माझी भटकंती धार्मिक सहल रामटेक ११४
☘️❄️☘️❄️☘️❄️☘️❄️
माझी भटकंती
भाग क्रमांक-११४
धार्मिक तीर्थक्षेत्र सहल
सन २००० पाचवा दिवस
🛕रामटेक 🛕
➖➖➖➖➖➖➖➖
जय श्रीराम,जय श्रीराम
नागपूरवरुन जबलपूर या राष्ट्रीय महामार्गाने रामटेक कडे निघालो.नागपूर पासून हे अंतर सुमारे ५० किमी वर आहे.दुपार झालेली होती.वाटेतील एका धाब्यावर दाजींनी गाडी थांबवली.काहींचा उपवास होता.त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आवडीच्या मेनूची ऑडर दिली. तोपर्यत घरी फोनवरून संपर्क साधले.वेटरने जेवणाचे पदार्थ वाढले.निवांतपणे यथेच्छ ताव मारला.गाडीतही इंधन भरले.काहीवेळाने आम्ही रामटेक कडे निघालो. मनसर फाटा आल्यावर गाडी हायवे सोडून रामटेकला निघाली.
श्रीराम वनवासात असताना रामटेकला त्यांचे वास्तव्य होते.शहराच्या पूर्वेकडील उंच सिंदूरगिरी (रामाचा )डोंगरावर प्रभू रामचंद्राचे प्राचीन मंदिर आहे.आम्ही मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो.आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली.ही टेकडी १५२ मीटर उंचीची आहे.आजुबाजूच्या परिसराचे विलोभनीय दृश्य टेकडीवरुन दिसते.नयनरम्य निसर्ग सौंदर्य न्याहाळत बसावे वाटते.इथं अनेक मंदिराचा समुच्चय असून श्रीरामाची वानरसेना इथं मुक्त संचार करीत असते. टेकडीच्या सभोवताली नैसर्गिक व बांधीव तटबंदी आहे.मुख्य राम सीतेचे मंदिर पश्चिमेकडील उंच भागात असून अंबाला तलावाच्या टोकाकडून पायऱ्या चढून वर आलो.तिथं एक दगडी भिंतीचे तळे आहे.तिथं एक विशाल नंदी व नरसिंहाची मुर्ती असलेलं देउळ आहे. टेकडीवर वराह,सिंगपूर,भैरव आणि गोकूळ असे चार दरवाजे आहेत.आत मध्ये राजा दशरथ,वसिष्ठ ऋषी, धुम्रेश्वर महादेव आणि लक्ष्मण अशी मंदिरे आहेत. श्रीराम व सीतेचे मोठे मंदिर आहे.मंदिराची शिखरे, कलश,खांबांची बांधणी, छोट्या-मोठ्या छत्र्या कमळाच्या कळीसारखे नक्षीकाम,खिडक्या,सज्जे आणि उथळ देवळ्यामुळे देवळ शोभिवंत दिसते. रामसीतेची मुर्ती काळ्या पाषाणाची असून वनवासी वेषातील आहे.मुर्तींचे तेजोमय व प्रसन्न रुप पाहून मनःशांती लाभली.मंगलमय भावपूर्ण वातावरणात आम्ही देवदर्शन घेतले.मुखाने जय श्रीराम नामघोष करत शांतपणे मंडपात बसलो. चिंतन चैतन्य मिळविण्याचा प्रयत्न करत होतो.श्री प्रभू रामचंद्रांचा पौराणिक प्रसंग डोळ्यांसमोर उभे रहात होते.दर्शनाने धन्यता मिळाली.आता आम्ही खाली उतरत होतो. दोन्हीकडे विविध वस्तू,प्रसाद,खाऊ आणि खेळण्यांच्या दुकानांची गर्दी होती.भाविकांना आपल्यात दुकानातून खरेदी करण्याची विनवणीची आरोळी विक्रेते देत होते.एका दुकानात स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू लाकडाच्या बनविलेल्या विक्रीस ठेवलेल्या होत्या. लाकडाचे उलतणं, पोळपाट, लाटणं,दहीघुसळायची रवी,काटवट,शेवगा,उलताणे,डाव इत्यादी अनेक वस्तू बघायलामिळाल्या.आमच्या पैकी काहींनी आवडीने वस्तू खरेदी केल्या.बायकोने छानपैकी लाटणं विकत घेतले.
इथलं नयनरम्य सृष्टी सौंदर्य पाहून संस्कृत कवी कालिदास यांनी अभिजात काव्य कलाकृती"मेघदूत'' या महाकाव्याचे लेखन केले आहे.त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना इथं केली आहे.आता आमचा परतीचा प्रवास सुरू होणार होता. रामटेक वरुन नागपूरला परत येऊन कारंजा, अकोला, बुलढाणा करत अजिंठयाला यायचं होतं हा प्रवास साधारणपणे ४५०किमीचा दहा बारा तासांचा होता. सायंकाळ होत चालली होती.तिथचं चहापान उरकले .जयश्रीराम,जयजय राम गजरकरत आमचा प्रवास सुरु झाला.कुंभार राजे आणि जाधव सर आणि आण्णांशी झालेल्या अधिवेशनावर गप्पा मारत असतानाच पुढील प्रवासाची चर्चाही सुरू होती. दाजींना शक्य होईल तेवढे अंतर गाडी चालवतील. तदनंतर हायवेला गरजेप्रमाणे मुक्काम करायची गरज भासली तर करु किंवा साइडला गाडीलावून विश्रांती घेऊ.
अशा एकेका विचाराला दाद देत.गाणी ऐकत प्रवास चालला होता.दरदोन तासांनी आम्ही पुरुष मंडळी चहा घ्यायला थांबायचो.दहाच्या सुमारास एका धाब्यावर मस्तपैकी जेवण उरकून पुढील प्रवासाला लागलो. हायवेला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ जरा कमी दिसत होती.एकच्या दरम्यान एका हाॅटलमधील पार्किंग मध्ये गाडी लावली .आणि दाजींनी थोडावेळ थांबून मग पुढे जाऊया सांगितले.आणि मग हळूहळू सगळे गाडीतच निद्रेच्या अधिन झालो.काहींच्या घोरण्याचे वेगवेगळे सूर ऐकायला येत होते.तश्याच अवस्थेत झोपण्याचा खटाटोप चालू होता.थोडावेळ म्हणता म्हणता पहाट व्हायला लागली होती.एकेकजण जागे झाले.तिथल्याच हॉटेलमध्ये फ्रेश होऊ लागले.. सहाच्या सुमारास चहा घेऊन पुढील प्रवासाला लागलो.भेटूया उद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत नमस्कार!
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
भाग क्रमांक ११४
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https: //raviprema.blogspot.com
जय श्रीराम
ReplyDelete