४८|पुस्तक परिचय, सुंदर जगण्यासाठी
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
४८|पुस्तक परिचय
सुंदर जगण्यासाठी
लेखक-प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
ज्यांच्या वाणीत आणि लेखनीत सदोदित नवविचारांचे सिंचन असते.असे महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी लिहिलेले 'सुंदर जगण्यासाठी' हे एक छान अक्षरशिल्प रसिक वाचकांना उपलब्ध करून दिले आहे.सातारा आकाशवाणी केंद्रावरील प्रसारित झालेली 'चिंतने' आणि दैनिक सकाळमधील अंकुर पुरवणीत 'उजेडाचा वसा'या लोकप्रिय सदर मालिकेतील सुगंधित लेख या पुस्तकात लिखित केले आहेत. प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे हे प्रथितयश व्याख्याते आणि लेखक आहेत.
त्यांच्या साहित्य कृतीला अनेक पुरस्कार आणि पारितोषिकांनी विभूषित केले आहे.लेखकांस महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करुन गौरविण्यात आले आहे.
मनुष्याच्या देहात विकार आणि विचार सुप्त रुपात असतात.कोणत्या विचाराने आयुष्याची घुसळण करायची यावर जगण्याचे सुंदरपण अवलंबून असते.आनंद ही माणसाची मानसिक स्थिती आहे.एखादं काम मनासारखं पार पडलं की माणसाचा आनंद गगनात मावेनासा होतो.
आनंद माणसाजवळ असतो.पण त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून शोधता येत नाही.तो आनंद शोधायला चिंतन मनन करायला लागते.
चांगल्या आचारविचारांचे संस्कार आचरणात आणायला संतांचे विचार,चांगली पुस्तके वाचावी लागतात. सुंदर जीवन जगण्यासाठी हा शब्द आपण आयुष्याच्या पाटीवर गिरवूया.
इंग्रजीतील 'HEALTH' शब्द आरोग्याला शब्द वापरतात.या शब्दातील प्रत्येक अक्षरात आचरणाचा अर्थ दडलेला आहे.
हॅबीट,इक्झॅम व इक्झरसाइज,अॅटिट्यूड,लव्ह,टेन्शन फ्री आणि हॅपी माईन्ड जगण्याचा मंत्र आहे.तणावमुक्त स्वच्छंदी जीवन आनंदाने जगता आले पाहिजे.मुलांचे आत्मचैतन्य जागविण्याचे काम आई-वडिलांनी केले तर ती स्वयंप्रेरणेने आभाळाएवढं यश मिळवितात.अशा विचाराने लेखक उद्बोधित करतात.आनंद शोधण्याचे मार्ग सुचवितात.
डॉक्टरांनी २८ लेखमालिकेत जगण्याची सुंदरतेची गुंफण केली आहे.सहज सुंदर आशयघन शब्दातील लेख वाचताना पानोपानी याची प्रचिती येते.आवश्यक तिथं उदाहरणे दाखले, कविता आणि थोरांची वचने आणि समर्पक अर्थ गर्भित अक्षरांची पेरणी केली आहे.सर्वच लेखांचा वाचताना गंध दरवळतो.
मानवीमुल्ये,पुस्तकांचे ज्ञानदान,संस्कारपीठे आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये यांवर लेखक प्रकाश टाकतात.मनाला आनंद देण्यासाठी छंदांची जोपासना केली पाहिजे.छंद म्हणजे निर्भेळ आनंदाचा झरा.यातील अनेक अवतरणे आणि वेचक- वेधक वाक्ये विचार करायला लावतात.मनाला लेखातील मजकूर भावतो.आत्मशोधानाने वास्तवाचे सत्य समजते.थोर पुरुषांच्या जीवन चरित्रात डोकावून पाहिले तर,जिद्द चिकाटी आणि संघर्षावर यशाचे शिखर गाठल्याचे गमक दिसून येते.पंख झडलेली पाखरे सुध्दा चैतन्याचा स्पर्श झाल्यामुळे यशाचे उंच गौरीशिखर गाठतात.हे समाजसेवक बाबा आमटे यांनी'आनंदवना'च्या रुपात दाखविले आहे.तर 'संवाद'लेखातून मनमोकळा संवाद साधण्याची गरज मूलभूत गरजांप्रमाणेच आहे.संवाद ही सामाजिक सलोखा आणि मानसिक समाधानासाठी ईश्वराने मानवाला बहाल केलेली देणगी समजतात.सुसंवाद साधण्याची कला ज्याला साधली त्यालाच जीवनाचा खरा आनंदयात्री होता येते.असं ते नमूद करतात.प्रेम आणि वात्सल्य मिळाले की माणूस खुश होतो.मावळलेले चैतन्य चेहऱ्यावर फुलते. माणसाचे खरे वैभव प्रेमात आहे.नैसर्गिक प्रेम संस्कृतीचे सात्त्विक दर्शन घडविते.संगतीच्या संस्कारातून आयुष्याची दिशाआणि दशा ठरते.
आपल्या अंत:करणातील दिव्य शक्तीला जागविण्याचे सत्कार्य गुरुंच्याकडूनच होत असते.नम्रता हा ज्ञानाचा खरा प्रारंभ आहे.आपले नशीब आपणच घडवायचे असते.एका गुरुने दिलेली मौलिक विचारांची शिदोरी सुंदर जगण्यासाठी आत्मबळ देणारी असते.आदी मौक्तिक विचार प्रेरक शक्ती देणारे वाटतात.रसिक वाचकांना आत्मबळ देणारं खूपच सुंदर पुस्तक आहे.अतिशय मौलिक लेख आहेत.
परिचय कर्ता-रवींद्र लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
📚पुस्तकाचे नांव-सुंदर जगण्यासाठी
लेखक-प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे
साहित्य प्रकार-ललित
प्रकाशन-शब्द प्रकाशन, सातारा
आवृत्ती-पंचविसावी
पृष्ठे-६४
मूल्य-९०₹
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
Comments
Post a Comment