४०|पुस्तक परिचय,वपु सांगे वडिलांची किर्ती






🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

      ४०|| पुस्तक परिचय

       सांगे वडिलांची कीर्ती

         लेखक--व.पु.काळे

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

          अण्णांनी रंगविलेले पडदे नाटकात प्रसन्नपणे आमच्यामागे उभे असतात.तसेचआम्हा अनेकांच्या मागे अण्णाही प्रसन्नपणे 'शाब्बास'म्हणायला उभे असतात. प्रसन्नता त्यांच्या कलाकृतीत दिसते.त्यांच्या बोलण्या वागण्यात अन् विनोदातही दिसते.वाणीचे सामर्थ्य कुंचल्यातून(ब्रश) साकार करणारे प्रसिद्ध नेपथ्यकार ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आदरणीय पुरुषोत्तम काळे.अनेक रंगमंच,नाटक आणि सिनेमांना चित्रिकरणासाठी बॅकराउंडला लागणारे पडदे रंगवणारे रंगकर्मी अण्णा.यांचे व्यक्तिचित्र त्यांचेच सुपुत्र व.पु.

काळे यांनी "सांगे वडिलांची कीर्ती"या ग्रंथात रेखाटले आहे.हा 'नेपथ्यपट' खुमासदार शैलीत परखडपणे  उलगडून दाखवला आहे.

        सामान्य माणसाच्या मनाला भिडणारी भावस्पर्शी कथा,कादंबरी व विचारवैभवांचे लेखन करणारे जेष्ठ प्रतिभावंत लेखक वसंत पुरुषोत्तम काळे, रसिक वाचकांचे लोकप्रिय 'वपु काळे'.यांच्या विचारधनाचे वेचे हल्लीच्या सोशल मिडीयाच्या काळातही मनाचा ठाव घेऊन विचार करायला लावतात. कैकजन स्टेटस अथवा फेसबुकवर शेअर करतात.पेशाने वास्तुविशारद असणाऱ्या वपुंनी अनेक शब्दांचे राजवाडे आणि महाल उभारुन आपल्या भावस्पर्शी कथांनी रसिक वाचकांच्या मनावर गारूड केले आहे.

अमेरिका येथील मराठी साहित्य संमेलनाचे 'अध्यक्षपद' त्यांना बहाल करून साहित्यिक म्हणून सन्मान केला होता.

तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा पु.भा.भावे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.अनेकजण'रंग मनाचे' दाखवणाऱ्या वपुंना आपला पार्टनर मानतात.हा पार्टनर आणि त्यांचे लेखन रसिकांच्या मनात अगदी खोलवर विराजमान झाले आहे. हा असाच दोस्ती निभावणारा रसिक वाचकांचा लेखक कथेच्या पॅटर्न मधून अण्णांविषयी परिचय करून देतात. 

  पुरुषोत्तम काळे  (अण्णा) जेष्ठ रंगकर्मी नेपथ्यकार मेणवलीत बालपण घालवितो.स्वत:च्या कर्तृत्वाचे क्षेत्र म्हणून  हैद्राबाद-मुंबईत हयात गाजवितो.नेपथ्याची यात्रा संपवून जिवापाड जपलेल्या आठवणींच्या डायऱ्या, पेंटिंग्ज,चित्रकला अल्बम,विनोदी लेख,

हस्ताक्षरसंग्रह, मंगलाष्टके जपून ठेवा ठेवतात.लेखक म्हणतात,'अण्णांच्या बद्दलच्या माझ्या सर्व भावना मी पुस्तक रूपाने त्यांच्या हयातीत व्यक्त करु शकलो.

हे बोलायचं राहून गेलं…'यासारख्या दु:खातून मी मुक्त झालो.या व्यक्तिचित्रास आदरणीय ख्यातनाम विनोदी लेखक पु.ल.देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे.

लेखक व.पु.काळे यांना वडिलांकडून लाभलेली आयुष्याच्या शिदोरीचा सहवास  लेखमालिकेतून प्रभावीपणे गुंफला आहे.रुम-पार्टनर अण्णा,अभी तो मैं जवान हूॅं!,करता यह भी याद नहीं?,हे का लिहायचे? संकोच वाटतो,हे दु:ख न संपणारे...….., का…? आणि दुर्मिळ नेपथ्यपट व सत्कार, गौरव समारंभाची कृष्णधवल छायाचित्रे रेखाटली आहेत.

या व्यक्तिचित्रात अण्णांच्या जीवनकार्याविषयी 

अनेक नामवंतांचे अभिप्राय आहेत.अण्णांची प्रसन्नता ,

कार्यशीलता,टापटीप आणि कर्मयोगी जीवन आणि लेखक मुलांविषयी आपुलकी प्रत्येक पानावरील शब्दाशब्दांतून जाणवते.'बाप-लेक दोघेही कलावंत चित्रकार पित्याचा कुंचला मुलाच्या हातात लेखणी होऊन आला आहे.'

असं ऋषितुल्य प्रतिभावंत लेखक गदिमा ,व पु काळे यांचा परिचय कथाकथन कार्यक्रमात करुन देतात.

लहानपणचे खेळ,क्रिकेट आणि नाट्य संगीताची आवड गाणी ऐकताना गाजलेल्या जुन्या काळातील गाणी गुणगुणणारं ,हरखून जाणारं त्यांचं मन,लहानसहान गोष्टीत रस घेतल्याची त्यांची वृत्ती पानापानांतून जाणवते.

अण्णा कुंचल्याने चित्र रेखाटण्यात जितके यशस्वी झाले ,तितकेच लेखकही लेखणीने चित्र रेखाटण्यात निष्णात आहेत.हे पुस्तक वाचताना जाणवते.सुंदर भावनाप्रधान लेखन शैलीत वडिलांचे व्यक्तिचित्र वाचताना नजरेत येते.घटना आणि प्रसंगाचे लेखन हृदयस्पर्शी आहे. नेपथ्यकार अण्णांची स्वभाववैशिष्टये ललितकलादर्श,

प्रेमळपणा,मितभाषी,अभिजात विनोद वृत्ती,साधी राहणी,

उद्योगशीलता यांचे मनोवेधक चित्र उभे केले आहे.

         अलिप्त वृत्तीने जीवन यात्रा पार करीत असताना, कोणत्या मुक्कामावर तुमचा जीव गुंतला होता, ते समजलं नाही. आम्ही अंदाज करीत गेलो,ते चुकत राहिले. आम्ही काही ना काही शब्द देत गेलो, तुम्हाला खात्री वाटली नाही.तुमच्या इतका निग्रह आणि शब्द पूर्ण करण्याची कुवत आमच्यापैकी एका जवळही नाही.  हे जाणून तुम्ही शांत होतात,की तुमच्या अपूर्ण इच्छेपर्यंत आम्हालाच पोहोचता आलं नाही? तुमची शुद्ध जाण्यापूर्वीच्या क्षणाची ती एखादी इच्छा होती, की संपूर्ण आयुष्यभर बाळगलेली खंत होती, हे कसं समजावे ?असे चित्र लेखक व. पु.काळे यांनी 'सांगे वडिलांची कीर्ती ' या व्यक्तिचित्रात व्यक्त केलं आहे


परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई


🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾🍂🍃

पुस्तकाचे नांव- सांगे वडिलांची कीर्ती

साहित्य प्रकार-व्यक्तिचित्र

लेखक-व.पु.काळे

प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे

पृष्ठे--९६

आवृत्ती-पुनर्मद्रण २०१८

किंमत--१२०₹

🍀🌿🌾🍃🍂🌳



Comments

  1. वडीलांची किर्ती छान अधोरेखित केली आहे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद दोस्त नितीन जाधव सर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड