काव्य पुष्प २१६,एक मे महाराष्ट्र दिन
एक मे महाराष्ट्र दिन
छत्रपतींची पावनभूमी
तिचा आम्हा स्वाभिमान
राज्य माझं महाराष्ट्र
आहे आम्हा अभिमान ||
केला रक्ताचा अभिषेक
एकशेसात हुतात्म्यांनी
मिळविले राज्य महाराष्ट्र
समर्पण बलिदान देऊनी||
विकासाची चक्रं फिरुनी
समृध्द होतोय महाराष्ट्र
मेहनतीनं घाम गाळती
समस्त कामगार मित्र ||
साधुसंत साहित्यिकांनी
शब्दशिल्पे साकारली
कलाकार नाटककारांनी
तालसूरात गोडवी गायली ||
शाहीर लोककलाकारांनी
साहसाची कवने रचली
आलुतेदार बलुतेदारांनी
गावरहाटी जागविली||
शाहू फुले आंबेडकर
वंचितांचे आधारवड
कर्मवीर गाडगेबाबा
बहुजनांचे आधारवड ||
बॅंका, गिरण्या उद्योग व्यवसाय
आधुनिक महाराष्ट्राचे शिलेदार
नद्या धरणं दर्या खनिजे वने
प्रगतीच्या यशाचे शिल्पकार ||
यांनी घडविला महाराष्ट्र माझा
भगवा ध्वज शौर्याची गाथा गाती
जय जय जय महाराष्ट्र माझा
कीर्तीची पताका अभिमाने डोलती ||
Comments
Post a Comment