माझी भटकंती ऐने डहाणू भाग क्रमांक-१२६
☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂
माझी शैक्षणिक भटकंती
भाग क्रमांक-- १२६
🦋मे २०१३
📚 ऐने डहाणू ✒️
➖➖➖➖➖➖➖➖
प्रवास पूर्वरंग
ग्राममंगल ज्ञानरचनावादी शैक्षणिक संस्थेने विद्यार्थ्यांचे शिकणं स्वयंम कसं घडतं .हा नवीन प्रयोग पहाण्यासाठी गेलो होतो. ८मे ते १४ मे २०१३ या कालावधीत तिथं इयत्ता-पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना रचना वाद पध्दतीने अध्ययन अनुभव कसे द्यायचे याचं प्रशिक्षण आयोजित केले होते.मी आणि माझ्या एक सहकारी वाईतुन या प्रशिक्षणासाठी गेलो होतो.विविध जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती होती.वाई ते कात्रज जनतेचा रथ लालपरी असा प्रवास तर कात्रज ते ठाणे असा खाजगी अॅम्बेसिडर मधून प्रवास केला होता.वाशी येथे हायवेच्याच एका हॉटेलजवळील बागेत घरुन घेतलेली शिदोरी सोडून आम्ही चौघांनी जेवण घेतले.तदनंतर ठाण्याला निघालो.ठाणे ते ऐने अशा प्रवासाचा लाभ आम्हाला प्रत्यक्ष रचनावादाचे प्रणेते आदरणीय प्रा.रमेश पानसे सर यांच्या सहवासात त्यांच्या कार मधून झाला होता.
ओळख परिचय गप्पागोष्टी करत आम्ही प्रयोगशील ऐने कडे ऐन उन्हाळ्यात मार्गस्थ झालो... शहरातील रस्त्यांवर दुतर्फा वाहनांची वर्दळ होती.
महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुका आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो.या तालुक्यात वारली समाज्याचे सांस्कृतिक ओळख म्हणजे वारली चित्रकला आणि तारपा नृत्य प्रसिद्ध आहे.एका बाजूला अरबी समुद्राचा अथांग समुद्र किनारा,दुसरीकडं सह्याद्रीच्या डोंगररांगा त्यातील जंगलातील जैवविविधता , गडकिल्ले नदया ओहोळ आणि धबधबे असा निसर्गरम्य परिसर आणि पारंपरिक कलांनी समृद्ध असलेला परिसर पर्यटकांना आकर्षित करत असतो. चिकूच्या बागाचबागा अशा परिसरातील डहाणू तालुक्यातील ऐने येथे आम्ही रचनावादी पध्दतीच्या कृतीशील अनुभव मालिका पहायला अभ्यासायला निघालो होतो.
वसईच्या थोडं पुढं आल्यावर सरांनी गाडी भजनलाल डेअरी मिल्क फार्मवर ड्रायव्हरला थांबवायला सांगितली.गाडीतून खाली उतरताना "ब्लॅक गोल्ड " अशी नजरेला पडल्यावर पुन्हा निरखून पाहिले तर त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीचा म्हैशींचा गोठा होता.त्यांची निगा,स्वच्छता आणि चारापाण्याची देखभाल ,दुध काढणं याची आधुनिक टेक्नॉलॉजीयुक्त होती.तसेच इथले सर्व मिल्क प्राॅडक्ट येथीलच म्हैशीच्या दुधापासून इथंच बनवित असल्याची माहिती दिली. पदार्थ विक्रीचे प्रशस्त अनेक काऊंटर होते.तिथल्या पदार्थांपैकी फेमस लस्सी सरांनी मागविली.तिथं कॅश अॅण्ड कॅरी पध्दत होती.हव्या असलेल्या मेनूचे पैसे अगोदर पेड करुन कूपन घ्यायचे व शेजारील स्टॉलवर कूपन दिल्यावर आपली पदार्थांची आॅडर मिळणार...मलईदार,स्वादिष्ट चवदार लस्सीची चव चाखली.ठाणे ते अहमदाबाद हमरस्त्याने मार्गस्थ झालो.
काही वेळाने कासा गाव आल्यावर हमरस्ता सोडून आमची गाडी डहाणू- जव्हार जिल्हा मार्गाला लागली.कालांतराने तिन्हीसांजेला आम्ही ऐने येथे पोहोचलो.उंचच उंच डेरेदार वृक्षांच्या छायेत संस्थेची इमारत होती. गाडी पार्क करून आम्ही होस्टेलवर गेलो.तिथं निवासी प्रशिक्षणार्थींची सोय केली होती.
सुमारे तासाभराने आम्ही जेवणासाठी मेसच्या इमारती कडे आलो.
जेवणाची बैठक व्यवस्था साजेशी होती.लाकडाच्या ओंडक्याचा कलात्मक पद्धतीने डायनिंग टेबल आणि बसायला चेअर म्हणून उपयोग केला होता. बुफे पध्दतीचं जेवण होतं. तेथील बरेचजण अनोळखी होते.त्यामुळे एका ओंडक्यावर बसून मस्तपैकी मंद प्रकाशात जेवणाचा आस्वाद घेतला.. जेवणातीच्या ताटातील सर्वच मेनू स्वादिष्ट आणि रुचकर होते.लिंबाची फोड घेण्याऐवजी लिंबाचा रस छोट्या भांड्यात होता.त्यातील चमच्याने पाहिजे तेवढा घ्यायचा.याचे मला नवल वाटले.ती कृती पाहून स्मितहास्य करायला झाले.जेवणानंतर स्वताचे ताट स्वत: धुवून ठेवायला लागले.बऱ्याच वर्षांनंतर हा प्रसंग आला होता.ताट स्वच्छ धुवून ठेवले.आज खरचं स्वयंशिस्तीचे काम करायला मिळाले. इथं बरचं अनुभवातून शिकायला मिळणार याची खुणगाठ बांधून निद्राधीन झालो.
भेटूया उद्या मुक्त शाळा ऐने तोपर्यंत नमस्कार...
भाग क्रमांक---१२६
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment