माझी भटकंती गोळेवाडी भाग क्रमांक १२०




🌱🍁🌱🍁🌱🍁🌱🍁

🌱🍁🌱🍁🌱🍁🌱🍁
 माझी भटकंती 
     भाग क्रमांक --१२०
  ☘️गोळेवाडी परिसर 
        उत्तरार्ध 
  ➖➖➖➖➖➖➖
    धरण परिसराचा नजारा बघितल्यानंतर आम्ही गोळेवाडीकडे मार्गस्थ झालो.निसर्गाच्या कुशीतलं गोळेवाडी छोटंसं टुमदार गावं.निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण झालेला परिसर. कड्याच्या सपाट भागावर जागोजागी विरळ घरांची वस्ती दिसत होती.भात,नाचणी आणि वरी निसवत चालली होती.
      काहीजण विशेषतः स्त्रिया शेतात काम करताना दिसत होत्या. ओढ्याच पाणी खळाळत धरणात जात होतं.ज्या भाताच्या खाचरात  पाण्याची गरज आहे.त्यासाठी  वढ्याच्या वाहत्या पाण्यात पीव्हीसी पाईपा टाकून शेतात वळवलेले एकेठिकाणी दिसले . सायपन तंत्राचा वापर शेतकरी करताना दिसून आला.इकडं बऱ्याच गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना सायपन तंत्राचा वापर करून केलेल्या आहेत. डोंगरातील जिवंत झरे पाहून तेथील पाणी लोखंडी पाईपाने  आणणे.साठवण टाकीत साठविणे आणि नळाद्वारे घरापर्यंत पोहचविणे..
            एवढ्यात आम्ही निसर्गरम्य कड्याच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी शाळेच्या इमारतीजवळ आलो.शाळेची टुमदार इमारत  बघितल्यावर मनस्वी आनंद झाला.
बाह्यांग रंगकाम,बोलका व्हरांडा   खेळायचे मैदान आणि वृक्षारोपण  पाहून समाधान वाटले.तदनंतर आम्ही कच्चा रस्ता दिसल्यावर योग्य त्या ठिकाणी  गाड्या पार्क केल्या आणि कच्च्या लाल मातीच्या  वाटा तुडवत कड्यावर नाकाडाणे चालत निघालो.चढण चढताना दम लागत होता.सहा महिने फिरणं बंद झाल्यानं व्यायामाचा अभाव जाणवत होता. उतारावरील सपाट जागेचा अचूक वापर करून नॅचरल लूक मध्ये केलेले रिसॉर्ट पाहून छान वाटले.
      तसेच चालत चालत पुढे गेलो.इकडेतिकडे पहाताना अचानक,अहाहा काय सुंदर देखणं दृश्य एलिफंट(केटस) पॉईंट्चे दिसत होते.. हत्तीच्या सोंडे सारखा पाषाण आणि त्यापुढे निमुळता होत जाणारा हिरवीगार कडा.तिथला नैसर्गिक झरोका (खिडकी) बहारदार दिसत होता.त्याच वेळी पांढऱ्या ढगांनी पाॅईंट क्षणभर धूसर झाला.
सगळेजण हे दृश्य पाहून हरकून गेले.आणि ही छबी चित्रबद्ध करण्यासाठी मोबाईल क्लिक करु लागले.कालांतराने माथ्यावर आलेले ढग पांगू लागले.अचानक लख्ख उन पडले .आता हवेचा माहोल छान होता. वारं सुटलं होतं,मंद झुळूकीचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. आकाशातील ढगांचे दृश्याकार क्षणोक्षणी बदलताना कुतूहलाने बघत रहावे असे वाटते.
ओढ्याच्या वाहत्या पाण्याचा खळखळाट , मध्येच मोरांचे केकाटणं, आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून आणि फुलपाखरांचे भिरभिरणे पाहून मजा वाटत होती.सगळे नैसर्गिक आवाज कानावर येत होते. ऐकून उत्साह वाटत होता.
   एवढ्यात जलाशयावरुन  आकाशात  स्वैरपणे संचार करणाऱ्या पक्षांचा थवा पाहून एकमेकांना ते नभीचं दृश्य दाखवू लागलो.ग्रेट मनमोहक क्षण बघायला मिळाला. तिथंच बसून हितगुज गप्पागोष्टी करत होतो तेवढ्यात जेवण तयार झाल्याचे समजले.
अस्सल गावरान सामिष जेवणाचा बेत आखला होता.तो क्षण आता जवळ आला होता.रसदार चवदार चटकदार आणि गरमागरम बेत पाहून सगळेजण अक्षरशः जेवणावर तुटून पडले. मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला.बऱ्याच दिवसांनी एकत्र मित्रगण जेवण करत होतो. हाशहुश करत रस्स्याचा भुरका मारत , गप्पा मारत ,पोटभर जेवण केले... जेवणानंतर दिलखुलासपणे गप्पांची
 मैफिल रंगली.बऱ्याच दिवसांनी एकत्र आल्याने विविधांगी विषयावर गप्पिष्टक झाले .निसर्ग सहवासात मस्तपैकी आनंदानुभव घेतला. रमणीय परिसराला गुडबाय करुन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो..
जाताना आम्ही निसर्गाशी  मूकपणे बोलत होतो. परत  येण्याची खुणगाठ  मनात ठरवत होतो...मन रिझवणाऱ्या आणि मनात रेंगाळत राहणाऱ्या  चैतन्यमयी उत्साहवर्धक आठवणी......
धन्यवाद मैत्री परिवार
दोस्त ,दुनियादारी लयभारी
भेटूया  पुन्हा निसर्गादारी
 वाई पासून पश्चिमेला २८ किमीवर  गोळेवाडी परिसर आहे. 
            समाप्त 
भाग क्रमांक--१२०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई







Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड