माझी भटकंती धार्मिक सहल अजिंठा लेणी ११५






माझी भटकंती
भाग क्रमांक-११५
 धार्मिक तीर्थक्षेत्र सहल
सन२००० सहावा दिवस
    अजिंठा लेणी
   रामटेक पासून सायंकाळी प्रवास सुरुवात करुन रात्री एकपर्यत गाडी चालविली होती.मध्यरात्री गाडी चालविणे उचित नव्हतं.तसच दाजींनाही विश्रांतीची गरज होती त्यामुळे वाटेतच गाडी बाजूला थांबवून तीन एक तासांची झोप झाली होती.रात्रीचा अमरावती अकोला असा प्रवास 
करुन खामगावात आलो होतो.येथून अजिंठा लेणी १४०किमीवर होती.सुमारे चार तासांचा प्रवास करावा लागणार होता.आठच्या दरम्यान रस्त्याच्या कडेलाच विहीरीच्या पाण्यावरचं भिजवान दिसत होती.ते बघून गाडी थांबवली.छानपैकी हौदात पाणी होत.सगळेजण खाली उतरलो आणि गार पाण्यानं आंघोळ केली.तिथं ऊस आणि भाजीपाल्याची शेती होती.कपाशीची झाडही दिसत होती.कपाशीचे झाड कुतूहलाने मुलाला घेऊन बघायला गेलो.थोडासा कापूस शेतकरी आजोबांना विचारुन तोडला.चिवडा, लाडू,चकली आणि शेंगा या कोरड्या फराळावर ताव मारला. स्नान आणि नाष्ट्याने  ताजेतवाने होऊन जगप्रसिद्ध वारसास्थळ अजिंठा लेणी पहायला निघालो..
सकाळी दहाच्या सुमारास आम्ही अजिंठा गावात पोहोचलो.लेणी पहायला जाण्याचा रस्ता विचारून पुढे निघालो.पाच सहा किलोमीटर गेल्यावर आमची गाडी सुरक्षा रक्षकाने थांबवून बाजूला पार्क करायला सांगितले.कारण येथून पुढे लेणी पहायला जायला त्यांच्या वाहनाची सोय होती.आम्ही सगळेजण गाडीतून खाली उतरलो.तिकिटखिडकीतून प्रवेश शुल्क भरून पासेस घेतले आणि त्यांच्या गाडीत जाऊन बसलो.पर्यटकांनी गाडी भरल्यानंतर आम्ही अजिंठा लेणी पहायला निघालो.दहापंधरा मिनीटात आम्ही पोहोचलो.परिसरही शोभिवंत दिसत होता.तदनंतर गाडीतून खाली उतरून लेणी पहायला निघालो.जागतिक वारसा स्थळ म्हणून लौकिक असलेले शिल्पवैभव भारतातील सात आश्चर्यापैकी एक.स्थापत्यकलेचा अप्रतिम आविष्कार..लेणी वाघूर नदीच्या परिसरातील डोंगरावर ४०-१००फूटी उंचीवर विस्तीर्ण जंगलातील डोंगरातील कातळात कोरलेली आहेत.लेणी समुहात २९ लेणी आहेत.ही लेणी बौद्ध धर्माचा वारसा जतन करून ऐतिहासिक कालखंडाची ठळक ओळख दर्शविणारी आहेत.चार लेणी चैत्य सभागृह स्वरुपात असून बाकीची लेणी विहार स्वरुपात आहेत.एकेक लेणी बघताना आपण आश्र्चर्यचकित होतो.कुतूहल आणि उत्सुकता वाढते.इतिहासाच्या संस्कृतीची माहिती आणि महती समजते.आपण शिल्पकला पाहून भारावलो जातो.प्रत्येक ठिकाणची रचना आणि नक्षीकाम वेगवेगळे आहे.बुध्दांच्या जीवनातील अनेक प्रसंग, भावमुद्रा,गुंफा, आणि मंदिरं कोरलेली आहेत.इंग्रज अधिकाऱ्याने या लेण्यांचा शोध लावला आहे.ही लेणी म्हणजे शिल्प, चित्र आणि आर्किस्टेश्चर कलांचा तिहेरी संगम होय.यातून ही शिल्पे साकारली आहेत.कोरीव काम आणि रंगित भिंती चित्रासाठी जगप्रसिद्ध लेणी आहेत.. जवळपास तासभर चालत चालत उभ्यानेच ही लेणी बघत होतो.अनमोल स्मृतींचा ठेवा मनात साठवत आम्ही आता माघारी निघालो होतो..उन्हाची तीव्रता वाढत होती.मग त्यांच्या गाडीतून खाली आलो.आमच्या गाडीत बसून पुढे दौलताबाद किल्ला पहायला निघालो.हे अंतर साधारणपणे ११० किमी असावे.तीन तासांचा प्रवास करावा लागणार होता.वाटेतच एके ठिकाणी फळांच्या गाड्या उभ्या होत्या.तिथली फळं खुणावत होती दाजींना थांबविण्याची सुचना केल्यावर दाजिंनी गाडी बाजूला घेऊन थांबविली.मी आणि कुंभार काकां खाली उतरलो.मोठाल्या आकाराची सिताफळ आणि अंजीर ताजीतवानी दिसत होती.ती एकेक किलो खरेदी केली. आणि पुढे निघालो.खरचं सिताफळाची चव मस्तच होती.अगदी सिताफळ रबडी खाल्ल्यासारखी चव चाखायला मिळाली.मुलानेही सिताफळ आवडीनं खाल्ले.इतरांनी अंजीर आणि सिताफळाचा आस्वाद घेतला.मस्तपैकी फलाहार झाला होता.असं अधूनमधून चालूच असायचे.नेहमीप्रमाणे प्रवास चालला होता.पुढे एके ठिकाणी दुपारचे लाईट जेवण उरकून आम्ही चारच्या दरम्यान आम्ही दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो.
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
भाग क्रमांक -११५

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड