माझी भटकंती औरंगाबाद भाग क्रमांक ११८




☘️⚡☘️⚡☘️⚡☘️ 
माझी भटकंती 
भाग क्रमांक-११८
सन २००६
      🔆औरंगाबाद(संभाजीनगर)💎
➖➖➖➖➖➖➖➖
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पर्यायी शिक्षण साधनव्यक्तींचे राज्यस्तरीय प्रशिक्षण मीपा संस्थेत औरंगाबाद येथे आयोजित केले होते.भडकल गेटजवळ उस्मानिया विद्यापीठात या संस्थेचे कार्यालय आहे. त्यावेळी औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक पर्यटन स्थळे पहाण्याची संधी मिळाली होती.सातारा जिल्ह्यातील साधनव्यक्तीं समवेत.प्रशिक्षण सेशन संपल्यावर आम्ही चार-पाच जण शहरात फेरफटका मारायला गेलो होतो.
       औरंगाबाद शहराला "गेट्स अॉफ  सिटी"म्हटले जाते.पूर्वी या शहरात ५२ दरवाजे होते.सध्या ४ मुख्य व ९ इतर दरवाजे पहायला मिळतात.यापैकी निजाम पॅलेसच्या जवळील भडकल गेट पहायला मिळाले.प्रशिक्षणाला जाताना मी पुण्याहून औरंगाबादमध्ये पहाटे बसस्थानकावर पोहोचलो होतो. हलकासा पाऊस पडत होता.ठीकाणही अनोळखी म्हणून जाण्यासाठी रिक्षा केली.त्याने पत्ता विचारला.मी त्याला मीपा प्रशिक्षण केंद्र ,उस्मानिया विद्यापीठ एवढं सांगितलं .त्याच्या लक्षात न आल्याने त्याने ,त्याच्या जोडीदाराला मी
सांगितलेल्या ठिकाणी कसं जायचं ते विचारले.
 .,'त्याने भडकल गेट जवळ राईटला जा ',. असं सांगितलं मग त्याने रिक्षा सुरू केली.थोड पुढं गेल्यावर तो म्हणाला,'आदी गेटच नांव सांगायला पाहिजे होतं' मी म्हणालो ,'मी पहिल्यांदा निघालोय,मला काय माहित तिथं गेट आहे.'या किस्सा मुळे भडकल गेट कायमच कायमचं लक्षात राहिले. भारदस्त कमानी सारखं हे गेट आहे.तदनंतर आम्ही रिक्षा करून "बीबीका मकबरा"राष्ट्रीय स्मारक बघायला आलो.मुघल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आजमशहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधलेला आहे.भव्य महालात कबर आहे.लाल,काळ्या  संगमरवरी दगड आणि पांढऱ्या माती पासून ही वास्तू बनविली आहे.भव्य ओट्यावर बांधकाम केलेले आहे.मध्यभागी कबर असून कबरीवर चारी बाजूंनी संगमरवरी जाळ्या आहेत.
त्यामुळे छतांच्या खिडक्यातून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्रप्रकाश पडेल अशी रचना केली आहे.घुमूटही संगमरवरी आहे.ओट्याच्या चारी बाजूला मिनार आहेत.समोर शोभिवंत उद्यान आहे.तदनंतर आम्ही रिक्षा करून जगप्रसिद्ध पाणचक्की बघायला आलो.सुमारे ४०० वर्षांपूर्वी तयार केलेली पाणचक्की बघायला हौशी पर्यटक आवर्जून भेट देतात.कारण पाण्याच्या प्रवासातील ऊर्जा वापरून यंत्र तयार केले.पाण्याच्या दाबाचा उपयोग करून दगडी जाते फिरते.त्या यंत्रावर पीठ दळले जायचे म्हणून याला "पाणचक्की " म्हणतात.
         मलिक अंबरने जवळच्या टेकडीवरून नहरींच्या(कालवा) सहाय्याने आणले. सायफन पध्दतीचा वापर करून बंदिस्त खापरी पाईपातून आणून २०फुटावरुन भिंतीवर सोडले.ते पाणी चक्कीच्या पंख्यावर सतत पडते.त्यामुळे पंखा फिरला की त्यावर बसवलेले जाते जोराने फिरते.याच जात्यावर धान्य दळले जायचे.हौदात जादा झालेले वाया जाणारे पाणी जवळच्या खाम नदीत सोडले जाते.खरोखरच त्या काळातील तंत्रज्ञान पाहून आपण अचंबित होतो.खूपच वेगळे कृतीशील तंत्रज्ञान बघायला मिळाले. एका वेगळ्या स्थळाला भेट दिल्याचे समाधान वाटले.यापुर्वी आम्ही औरंगाबाद परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व  पैठण येथील संत एकनाथ महाराज व जायकवाडी धरण आणि  वेरुळ येथील लेणी बघायलाही गेलो होतो. 
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
भाग क्रमांक --११८

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड