माझी भटकंती कोल्हापूर भाग क्रमांक-१२१





🍂☘️🍂☘️🍂☘️🍂☘️
साठवणीतल्या आठवणी
माझी भटकंती कौटुंबिक सहल 
भाग क्रमांक--१२१
दिनांक १३नोव्हेंबर २०१८
🔆कोल्हापूर महालक्ष्मी🔆
➖➖➖➖➖➖➖
माझे बालपणीचे सवंगडी श्री विजय तांगडे (भावड्या)
याच्या मुलानं चारचाकी वाहन घेतले होते.त्यातून फिरायला जायचं दिवाळीच्या सुट्टीत कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई,ज्योतिबा आणि पन्हाळगड असे नियोजन केले होते.. कुटूंबाची ट्रीप असल्यामुळे घरुनच जेवणाचा सरजाम केला होता. सकाळी ९ वाजता आम्ही मार्गस्थ झालो होतो..वाई -ओझर्डे-सातारा-कराड करत करत आम्ही पुढे निघालो होतो.टोप येथील गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या दर्शनासाठी निघालो होतो.साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले जागृत मातृपूजेचे आद्य व शक्ती उपासक देवस्थान म्हणून लौकिक असलेले जागृत आहे. भक्ती केल्याने मुक्ती मिळते या उक्तीप्रमाणे लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.देवस्थानच्या पार्किंग मध्ये गाडी लावून चालत चालत आम्ही मंदिराकडे निघालो.विविध प्रकारची दुकाने थाटलेली होती.कोल्हापूरची खासियत असणारी कोल्हापुरी चपलांची दुकाने नजर वेधून घेत होती... वाटेतल्या एका बोरंविक्या कडून एक किलो टपोरी हिरवीगार बोरं विकत घेऊन आम्ही खात खात निघालो. पुढं गेल्यावर मंदिराचे विलोभनीय कळसांचे दर्शन झाले... परिसरात भाविकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत होती.मंदिरासभोवती दगडी तटबंदी असून चार दरवाजे नजरेत भरतात.पश्चिमेकडील महाद्वार दरवाज्यातून आत आलोआणि दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो.मंदिरातील भावपूर्ण भक्तिमय वातावरण होते.गर्दीच्या कोलाहलात मातेच्या अगाध महिमेची गाणी ऐकायला मिळत होती.रांगेतील भाविक अंबाबाईच्या नावानं उदोउदो म्हणत गजर करीत होती.. चैतन्यदायी शक्ती आणि ऊर्जा मिळण्यास्तव सर्वे पुढं पुढं दर्शनासाठी सरकत होते....मंदिराचे एका रेषेत तीन कळस असून दोन्ही बाजूला दोन असे पाच कळस आणि भव्य दिपमाळ दिसते.मंदिराच्या सभोवताली प्रशस्त प्रांगण असून मंदिराचा आकार तारकाकृती आहे.हेमाडपंथीय स्थापत्यकलेचा उत्कृष्ट आविष्कारात मंदिराचे बांधकाम केलेले आहे.वास्तूची भव्यता, सुबकता आणि प्रमाणबध्दता नजरेत भरते.मंदिरावर अनेक ठिकाणी देखण्या मुर्तींची कलाकृती , नक्षीकाम व वेल बघताना देहभान हरपते.मंदिर दुमजली असून वायू वीजनासाठी दगडी झरोके व खिडक्या आहेत.
मंदिराचे मुख्यमंदिर महाकाली, महासरस्वती, गणेश मंडप व गरुड मंडप असे चार भाग आहेत.
मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंचदगडी चबुतऱ्यावर दहा खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत चतुर्भुज मूर्ती आहे.
      देवीचे जोडीने मनोभावे दर्शन घेतले.चैतन्यमयी समाधान लाभले. येथील नवरात्रौत्सव आणि किरणोत्सव प्रसंगी मातेच्या दर्शनासाठी अनेक अभ्यासक,भाविक व पर्यटकांची अलोट गर्दी उसळते.ठरावीक दिवशी किरणोत्सव असतो.दिवसभरात तेजाने तळपणारा सूर्यनारायण सूर्यास्त समयी मार्गक्रमण करत असताना त्याची तेजस्वी किरणे अनुक्रमे देवीचे चरण ,मुर्तीचा मध्यभाग आणि मुखमंडलासह देवीचे सर्वांग उजळून टाकतो.प्रत्यक्ष चराचराचा तारणहार सूर्यनारायण भूतलावरच्या आई अंबाबाईच्या दर्शनासाठी किती आतुरतेने उत्सुक आहे याची प्रचिती येते...
मंदिर परिसरात छायाचित्रे काढून पूजाप्रसाद घेऊन आम्ही पन्हाळगडाकडे निघालो....
भाग क्रमांक-१२१
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https:// raviprema.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड