माझी शैक्षणिक भटकंती चिंचणी ऐने डहाणू भाग क्रमांक-१२८
🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂
माझी शैक्षणिक भटकंती
भाग क्रमांक--१२८
🌱डहाणू ऐने ✒️📚
🦋🍁🦋🍁🦋🍁🦋🍁
चिंचणी समुद्रकिनारा व प्रवास
➖➖➖➖➖➖➖
उत्तरार्ध
असेच एकदा चारच्या दरम्यान सेशन संपल्यावर उत्साही शिक्षकमित्र-मैत्रिणी चिंचणीच्या समुद्रकिनारी फिरायला गेलो होतो. समुद्रकिनारे म्हणजे निसर्गाची बहुमूल्य देणगीच. रमणीय ठिकाणे.मौजमजा करायला आवडीचं ठिकाणं.नजर जाईपर्यंत दिसणारे अथांग पाणी,भुरळ घालणारे गर्दझाडीचे समुद्रकिनारे आणि त्यात लपलेली हाॅटेल्स.रेशमासारखी मऊशार रुपेरी वाळू,शंखशिंपले हातात घेऊन खेळायला मजा येते.कित्येक वेळ आपण त्यांच्याबरोबर रममाण होतो.वाळूत बोटांनी रेघोट्या मारतो.किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा फुटत फुटत वीरत जाताना पहातच राहायला आवडते.आम्ही बऱ्याच जणांनी थोड्या अंतरावर पुढं जावून लाटां पायावर घेतल्या.काही मनसोक्त डुंबले. काहीवेळाने आम्हाला आकाशात स्वैरपणे थव्याने संचार करणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांचे विविध आकार बघायला मिळाले. त्यांचे थवेच्या थवे क्षणभर किनाऱ्यावर थांबून लगेच आकाशात झेपावत होते..
आम्ही नंतर तेथील खाद्याच्या स्टॉलवर आवडीप्रमाणे पुरी भाजी,भेळ,पाणीपुरी आणि आईसस्क्रीमवर मनसोक्त ताव मारला. नंतर ताडगोळे खाल्ले. निसर्गरम्य ठिकाणामुळे मन प्रसन्न आणि ताजेतवाने झाले. मावळत्या दिनकराला नमस्कार करून आम्ही परतीच्या मार्गाने ऐनेला आलो.
दुसऱ्या दिवशी दुपारीच प्रशिक्षण सत्राचा समारोप झाला.एकमेकांचे निरोप घेतले.पुन्हा संपर्कात राहण्यासाठी एकमेकांचे संपर्क नंबर घेतले.प्रशिक्षण काळातील प्रशिक्षण,परिसर एकमेकांचे स्वभाव वैशिष्टे समजले.अध्यापनपध्दती, नवोपक्रम आणि प्रकल्पाविषयी अनेकांकडून वेगवेगळ्या सोप्या पध्दती समजल्या.
दुपारचे जेवण करून काहीजण मार्गस्थ झाले..आम्ही पाच-सहा जण बसथांब्यावर आलो.दोन तास झाले तरी डहाणूला,बोईसर आणि जव्हारला जाणारी बसच येत नव्हती.फक्त ट्रक व टेंम्पोतून जाणारी माणसं दिसत होती.चौकशी केल्यावर समजले की हायवेला मोर्चा काढल्याने ट्रॅफिक जॅम झाले आहे.त्यामुळं बसेस वेळेवर येणार नाहीत.आता काय करायचं हा प्रश्न, मुक्काम करायचा का जायचं हे समजत नव्हतं...त्याचवेळी एक काळी पिवळी जिप वानगावला जाणारी आली.आम्ही सगळे त्यात बसून वानगावला निघालो...दोन एक किमी पुढे गेल्यावर मागून डहाणूला जाणारी एस.टी.आली.पण आता काहीच उपयोग नव्हता...आम्ही वानगावला पोहोचल्यावर रेल्वेचे तिकीट काढले.दोन शिक्षिका आणि आमचे त्रिकूट रेल्वेतून मुंबईला निघाले. बसायला खिडकीजवळ जागा मिळाली होती.येणारी रेल्वेस्टेशन्स, चढणारे उतरणारे प्रवासी,विक्रेत्यांचे वस्तु विकण्याचे आवाज ,रेल्वेगाडी रुळावरून धावताना येणारा आवाज आणि प्रवाशांच्या आवाजाचा गोंगाट ऐकत आमचा प्रवास सुरु होता...खाडी,आणि उंचच उंच गगनचुंबी इमारती बघत बघत दादर स्टेशनला पोहोचलो.उतरताना अक्षरशः त्रेधातिरपिट उडाली.कसेबसे बाहेर फलाटावर आलो.दोघी भुसावळला जाणाऱ्या होत्या.
त्यां तिकिट काढायला निघाल्या त्याचवेळी अनाउन्समेंट झाली.
भुसावळला जाणारी पॅसेजर गाडी फलाट क्रमांक दोनवर तीन मिनिटांत येतेय.असे ऐकल्यावर त्या दोघीजणी जिना उतरत उतरत दोन नंबर फलाटवर निघाल्या.त्यांच्या बॅगा आमच्या हातात.आम्ही त्यांच्या मागोमाग निघालो.लगेचच गाडी आली.तुंबळ गर्दीत त्या दोघीजणी लेडीज डब्यात घुसल्या. एका खिडकीतून त्यांच्या बॅगा त्यांच्या ताब्यात दिल्या..एकाच मिनीटात गाडी मार्गस्थ झाली.तदनंतर स्टेशनच्या बाहेर येऊन आम्ही तिघांनी स्टॉलवर चहा घेतला.राठोडला आठ वाजता रेल्वे होती म्हणून तो माघारी स्टेशनवर गेला.सावंत दादरला पाहुण्यांकडे टॅक्सीने गेला. ब्रीजखालील बसथांब्याकडे मी आलो. थोड्याच वेळात मला अहमदनगर गाडी मिळाली.त्याच गाडीने मलाही अहमदनगरला जायचे होते.तिथं पाहुण्यांच्या लग्नासाठी कुटूंबिय अगोदर गेले होते.....
असा. शैक्षणिक भटकंती प्रवास एसटी बस,कार,जीप,रेल्वे आणि पुन्हा एसटी बस असा झाला.....एक वेगळा अनुभव शिकण्याचा आणि प्रवासाचा....
भाग क्रमांक --१२८
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment