माझी शैक्षणिक भटकंती मुक्तशाळा ऐने भाग क्रमांक--१२७




🍂🌱🍂🌱🍂🌱🍂🌱🍂
 माझी शैक्षणिक भटकंती
भाग क्रमांक--१२७
🌱डहाणू ऐने ✒️📚
          
   🦋🍁🦋🍁🦋🍁🦋🍁
      ग्राममंगल मुक्तशाळा व  परिसर 
➖➖➖➖➖➖➖

सकाळी दहा वाजता आमच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली.संस्थेचे प्रशिक्षण स्थळ  ओपन सभागृहात होते.पहिलेच सेशन आदरणीय प्रा.रमेश पानसे सरांचे होते.त्यांनी एक सूचना मला फार भावली.तुम्ही वर्गात कसेही बसा, आनंदानं सहभागी व्हा, कंटाळा आला तर परिसर फिरून या आणि मनापासून लक्ष द्या.....
सर्व विषयांत माहिर असणारे मान्यवर आम्हाला  मार्गदर्शन करायला होते.प्रा.रमेश पानसे सर,  श्री मोने सर,नातू मॅडम,प्राची मॅडम इत्यादी.ग्राममंगल संस्थेचे  स्नेहघर आणि लावण्य असे प्रकल्प आहेत.शैक्षणिक उपक्रमांची प्रयोगशील शाळा इथं आहे.मुलं अनुभवातून शिकतात.शिक्षक मदत करतात.मुलांना गटागटात  अभ्यास दिला जातो.प्रत्येक गोष्ट,गृहीतक आणि घटक व्यवहाराच्या कसोटीवर पारखण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लावली जाते.इथल्या  शाळेचे नाव आहे "मुक्त शाळा " नैसर्गिक शिक्षण.
 मुलांनी गटात किंवा स्वत: मिळालेल्या ज्ञानाचे उपयोजना करुन रचना करायची. विषय वर्गखोल्यात गरजेनुसार शैक्षणिक साहित्य आहे.मुलं स्वत: साहित्याच्या मदतीने शिकतात.व्यवहारिक गणित शिकतात.शब्दापासून डोंगर, संवाद, कविता आणि गोष्टी बनवितात.
शाब्दीक उदाहरणांची रचना करतात.मुलांना समस्या निर्माण झाली तर तिचे उकलन करायला काय करायचे , कोणता मार्ग निवडायचा . 
यासाठी शिक्षकांनी केवळ मुलांना दिशा दाखवायची. प्रत्येक मूल त्याच्या गतीने शिकत जाते.मुलं कृतीशील असतात.ती कधीच शांत बसत नाहीत.मुलांच्या कलाने वागणारी,आनंद देणारी शाळा असेल तर मुल तिथं रमते.स्वयंअध्ययन, करुन पाहुया आणि कृतीयुक्त अनुभव हे रचनावादाचे त्रिसूत्र आहे.मुलांच्या भावविश्वातील जिज्ञासा निर्माण करणाऱ्या विषयावर कार्यशाळा घेऊन एकाच घटकातून अनेक विषय मुलं  समवाय एकात्म पद्धतीने  शिकतात.त्यासाठी गटनिहाय घटक नियोजन करुन त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे राबविली जाते.तिथं मुलांनी केलेले अनेक प्रकल्प बघायला मिळाले. शैक्षणिक साधनातून बौध्दिक क्षमतांचा विकास होऊन मुलांची कल्पनाशक्ती कशी वाढते.हे त्यांनी अभिव्यक्त केलेल्या लिहिलेल्या वह्यापाहून समजले..प्रत्यक्ष अध्ययन अनुभव शिक्षक कसा देतात यांचे निरीक्षण करायला मिळाले.
    जाँन पियाजे यांच्या विचारानुसार , सर्व मुले सारखी आहेत पण विचाराने वेगळी आहेत. ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते यासाठी अध्ययन स्तरानुसार वर्गात गट तयार करून त्यागटानुसार विविध उपक्रमातून मूल स्वत: शिकले पाहिजे.वर्गात अध्ययन स्तरानुसार शैक्षणिक साहित्याची मांडणी व रचना केली होती. शिक्षक आपल्या कल्पकतेने साहित्यनिर्माण करून मुलांना वापर करण्यासाठी प्रेरणा देतायत.  प्रत्येक मुलाकडून कृती करून घेणे.मुलांना छोटे छोटे सूचक प्रश्न विचारून अचूक उत्तरापर्यत पोहचण्यासाठी प्रवृत्त करणे.गरज पडेल तिथे मार्गदर्शन.आपले मूलांशी मैत्रीचे व आपुलकीचे नाते असावे. निबंध लेखनाचे प्रश्न सर्वमुलांना अचूक येण्यासाठी प्रथम मुलांशी गप्पा माराव्यात चर्चा करावी व सर्वांना सहभागी करून घ्यावे.फलकावर निबंधाचे नांव लिहून त्या विषयाशी संबंधित शब्द  मुले सांगत असताना शिक्षकांनी फक्त  फळ्यावर शब्दलेखन करावे घटकातील  आशयाचे महत्त्वाचे  'शब्द' न आल्यास पूरक प्रश्र्न विचारुन अभिप्रेत शब्दापर्यंत जात होते. त्यानंतर  प्रत्येक मुलांना माईंड मँप वरून प्रत्येक शब्दांची  वाक्ये तयार करून लेखन करावयास सांगितले. त्यानुसार मुले शब्दांचा वापर करून लेखन करत होती. गणिती क्रिया प्रत्यक्षिक करुन सोडवित होती. खरेदी-विक्री व्यवहार प्रत्यक्ष दुकान मांडून  अनुभव घेत होती.
   आमचं प्रशिक्षण हसतखेळत आणि मजेत चालले होते.ग्राममंगल येथील शाळाही उत्तम आहेत.शैक्षणिक साहित्यांचे विविध प्रकार,
शब्दकार्ड,चित्रकार्ड, विविध मॉडेल्स आणि साहित्य व वस्तूंचे संग्रह आहेत. परसबागेत मुले कामही करतात.भाज्या फळभाज्यांची मशागत करतात.तेथील फुलांची शेती फारच आवडली प्रथमतः मी मोगऱ्याच्या फुलांची शेती पाहिली.सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता.काही मुलं फुल व पक्व कळ्यांची तोडणी करत होती.शाळा आणि परिसर पाहून मनस्वी आनंद झाला.स्वयंशिस्त आणि स्वयंअध्ययनाचा वस्तुपाठच जणू..व्याख्यान,प्रकल्प ,कृतीयुक्त उपक्रम आणि शैक्षणिक साधने हाताळून आमचं प्रशिक्षण दिवसेंदिवस पुढं पुढे सरकत होते.आमच्या प्रशिक्षणात विदर्भ,कोकण मराठवाडा महानगरपालिका आणि पश्र्चिम महाराष्ट्र असे सगळीकडचे शिक्षक सहभागी होते.आम्ही तिघे एकत्र असायचो यवतमाळ येथील राठोड सर आणि रत्नागिरीचे सावंत सर.दररोजचे प्रशिक्षण संपल्यानंतर आम्ही सायंकाळी रफेट मारायला जायचो .तेव्हा पाड्यावर विखुरलेली घरे दिसायची.साध्या घरासमोरील सारवलेलं अंगण ,काहींच्या घराजवळ फळभाज्या भाजीपाल्यांचे वेल झाडेझुडपे दिसायची.
घराच्या भिंतीवर दैनंदिन जीवनातील प्रसंगांचे चित्रण चितारलेले असायचे.त्यात विशेषतः नृत्य,वाद्येवादक,लग्न प्रसंग, सणसमारंभ आणि निसर्गातील घटकांचे रेखाटन केलेले दिसायचे.हेच बघून आम्ही संस्थेच्या 'लावण्य' प्रकल्पात वारली चित्रकला रेखाटलेले चहाचे मग,रुमाल ,किचेन ,टी शर्ट आणि कापडी पिशव्या खरेदी केल्या होत्या.तेथील आठवण भेट म्हणून  स्वता:च्या टी शर्टवर तिथून वारली पेंटिंग करून घेतले होते.घराच्या भिंतीवर वारली चित्र रेखाटन नैसर्गिक रंगांचा वापर करीत नाहीत.त्याऐवजी निसर्गापासून मिळणाऱ्या माती,तांदळाचे पीठ, वनस्पतीजन्य रंग वापरून व बांबूच्या काड्यांचे ब्रश करून  रेखाटन करतात.
      एकदा सायंकाळीआम्ही मित्र फिरायला  बाहेर पडलो होतो.तेंव्हा एका चिकन सेंटर जवळील हॉटेल बाहेर गप्पागोष्टी करत होतो.
अनेकजण शेजारच्या चिकन सेंटर मधून चिकन घ्यायचे.ते हाॅटेलात भाजायला द्यायचे.काहीजण तिथंच खायचे नाहीतर पार्सल घेऊन जायचे.मग आम्हीही  खासियत असलेल्या  निखाऱ्यावर भाजलेल्या  चिकनचा आस्वाद घेतला.थोडाच मसाला लावून निखाऱ्यावर भाजलेले चिकन मस्तच चवदार लागत होते.
भेटूया उद्या चिंचणी समुद्रकिनारी तोपर्यंत नमस्कार....

भाग क्रमांक १२७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड