४४|पुस्तक परिचय,दैना





📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚  

  ४४|पुस्तक परिचय

                 दैना

लेखक-भास्कर भोसले

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

 पोटासाठी जगाच्या राखणी केलेल्या 

चोरट्यावानी आयुष्य वेचीत बसलो 

 गळाले हात जुलमी बेड्यांनी

आधुनिक युगातही कायमच भटक्याच राहिलो

मोहापायी या सजाच होत गेली 

काटे तुडवीत पळताना रक्तबंबाळ झालो…..

नवोदित लेखक आणि कवी भास्कर भोसले यांची जगण्याच्या संघर्षासाठी करायला लागणाऱ्या यातना वरील कवितेतील ओळी वाचताना काळजाचा ठाव घेतात.त्यांचीच 'दैना'ही आत्मकथन करणारी कादंबरी वंचित पारधी समाजाच्या संघर्षमय जगण्याचं प्रतिनिधित्व करणारी आहे.स्वत: लेखकांनी यातना भोगल्यात,सहन केल्यात आहेत.दैना कांदबरीस महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मिती पुरस्कार , महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा 'मृत्यंजय' पुरस्कार , 'नव ऊर्जा अभिनंदन युवा पुरस्कार (कोलकाता) आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनेही सन्मानित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या कादंबरीच्या एकोणविस आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.सदर पुस्तक शाळा व महाविद्यालयातील ग्रंथालयासाठी पुस्तक निवड समितीने  या पुस्तकाची शिफारस केली आहे.तरुण तडफदार युवा लेखक पारधी समाजातील असून पेशाने महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात सेवक आहेत. 

 साहित्य,संस्कृती , समृद्धी आणि दैना या चार शब्दाच्या आधारावर जीवनाला आकार देत गुरुवर्य मित्रांनी वर्गणी काढून 'दैना' कादंबरी प्रकाशित केली आहे.हे त्यांचे बंधू नामदेव भोसले तळमळीने नमूद करतात.अनेक ऋषितुल्य प्रतिभावंत लेखक,कवी,राजकीय नेते, पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवरांनी या पुस्तकाचे कौतुक केले आहे.सामाजिक चळवळीतील लेखक लक्ष्मण गायकवाड यांनीही कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

पारधी समाजातील एका तरुण लेखकाने आयुष्य भर आई-वडिलांबरोबर समाजाच्या शिव्या-शाप आणि पोलिसांचा पाठलाग चौकशीच्या काळातील दयनीय अवस्थेचे प्रतिबिंब 'दैना'या आत्मचरित्रपर कादंबरीतून अक्षररुपाने समाजापुढे आणले आहे.

  सन्मानित लक्ष्मण सूर्यभान यांची या पुस्तकाला प्रस्तावना लाभली आहे.त्यांनी अतिशय धगधगत्या शब्दात मनातील भावना प्रस्तावनेत व्यक्त केल्या आहेत. गावाबाहेरच्या मोकळ्या रानात वाऱ्यानं फडफडणारी काही पारध्यांची पालं,त्यातील फाटकातुटका संसार.त्या सारखचं फाटकं  उध्वस्त आयुष्य.सदैव मातीचा अभिषेक करणारी……..आणि शिक्षणापासून कोसो दूर असणारा पारधी समाज.आयुष्यभर चांदण्यांचा शीत रस कोळून पिण्याऐवजी दु:ख कोळून पिण्याची वेळआली.

 ज्यांच्या डोळ्यात अश्रू ऐवजी रक्ताच्या धारा ओघळल्या,सर्रास गुन्हेगारांचा कलंक माजी मारुन पोलिस आणि समाजाने बेदम मारहाण केली.आकाश कोसळणारा आकांत ऐकून, सहन करुन, साकळलेल्या

रक्ताची लाख करुन आयुष्य घडविण्याचा सदैव प्रयत्न केला.त्या जखमी वेदनांचा वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न लेखकभास्कर भोसले यांनी केला आहे.

  त्या पालातील पारधी समाजाच्या उपेक्षाची व  वेदनांची चित्तर कथा दैना पुस्तक वाचताना पानोपानी लक्षात येते.त्यावेळी मन हेलावते. दारिद्रय आणि हालअपेष्टांनी कढत असणारा समाज आहे.याचे मनोमन दु:ख वाटते.

लेखक भास्कर भोसले 'दैना' कादंबरीचे लेखक तळमळीने मनोगतात व्यक्त होतात.

'दैना' ही तीन पिढ्यांचे आणि तमाम पारधी समाजबांधवांच्या हालअपेष्टांची कादंबरी आत्मकथात्मक आहे.काळीज पिळवटून टाकणारी हृदयस्पर्शी व्यथा वास्तपणे सहज सोप्या भाषेत मांडली आहे.फाटक्या पालात राहूनही त्यांनी शाळेत अक्षरांचे धडे गिरवले.ते शाळेतल्या प्रार्थना,गाणी,कविता ,भक्तीगीतांंत रममाण झाल्याचा उल्लेख करतात.अगदी लहान वयात त्यांनी बलुतं,उपरा,आणि उचल्या आदींसह इतर कथा कादंबऱ्यांचे वाचन केले होते.त्यातील उपेक्षित वंचित समाजासाठी चळवळ उभारणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव आणि विचारांचे वादळ अवतीभोवती घोंगावू लागले.माणूस होऊन जगण्याचे स्वप्न सत्यात साकारावे म्हणून लाभलेल्या व्यक्तींचा ते आवर्जून उल्लेख करुन ऋण व्यक्त करतात.

अतिशय वेदनेने तळमळीने अभ्यासपूर्वक सुक्ष्मपणे घटना प्रसंग लिखणाने जीवंत केले आहेत.वाचताना डोळ्यासमोर एखाद्या गावकुसाबाहेरची पालं दिसतात.यातील अनेक घटना प्रसंगाने मन व्यथित होते.अतिशय कठोर परिश्रमपूर्वक लेखकाने स्वत:ची आणि समाजाची चित्तर कथा मांडली आहे.वंचित समाजातील दर्द 'दैना'साहित्य कृतीतून दाखवून दिला आहे.


परिचय कर्ता -श्री रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई


🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

पुस्तकाचे नांव- दैना

लेखक- भास्कर भोसले

साहित्य प्रकार- कादंबरी

प्रकाशन-ऋध्दी प्रकाशन,उरळीकांचन,पुणे

आवृत्ती-एकोणिसावी आवृत्ती

पृष्ठ संख्या-२१३

मूल्य-२००₹

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾






Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड