माझी भटकंती बलकवडी धरण भाग क्रमांक ११९








माझी भटकंती 
भाग क्रमांक ११९
 🌳निसर्गरम्य बलकवडी धरण 🌳
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
        सहा महिन्याच्या लाँकडाउनच्या काळात केवळ फोनवरून संभाषण आणि लांब अंतरावरून क्षणभर गप्पा  मारुन  'गप्प' बसावं लागत होतं. भटकंती तर दुरुन डोंगर साजरे या म्हणीप्रमाणे मनातच फिरणं होत होतं.नेहमी निसर्गाच्या सहवासात भ्रमंती करणाऱ्या आम्हा मित्रांचा भ्रमनिरास होत होता , सतत घरीच रहाण्याशिवाय गत्यंतर नाही. आता घरटं सोडायचं नाही. काळजी घ्या स्वत: बरोबर सगळ्यांची. आमच्या पैकी काहीजणांची शाळा निसर्गाच्या सानिध्यात असल्याने शाळेत जाण्यामुळे  निसर्गातील डोंगररांग,धरण परिसर, रस्ता आणि ओढेनाले  वेगवेगळ्या रंगाढंगात नजरेस पडत. पण इतरांना सांगणं आणि प्रत्यक्ष बघणं म्हणजे जमीन अस्मानाचा फरक.त्यामुळेकधी फिरायला जायला मिळतंय याची वाट पाहत होतो.तशी  मार्च नंतर भटकंती झालीच नव्हती.
           एका मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अल्पोपहार घेताना गप्पांच्या ओघात कुठेतरी फिरायला जायचा विषय निघाला. त्यावर हसतखिदळत चर्चा करतानाच नियोजन ठरले.
      सर्वांनी निसर्गरम्य गोळेवाडी परिसर भेटी मान्यता दिली....
           नियोजित दिवशी घरच्यांच्या संमतीने "अँमिक्याबिलिटी "मैत्री परिवाराची भटकंती दोन चारचाकी वाहनांसह निसर्गरम्य मनमोहक परिसरात कंटाळा घालवायला निघाली.
सप्टेंबरचा महिना होता  नुकतीच दणदणीत वर्षाव करुन वरुणराजाने हजेरी लावली होती.आता तो शांत होता.ढगाळ वातावरणामुळे हवा कुंद होती.शारीरिक अंतर ठेवून ,मुखावर मास्क बांधून आणि सँनिटायझर बाँटल सोबत घेऊन निघालो होतो. नेहमीचाच रस्ता असल्याने चढ उताराच्या वळणावळणाच्या रस्त्याने गाडीच्या खिडकीतून दिसणारे  बाहेरचे दृश्य पहात
निघालो होतो. धोम धरणाचा अथांग जलाशय,कोळेश्वर  आणि महाबळेश्वरच्या डोंगराच्या अंगाखांद्यावरच्या झाडीतली इवलिशी दिसणारं घरं बघत.चराईच्या रानातलं हिरवगार गवत बघत.
सडकेच्या दुतर्फा असलेल्या गवतातली विशेषतः पिवळ्या व केशरी रंगाची काँसमाँसची फुलांचे ताटवे बघत चाललो होतो. पाऊणतासात आम्ही सगळे उळुंब-बलकवडी धरणाच्या जवळ पोहोचलो.
गाडीतून खाली उतरल्यावर समोर  ओथंबून भरलेला जलसाठा पाहून उत्साह वाढला.अप्रतिम मनमोहक दृश्ये सगळीकडे दिसत होती.हिरवेगार डोंगर  "मार्व्हलस,मस्तच,विहंगम नयनरम्य "असे 
उद् गारवाचक कौतुकाचे शब्द दृश्य पाहून मित्रांच्या तोंडून आपसूक येत होते.
   खरोखरच सुंदर दृश्य धरणपरिसराचे दिसत होते.
नजरभरी नजाकत दिसत होती.दृश्य बघत बघत आम्ही तेथील गवतावर छानपैकी विसावलो आणि निसर्गाचे रुप डोळ्यात साठवू लागलो...धरणाचा  फुल्ल झालेला जलाशय,
कोळेश्वराच्या डोंगररांगेवर असणाऱ्या  कमळगडाचे  छोटंसं रुप नजरेत भरत होते.कृष्णा नदीच्या काठावरील आणि कड्याच्या पायथ्याशी व मध्यावर असणारी वाडीवजा छोटी छोटी गावं कौलारू घरामुळे उठावदारपणे  दिसत होती. महाबळेश्वर डोंगररांगेतील कड्यावर चरणारी गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या चरताना  दिसत होत्या.ती राखणारी गुराखी झाडांच्या सावलीत बसून लक्ष ठेवत होते.
डोंगराच्या पायथ्याला असणारा वळणावळणाचा रस्ता,क्षणात भरुन येणारं आभाळ आणि माथ्याला धूसर करणारे पांढऱ्या ढगांचे पुंजके, वाऱ्याचा झोत आला की अलगद वरवर जाणारे ढग, असं सतत बदलणारे दृश्य पाहून कंटाळा व थकवा दूर पळाला.
   गवतात पहुडल्याने वेगळाच आनंद मिळत होता. लय दिवसांनी एकत्रित भेटल्यानंतर गप्पांची मैफिल रमली. अनेकविध विषयांवर गप्पा रमल्या.अधूनमधून  कुणानाकुणाची टकळी चालूच होती...
    नेहमीचं स्थळ असलं तरी आज मात्र बऱ्याच दिवसांनी बाहेर पडल्यामुळे निवांत शांत वातावरणातलं वेगळेपण जाणवत होते.सगळे हसण्या खिदळण्यात रममाण झाले होते.आनंद चेहऱ्यावर दिसू लागला होता.मग काय  विविध पोजमध्ये सगळ्यांचे मोबाईल क्लिक करु लागले.विविध क्षणदृश्ये चित्रित करत  होते..परिसर सेलिब्रिटी आणि आम्ही फोटोग्राफर असं वाटत होतं.मीही  सगळ्यांचे फोटं शुट करताना हिरव्या पिवळ्या गवतावर आणि त्यातल्या पिवळ्या फुलांवर  भिरभिरणारी पिवळी धमक फुलपाखरं,त्यांचा पिंगा  कुतूहलाने बघत होतो.
वाऱ्याबरोबर डुलणारं गवत बघताना आम्हालाही झुळूक हवीहवीशी वाटत होती कारण  कुंद हवामानाने अंगातून घाम निथळत होता...मंद हवा आलीकी छान वाटत होतं..... तदनंतर आम्ही पुढे गोळेवाडीकडे निघालो...
          पूर्वरंग 
भाग क्रमांक ११९
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड