप्रिय झालेले होते. नानांनी सातारा भागात गावोगावी जनसेवेसाठी प्रतिसरकार स्थापन केले होते.इंग्रजांसाठी हेरगिरी करणाऱ्या गावपाटील तलाठ्यांना वठणीवर आणण्यासाठी , गावातील विघ्नसंतोषी गावगुंडांना आणि इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या गावभेदी अस्तनीतल्या निखाऱ्यांना वेताच्या काठीने पायाचे तळवे फोकळत असत.अशा लोकांना वचक बसून सामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून म्हणून प्रतिसरकार काम करत होतं.'करो या मरो'या मंत्राप्रमाणे इंग्रजांना सळो की पळो करण्यासाठी पोस्टखाते,रेल्वेचे रूळ उखडणे,खजिना लुटणे आणि पोलीस ठाण्यांवर छापे टाकून स्वातंत्र्याच्या चळवळीला पैसा उभा करणे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना दोन वेळा खासदार झाले.त्यांची राजकीय कारकीर्द क्रांग्रेस, शेतकरी कामगार पक्ष,कम्युनिस्ट पक्ष करत जनसामान्यांच्या साठी आयुष्यभर संघर्षात कष्टप्रद जीवन जगले.सांस्कृतिक मंडळातून ते रशियाला जाऊन आले होते.तिथं त्यांनी भाषणं केली होती.तिथून आणलेली माती आपल्या शेतकऱ्यांचा भाळी लावून शेतीच्या समृद्धीचा प्रसाद दिला होता.
'तुम्हीआम्ही दीडवितीच्या पोटासाठी काळजी असणारी माणसं नानांना विसरू, मात्र शिवप्रभूंच्या ज्या सच्च्या मातीने त्यांना जन्म दिला, ती ते कसं विसरेल?चर्चिल सारख्या साम्राज्यवाद्यांच्या निळा डोळ्यांत धूळ फेकणारे नाना,सत्यशोधकांसाठी- देशासाठी घरावर निखारे उतणारे नाना ,कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून दलितांसाठी खराटा उचलणारे नाना, दलितांना पाणवठे उपलब्ध करून देण्यासाठी गाव खेडाशी झगडणारे नाना!संयुक्त महाराष्ट्राच्या बुलंद आवाजाची बेधडक तोफ नाना! ही एका साध्या शेतकऱ्याच्या पोराची अनंतरुपे विसरायला महाराष्ट्रमाती बेइमान निश्चितच नाही. स्वातंत्र्यानंतर क्रांतिसिंह डाव्या चळवळीकडे झुकले. त्यामुळे त्यांच्या कार्यावर पडदा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण आताशी त्याला वाचा फुटते आहे. त्यांचा अल्पस्वल्पसा प्रयत्न म्हणून जरी माझी ही चार पाने उपयोगी पडली तरी मी स्वतःला धन्य समजतो.'असे विचार लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केले आहेत.
"क्रांतिसूर्य"ही कादंबरी नाना पाटील यांच्या संघर्षाच्या इतिहासाची गौरव गाथा झाली आहे.१९४२चा स्वातंत्र्याचा लढा भूमिगत राहून इंग्रजी सत्तेला हादरे कसे दिले.
सामान्यलोकांनी या क्रांतिकारकांना मदतीचा हात कसा दिला.इत्यादी घटनांचे वर्णन वाचताना जीवंत बोलके वाटते.खरोखरच क्रांतिकारकांचे नेते,जाज्ज्वल्य देशाभिमानी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अलौकिक कार्य वाचायला मिळाले.अप्रतिम सहजसुंदर शब्दात ओघवत्या बोलीतील चरित्रात्मक कादंबरी आहे.
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे, वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment