माझी भटकंती श्री ज्योतिबा वाडी भाग क्रमांक १२४
☘️🌸☘️🌸☘️🌸☘️🍂
साठवणीतल्या आठवणी
माझी भटकंती
कौटुंबिक सहल
🍁🌻 ज्योतीबा 🌻☘️
भाग क्रमांक-- १२४
दिनांक १३ नोव्हेंबर २०१८
➖➖➖➖➖➖➖
सायंकाळ होत आली होती.. वातावरणात गारवा जाणवत होता.घाटाने निघालो होतो.सूर्यास्ताचे दृश्य नजरेस पडत होते. तांबूस सोनेरी छटेत पश्चिमेकडील आकाश नटलेले दिसत होते.
थोड्याच वेळात आम्ही ज्योतिबा पठारावर आलो.गाडी पार्क करून देवदर्शनाला चालत निघालो.
पन्हाळ्यापासून कृष्णेकडे असलेल्या डोंगराच्या एका फाट्यावर ज्योतिबा डोंगर आहे.याच डोंगराच्या शंखाकृती व हत्तीच्या सोंडे सारख्या पसरलेल्या पठारावरील वाडी रत्नागिरी या गावात दख्खनचा राजा ज्योतिबा लाखो कुटुंबियांचे कुलदैवत आहे.ज्योतिबा दैवत म्हणजे साक्षात शिव आणि सूर्याचे रुप मानण्यात येते.
मराठा शैलीतील भव्य प्रवेशद्वार असून मंदिराकडे बांधिव पायऱ्यांचा मार्ग आहे."चांगभल रं, चांगभलं रं,देवा ज्योतिबा चांगभलं रं " अशी श्रवणीय गाणी मंदिराकडे जाताना ऐकायला मिळतात..पायऱ्या उतरताच देवळांचा समुह समोर दिसतो.मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे.सगळा परिसर गुलालाने माखलेला दिसतो.नवसकरी भक्तगण गुलाल खोबरे उधळित असतात.भाविक ज्योतिबाच्या नावानं चांगभलं म्हणत गजर करीत होते.
मंदिर परिसरात पाण्याची कुंडे व विहीरी आहेत.मंदिर काळ्या बेसॉल्ट दगड घडवून बांधलेलं आहे. मराठा कारागिरांनी या मंदिराचे स्थापत्य केलेले आहे.शिखरावर तळापासून कळसापर्यंत नक्षीकाम केलेले नजरेत पडते.मंदिराच्या प्रांगणात दगडी दीपमाळ आहे.
आम्ही रांगेत दर्शनासाठी उभे राहिले .पंधरा ते वीस मिनिटात सभामंडपात प्रवेश मिळाला.. सगळेजण श्रध्देने देवाचं नामस्मरण करीत होते..
ज्योतिबाची मुर्ती घोटीव पाषाणातील असून चतुर्भुज आहे.देवाच्या शरीररक्षक काळभैरवाच्या बाजूस मूळ ज्योत अखंड तेवत असते.
भक्तीमय भावपूर्ण आणि चैतन्यदायी शक्तीचे माहोल सभोवती होता.श्रध्दा,शक्ती आणि भक्तीचा त्रिवेणी संगम बघायला मिळत होता.मंदिरात जाऊन गुलाल खोबरे वाहिले.श्री ज्योतीबाचे मनोभावे देवाचे दर्शन घेतले.विलोभनीय रुप बघून अनामिक उर्जा लाभली.मनाला धन्यता वाटली.
इथं चैत्री पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.लाखो भाविकांची गर्दी ओसंडून वाहत असते.अवघं पठार भक्तिमय होऊन गुलालात न्हाऊन निघतं. पहिल्या सासनकाठीचा मान श्री क्षेत्र पाडळी गावाला आहे.वाद्यांच्या तालावर वाजत गाजत सासनकाठ्यांची मिरवणुका बघताना भाविक मंत्रमुग्ध होऊन बघत असतात.ग्रामीण लोकगीतं आणि गाण्यांतून देवाच्या अगाध महिमेच्या कथा व गाणी श्रवणीय असतात .
देवामंदी देव ज्योतिबा लई मोठा,चैताच्या महिन्यात फुलल्या चारी वाटा ..
तदनंतर खव्याचे पेढे आणि प्रसाद घेतला.जवळच्याच एका हॉटेलमध्ये चहापान उरकले आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
अतितला पाहुण्यांकडे रात्राचे जेवण करून दहाच्या सुमारास गावी पोहोचलो....एक दिवसाची धार्मिक सहल संपन्न झाली...
भाग क्रमांक-- १२४
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment