कोजागिरी पौर्णिमा एक आठवण
🍁🌿🍁🌿🍁🌿🍁
कोजागिरी पौर्णिमा
साठवणीतल्या आठवणी
मित्रांसमवेत कोजागिरी साजरी !!
टिपूर चांदण्यात,
दूध आठवत ,
गप्पा मारत
जागरण करत
मैफिलीला रंगत ...
💫〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रमोद निंबाळकर भाऊंच्या दुकाना जवळील कट्ट्यावर आम्ही चार-पाचजण गप्पा मारत बसलो होतो.एकानं,'गुरुजी उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे.चांदण्यात दूध आठवायचं नियोजन करायचा का? 'असं अचानक विचारले. जेवण करायच्या अगोदर का नंतर करायचं यावर खल सुरू झाला. काहीजणांनी आम्ही घरीच नियोजन केले आहे.
त्यामुळे तुमचं तुम्ही ठरवा. सगळी असतील तर आपण भी येऊ,असं एकेकजण तेढत छेडत बोलत होते. त्यापेक्षा उद्या शुक्रवार आहे जाऊया हॉटेलवर जेवायला.. तिथंच कोजागिरी साजरी करु,अशी एकाची सूचना. सगळे मिळून उद्या कोजागिरी कुणाच्यातरी रानात साजरी करुया जेवणानंतर., दुधाचा खर्च मी करतो.'असं मी म्हणत असतानाच आमचे आप्पा डेअरीला दुध घालायला निघाले होते.त्यांना हाक मारली.सगळ्यांच्या देखत बोललो,'आप्पा सायंकाळी डेअरीला दुध न घालता तशीच किटली दुकानात ठेवा.उद्या रानात कोजागिरी साजरी करायची आहे.'
त्यांनी होकार देताच मला जरा हायसे वाटले.मग पिंटू म्हणाला, गुरुजी जेवण करून नियोजन करा.मी आणि प्रमोदराव सगळ्यांना सांगायची हमी घेतो. काका म्हणाले,नुसत दुध नको.काहीतरी तिखट करायला जमेल का?भजी किंवा बटाटेवडा.'आता फर्माईश सुरू झाली..पण करणार कोण? लगेच आमच्यातील दोघं तयार झाली.आणि मग मसाला दूध आणि कांदाभजी असा बेत ठरला....
हाहा म्हणता वीसेक जणांचे नियोजन करून साहित्य दुकानातून घेऊन सगळेजण उद्या जेवण करून साडेनऊला निघण्याचं ठरलं.
नियोजनानुसार सुहास लोखंडे यांच्या रानातल्या घरी चालत चालत आम्ही अगोदर पाच-सहा जण निघालो.टिपूर चांदणं मनभरुन बघत निघालो होतो.गावापासून पंधराव्या मिनीटात आम्ही रानात पोहचलो.
पाणी भरुन ठेवले होतं.गॅस शेगडी होती.चांदण्यांचा शीतल प्रकाशात दुध आठवायचं होतं आणि भजीही बनवायची होती.त्यामुळे घराच्या अंगणात पदाड मांडण्यापेक्षा घराच्या गच्चीवर बनवूया..म्हणजे चंद्राचे शीतल किरण दुधात पडतील.नाही होय करत असतानाच सिलेंडर व शेगडी सगळ्यात अगोदर गच्चीवर नेहून ठेवले.
मग पहिल्यांदा मोठ्या पातेल्यात दूध आठवायला ठेवले.साखर व वेलचीपूड घातली.दोघेजण ते काम करु लागले.साधारणपणे पाच लिटर दुध मंद आचेवर आठवत ठेवले.प्रमोद आणि इतर दोघांनी कांदा चिरायला सुरुवात केली.हळूहळू मित्रांची संख्या वाढायला लागली.जे कामात व्यस्त नव्हते त्यांच्या चेष्टा मस्करी करत गप्पा सुरू झाल्या..
दुध खळखळून उकळत असताना त्यात दूधाच्या मसाल्याच्या दोन पुड्या वेष्टण दातानं तोडून त्यातील मसाला हातात घेऊन पातेल्यात सगळीकडे टाकला.थोड्याच वेळात मसाल्याचा सुगंध दरवळू लागला.
इकडं कांदा चिरून झाल्यावर मी बेसनपीठ तिखटमीठ,ओवा, जिरं,खाण्याचा सोडा आणि चिरलेला कांदा एकत्र करून एका घमेल्यात पीठ मळून घ्यायला सुरुवात केली.बरेच डोळे माझं पीठ मळणं निरखून बघत होते.कमीजास्त सांगत होते. तरी एक जण म्हणालाच,'बेसनपीठ राहिलं तर बटाटा भजी थोडीशी बनवा.गरम गरम चांगली लागतात.' अजून एक शेगडी पाहिजे मग गुरुजी वडापाव बी करतील, दुसऱ्याचं प्रत्यृत्तर .पीठ मळून झाल्यावर शेगडीवरचे दुधाचे पातेलं खाली उतरवले.कढई शेगडीवर ठेवली.त्यात गोडेतेलाच्या पिशव्या रित्या केल्या.तेल उकळण्याची वाट बघत बसलो.साधारणपणे तीस एक जण झालो.मनात शंका सगळ्यांना पुरेल का,नाहीतर बजेट फेसाळायचं.
एकाणं ही आमची चर्चा ऐकताना पातेल्यात ओगराळे हालवताना मसाला टाकायचा राहिलाय म्हणून.गुपचूप दोन तांबे पाणी मसाला म्हणून दुधात टाकलं.इकडं थोडंसं पीठ आणि पाण्याचे थेंब तेलात पडताच चरचर आवाज आला.मग मी भज्याचे भिजवलेले पीठ हातात घेऊन नेमके पणानं थोडे थोडे गोळे तेलात सोडायला सुरुवात केली.
जाळाचा ताव जरा कमी केला.तदनंतर दिलीपने भजी तळायचे आणि मी पीठाचे गोळे सोडायचे काम सुरू झाले... तेवढ्यात कुणीतरी प्लेटा आणि ग्लास चाळीस एक आहेत का याची चाचपणी केली.
नियोजनानुसार पन्नास ग्लास आणि प्लेटा घेतल्याचे प्रमोदने सांगितले.भज्याचा एक घाणा झाल्यावर .
दोघातिघांनी चव चाखली आणि कमी-जास्त सांगितले.'मस्त चव लागतीय पण दिलीप थोडावेळ जास्त जावू देत,'अशी खरपूस भाजण्याची लडिवाळ सूचना चव चाखणाऱ्यांनी केली.. सहा-सात घाण्यात मळलेलं पीठ संपलं.चांगली घमेलं भरुन भजी झाली होती.एव्हाना साडेदहा वाजले होते.तदनंतर पुन्हा दुधाचं पातेलं दुध गरम करायला ठेवलं.
दुधाचा पिवळसर रंग दिसत होता.त्याच्यात चंद्र आणि चांदण्यांचे प्रतिबिंब दिसत होते. सगळेजण गोल करून आता गप्पा झाडत बसलो .दिलीप आणि अधिक मामांनी कागदी डीश मध्ये पाचेक भजी ठेवून एकेकाला डीश द्यायला सुरुवात केली.तर प्रमोद आणि बाळूने दुधाचे ग्लास (कागदी ) भरुन वाटायला लागले.सगळ्यांना मिळाल्यावर मस्तपैकी भज्याचा आणि मसाला दुधाचा आस्वाद घेत गप्पा तोंडी लावत कोजागिरी साजरी करत होतो.मस्तपैकी पीटूर चांदण्यात आमची मैफिल रंगली होती. कुरकुरीत भज्याचा एक घास आणि चविष्ट मसाला दुधाचा एकेक घोट घेत मनसोक्त आस्वाद घेत होतो.घमेलेभर भजी आणि पाच-सहा लीटर दुधाचा सगळ्यांनी फडशा पाडला.असा एक रंगतदार खवय्येगिरीचा सोहळा कोजागिरी पौर्णिमेला दिलदार मित्रांनी जागरण करुन साजरा केला.तदनंतर अनेकदा आमच्या रस्सा पार्ट्या तिथं झालेल्या आहेत.पण अलिकडे त्या ठिकाणाहून जाताना आठवणींचा गोतावळा जागा होतो आणि अनेक घटनांचे प्रसंग डोळ्यांसमोर तरळतात.तेंव्हा मनात आनंदाला उधाण येतं ते चेहऱ्यावरील हास्याने संचित होते..सहजच आठवले म्हणून व्यक्त झालो.
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा❗
Comments
Post a Comment