माझी भटकंती पन्हाळगड भाग क्रमांक--१२३
☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🍂
साठवणीतल्या आठवणी
माझी भटकंती
कौटुंबिक सहल
🍁🌻पन्हाळगड, 🌻☘️
भाग क्रमांक-- १२३
दिनांक १३ नोव्हेंबर २०१८
➖➖➖➖➖➖➖
उत्तरार्ध
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या वास्तव्याने पावन झालेला ,दक्षिणेकडील प्रवेशद्वार असणारा पन्हाळगड....
पन्हाळगड समुद्र सपाटी पासून सुमारे ४००० फुट उंचीवर असून हा गिरीदुर्ग प्रकारातील ट्रेकिंग साठी सुलभ किल्ला आहे.सध्या हे पर्यटनस्थळ असून इथं नगरपरिषद आहे.अनेक दुर्गप्रेमी आणि पर्यटक कोल्हापुरात आल्यावर पन्हाळगड पहायला आवर्जून येतात.
किल्ल्याचे बांधकाम विजापूर शैलीचे असून गडावर अनेक माच्या व भुयारी मार्ग आहेत . गडाची तटबंदी ७किमी आहे.
गडावरील अनेक स्थळे बघताना त्यातून इतिहासाच्या पाऊलखुणा आणि जाज्वल्य कार्यपटल व प्रसंग नजरे समोर उभा राहतो.गडावर राजवाडा,सज्जा कोठी,राजदिंडी,अंबारखाना,चार दरवाजा,सोमाळे तलाव, रामचंद्र अमात्य यांची समाधी,रेडे महाल,अंधार बावडी, तीन दरवाजा,कलावंती महाल आणि सोमेश्वर, अंबाबाई आणि महाकाली मंदिर आहे.त्याशिवाय मुक्तपणे वावरणारा भन्नाट वारा आणि निसर्गसौंदर्य न्याहाळत मनाला भुरळ घालते.
महाराणी ताराबाई यांचा वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे.सध्या या वाड्यात नगरपरिषद कार्यालय व पन्हाळा हायस्कूल आहे.राजवाड्यावरुन पुढं गेल्यावर "सज्जा कोठी" लागते.या इमारतीत छत्रपती संभाजीराजे यांचे वास्तव्य होते.इथूनच महाराज या विभागाचा कारभार पहात होते.राजदिंडी येथून दुर्गम वाट गडाखाली उतरते.याच वाटेचा उपयोग करून छत्रपती शिवाजी महाराज सिध्दी जोहरच्या वेढ्यातून निसटले होते.हीच वाट पुढं विशाळगडाकडे जाते.अंबारखाना हा पुर्विचा बालेकिल्ला असून याच्या सभोवती खंदक दिसतो.गंगा,यमूना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे होती.तसेच कचेऱ्या, टांकसाळ आणि दारुगोळा कोठार इथंच होते.चार दरवाजा म्हणजे अत्यंत मोक्याचा आणि महत्त्वाचा दरवाजा दरवाजा होय.इथेच शूरवीर शिवा काशिद यांचा पुतळा आहे.
पश्चिमेकडील सर्वात महत्त्वाचा "तीन दरवाजा "यावर नक्षीकाम केलेले आहे.शिलेदार कोंडाजी फर्जंद यांनी येथीलच कडा सर करून अवघ्या ६० मावळ्यांसह गड जिंकला होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता कोणत्याही अग्निदिव्यात उतरण्यासाठी एका पायावर तयार असणारे अनेक स्वामीनिष्ठ शिलेदार यांनीच इतिहासाला शौर्याची झळाळी चढवली.या निधड्या छातीच्या शूर मर्दांच्या पराक्रमाचा साक्षीदार सह्याद्रीच्या कुशीतला पन्हाळगड..
अनेक स्थळे बघताना त्यांना चित्रित करण्याचे कामही अधूनमधून घडत होतं.तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला एक विहीर आहे.तिला अंधारबावडी म्हणतात.तीन मजले असून सर्वात तळाला खोल विहीर आहे.तर दुसऱ्या मजल्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा दरवाजा आहे.या विहीरीच्या भिंती रुंद आहेत.इथं पर्यटकांची वर्दळ वाढत होती.अनेकजण सेल्फि काढत होते...बराच वेळ आम्ही फिरत होतो याची जाणीव मुलींनी करुन दिली.जवळच्याच हातगाडीवरील लिंबू सरबत आम्ही तर मुलींनी बर्फ गोळ्यांचा आस्वाद घेतला..व परतीला लागलो..हिलस्टेशन असल्याने इथं निवासाच्या चांगल्या सोयी सुविधा आहेत.सुप्रसिध्द कोल्हापुरी पदार्थ चाखण्याची उत्तम व्यवस्था आहे.या गडावर मित्र व कुटूंबियांसमवेत चार-पाच वेळा आलो आहे...कितीही वेळा गडकोटी भटकंती केली तरी पुन्हा निसर्गादारी जावे वाटते.मन रेंगाळत मागेच राहते.कुतूहल वाढवणाऱ्या ऐतिहासिक घटनांचे स्मरण होत रहाते. गडकिल्ले कार्य कर्तृत्ववाचे दीपस्तंभ व साक्षीदार आहेत.
एक तास चालल्याने थकवा आला होता..गाडीजवळ येताच हायसे वाटले...मग आम्ही कुलदैवत दख्खनचा राजा श्री ज्योतीबाचे देवदर्शनाला वाडीला निघालो.
भाग क्रमांक १२३
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment