धार्मिक तीर्थक्षेत्र शिर्डी, शनिशिंगणापूर ११७

       

🌱🍁🌱🍁🌱🍁🌱🍁
माझी भटकंती
  धार्मिक तीर्थक्षेत्र सहल
भाग क्रमांक ११७
     अधिवेशन सहल
   सन २००० सातवा दिवस
    🔅 शिर्डी, शनिशिंगणापूर व परतीचा प्रवास🛕
 ➖➖➖➖➖➖➖➖
    पहाटेच्या भक्तीमय सूरांनी जागं झालो.नेहमीप्रमाणे नित्यकर्मे उरकून तयार झालो.मंदिरात श्री साई बाबांच्या दर्शनासाठी निघालो.शांत आणि भक्तिमय वातावरणात साई बाबांचा आरती सोहळा मंदिरात सुरू होता.भाविकांची वर्दळ होती. सभागृहात साई बाबांच्या मुर्तीकडे पाहत  टाळ्यांचा गजर करत आरती श्रवण करीत शांतचित्ताने उभे राहिले होतो.आरती नंतर मनोभावे शांततेत साई बाबांचे  दर्शन झाले.श्री साई बाबानी  श्रध्दा आणि सबुरीचा संदेश सामान्य माणसांना दिला आहे.तदनंतर आम्ही प्रसादपुडा,ताईत व खेळणी घेतली.सर्व मंदिर परिसर बघितला.सर्वच सोई आणि स्वच्छता चांगली होती.तेथील प्रसादालयात अल्पोपहार घेऊन आम्ही पुढे नेवासेहून शनि शिंगणापूरकडे निघालो.ते अंतर साधारणपणे १०० किमी असावे.आज दोन-तीन धार्मिक स्थळे करून घरी पोहोचणार होतो.आजचा सातवा दिवस प्रवासाचा होता.
      सपत्निक धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा योग अधिवेशन रजेने आला होता.शिर्डीवरुन बाहेर पडल्यावर ठराविक ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा लाकडी चरक्यावरील बैलांनी ओढणारी फिरती रसपान गृहांची रेलचेल दिसत होती. दाजींना उसाचा रस प्यायला एका रसपान गृहाजवळ गाडी थांबवायला सांगितली..जरा पुढं गेल्यावर दाजींनी गाडी थांबवली. ऊसाच्या रसाची ऑडर दिली द्या .त्या रसवाल्याने लगेच चांगले ऊस काढून चरकाला लावले आणि बैलाला हाळी दिली.त्याबरोबर बैल गोल गोल फिरायला लागला.
उसाचा रस गळायला लागला. दुसऱ्या ऊसासोबत आलं व लिंबूही लावून चरक्याला लावला.उसाच्या चुयट्या होईपर्यंत तो चेपलेला ऊस चरक्यात घालत होता.
पाचदहा मिनिटात रसवाल्याने आम्हाला फुल ग्लास भरून रस दिला.मस्तपैकी गोड आणि मधूर चव रसाची लागत होती.
रस पिल्यावर ढेकर आला.
मुलानेही आवडीने रस पिला.त्याचे बील देऊन आम्ही पुढे नेवाशाला निघालो.
           अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुका नेवासे.या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून संत  ज्ञानेश्वरांनी ''भावार्थदीपिका"हा भगवद्गीतेचे मराठीत निरुपण करणारा ओवीबद्ध  ग्रंथ लिहिला.यालाच आपण "ज्ञानेश्वरी "म्हणतो.ज्या मंदिरातील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरीचे वाचन केले तो खांब अजूनही आहे.त्यास "पैस "म्हणतात.या खांबाच्या सभोवताली मंदिराचे बांधकाम केलेले आहे.
येथील पैस खांबाचे दर्शन करून आम्ही शनि शिंगणापूरला निघालो.
अर्ध्या तासाचा सुमारे ३०किमीचा प्रवास
 होता.आज परिचित आणि जिल्ह्याच्या जवळील भागात प्रवास करत होतो.
        शनि शिंगणापूर येथे श्री शनैश्वराचे जागृत व स्वयंभू तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे.देव आहे पण देऊळ नाही असे वैशिष्ट्य असलेले स्थळ आहे.श्री शनिदेवाची पाषाण रुपातील शिळेची मूर्ती चौथऱ्यावर आहे.
गावातील कोणत्याही घराला अथवा इमारतींना दरवाजे नाहीत याचे नवल वाटते.
आम्ही पुरुष मंडळी शुचिर्भूत होऊन देवदर्शनाला गेलो.
दर्शन रांगेत भरपूर गर्दी होती. मुखाने नामस्मरण करीत रांगेत पुढेपुढे सरकत चालत होतो.श्री शनिदेवाचे मनोभावे दर्शन घेतले. गाव आणि श्री शनि देवाचे महात्म्य असून अनेक सुरस आख्यायिका ऐकायला मिळतात. तदनंतर आम्ही पुढील प्रवासाला लागलो.आता औरंगाबाद पुणे हायवेला लागलो होतो.
दाजींनी गाडी पंपावर इंधन भरण्यासाठी घेतली.तदनंतर पुढं निघालो.घराची ओढ लागली होती.कधी घरी पोहोचतोय असं वाटतं होतं. हायवेलाच एका छानपैकी पंजाबी धाब्यावर रोटी, काजू मसाला आणि तडका डालफ्रायचा मस्तपैकी आस्वाद घेऊन पुढे निघालो.
अहमदनगर,शिरुर करत आता रांजणगावला आलो.
अष्टविनायकापैकी चौथा महागणपती म्हणून लौकिक असलेले गणपती मंदिर.
प्रवेशद्वारातून गणपती बाप्पा मोरया म्हणत दर्शनासाठी निघालो.भाविकांचे श्रध्दास्थान असलेले गणपती मंदिर.मंदिर पूर्वाभिमुख असून  सभामंडप व गाभारा स्वरुपात आहे.गाभाऱ्यात गणपतीची डाव्या सोंडेची आसनस्थ रेखीव मूर्ती आहे.भक्तभावाने सहलीतील शेवटच्या धार्मिक तीर्थक्षेत्रातील श्री महागणपतीचे देवदर्शन करून सांगता झाली.पुढं हडपसर,स्वारगेट,
कात्रज करत करत ओझर्डे मुक्कामी रात्री आठ वाजता पोहोचलो.गाडीचे सारथी श्री सुनील नेमाडे दाजींची गाडी चालविण्याची हातोडी अफलातून होती.गाडीने कुठेही खोळंबा केला नाही. त्यांचे मनःपूर्वक आभार.
आमची मजेत हसतखेळत धार्मिक तीर्थक्षेत्रांची सहल संपन्न झाली.. गणपती बाप्पा मोरया....
     धन्यवाद सहकारी शिक्षक मित्रहो...
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

 

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड