माझी भटकंती श्री नाईकबा भाग क्रमांक-१२५
🍂☘️🍂☘️🍂☘️🍂
माझी भटकंती
भाग क्रमांक--१२५
🛕श्री नाईकबा बनपुरी 🛕
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण झालेला सातारा जिल्ह्यातील. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील कडेकपारीत वसलेला पाटण तालुका.डोंगराच्या माथ्याव, मध्याव आणि पायथ्याशी गर्द हिरव्यागार जंगलझाडीत विखुरलेली गावे.महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना आणि तिच्या उपनद्यांच्या दुतर्फा काठांवर वसलेली गांव.कोयना धरण परिसर , अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवज पावसाचे आगर ,ओझर्डे धबधबा, रिव्हर्स धबधबा अशी अनेकाविध प्रेक्षणिक पर्यटनस्थळे पाटण तालुक्यात आहेत.त्यापैकीच वाल्मिक पठार, दिवशी घाट,वांगमराठवाडी व महिंद धरणं, भोसगांव फुलपाखरु निसर्ग पर्यटन केंद्र आणि ढेेेवाडी वन विभागातील ओहळ ओढे, धबधबे, पशुपक्षी, वृक्षसंपदा आणि पठारावरील रानफुलांचा रंगिबेरंगी फुलोत्सव अशा सौंदर्य स्थळांनी समृद्ध असलेला ढेबेवाडी परिसर...याच भागात महाराष्ट्र व कर्नाटकातील समस्त जनांचे लाखो कुटूंबियांचे श्रध्दास्थान शक्ती भक्तीचे कुलदैवत असणारे श्री नाईकबा देवस्थान वांग नदीच्या परिसरात डोंगरावर आहे.श्री नाईकबा देवाचे मंदिर बनपुरी गावातील डोंगरावर असून घाटरस्त्याचा मार्ग आहे.असून जानुगडेवाडी येथूनही मंदिराकडे पायी चालत जाता येते.
मार्च महिन्यातील एका रविवारी माझे जिवलग मित्र श्री भास्कर पोतदार यांनी सकाळी लवकर फोन केला.आपल्याला आजच दुचाकीवर ढेबेवाडी भागात देवाला जायचं आहे. माझ्याबरोबर येतोस का ,म्हणून विचारले.मलाही दुसरं कोणतंही काम नसल्याने त्याला होकार दिला.अर्ध्या तासाने तुझ्या घरी येतो .तयार रहा असं सांगुन फोन ठेवला.मग घरची संमती घेऊन आम्ही दोघेजण देवाला नैवेद्य अर्पण करणे आणि देवदर्शनाला दुचाकीवर निघालो....श्री नाईकबा देवस्थान वाई पासून सुमारे १२५ किमी अंतरावर असावे.वाई पाचवड करत हायवेला आलो.आता कराडपर्यंतचा हायवेचा प्रवास होता.शेंद्रे कारखान्याच्या अलिकडील छोटेखानी हॉटेलमध्ये नाष्टा करून आम्ही पुढे निघालो.. वाहनांची वर्दळ बरीच होती.गप्पागोष्टी करत करत निघालो होतो..श्री नाईकबा देवस्थान विशेषतः सांगली भागातील कुटूंबियांचे कुलदैवत आहे.त्यामुळे वर्षातून एकदा आम्ही कुटूंबिय देवदर्शनाला जातो. असे मला समजले. दुचाकीवर पहिल्यांदाच इतक्या लांबवर मी त्यांच्यासमवेत निघालो होतो..हायवेने आम्ही मलकापूर पर्यत आलो.त्याच्या रस्ता फिरण्यातला आणि पाठ होता कारण तो डीएडला पांडूरंग देसाई डीएड कॉलेज कुसूरला होता.त्यामुळे प्रवासात कॉलेजला असतानाच्या गमतीजमतीचे किस्से शेअरिंग करायचा ते ऐकत आमचा प्रवास चालला होता.
मला फक्त इकडचं आमच्या हायस्कूलचे आदर्श मुख्याध्यापक श्री एस.के.कुंभार सर व ए.पी.पाटील सरांची गावं ढेबेवाडी भागातील आहेत एवढच माहिती होतं .मुख्याध्यापक श्री एस.के.कुंभार सर यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यास तळमावले हायस्कूलमध्ये आलो होतो.त्यावेळी आमदार श्री विलासराव पाटील उंडाळकर आणि प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते सेवागौरव झाला होता. तेव्हा स्मरणिका प्रकाशन केली होती. मी, हणमंतराव पिसाळ (नाना),विजय तांगडे यांच्या समवेत आल्याचे तळमावले गाव दिसल्यावर लक्षात आले.तसेच एकदा आईसोबत कराडवरुन कुठऱ्याला आणि कुंभारगावाला काळ्यापिवळ्या वडापच्या गाडीतून आलो होतो. मायंदाळी गर्दी केली होती.आत जेवढे, तेवढेच बाहेरच्या बाजूला पाय ठेवून जागा मिळेल तिथं उभं राहून लोंबकळत प्रवास केला होता.तो आजही डोळ्यासमोर येतो.
ढेबेवाडीत आल्यावर एका रसपान गृहात उसाचा रस घेऊन पुढे निघालो.. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढत होती.मधेच श्री नाईकबाच्या नावानं चांगभलं असा उद् घोष ऐकायला मिळत होता. येणाऱ्या लोकांच्या कपाळावर लावलेला आणि कपड्यावर पडलेला गुलाल ठळकपणे दिसत होता.ते बघून भास्कर तिथल्या यात्रेचं वर्णन मला सांगत होता. यात्रेच्या वेळी लाखो भाविक श्री नाईकबाच्या देवदर्शनाला मनोभावे येतात.सगळे भाविक गुलाल-खोबऱ्याचं उधळण केल्याने अवघे पठार गुलालाने माखते.भाविक गुलाल खोबरे व नैवेद्य देवाला वाहतात.एकमेकांना आनंदाने कपाळी आनंद गुलाल लावतात.सजवलेल्या सासनकाठ्या नाचवत गावोगावीचे भाविक येतात.हलगीघुमक्याचा आवाज निनादत असतो.श्री नाईकबाच्या नावानं चांगभलं असा गजर ,नामस्मरण सुरू असतं.घराला समृद्धी लाभावी. सगळ्यांना सुखसमाधान लाभावे.घरात आनंदी आनंद नांदावा म्हणून भक्तीचा सागर देवदर्शनाला येतो...
एव्हाना आम्ही घाटरस्त्याने पठारावर आलो होतो.अवाढव्य पवनचक्क्यांनी नजर वेधली. पायथ्यावरुन इवल्याशा दिसणाऱ्या पवनचक्क्या प्रत्यक्ष बघताना अजस्त्र आकारात दिसत होत्या.त्यांचा टॉवर आणि वाऱ्याच्या वेगानं फिरणारी पाती आज प्रथमच एवढ्या जवळून पाहिली.गाडी योग्य जागी पार्क करून देवदर्शनाला आम्ही निघालो.देवाच्या अगाध लीलांची अवीट गोडवा गाणारी गाणी ऐकायला मिळत होती.नाद ताल ठेका नाचायला लावणारा होता.रस्ता गुलालमय झाला होता... गर्दीतून पुढे सरकत निघालो.दुतर्फा अनेकविध दुकाने होती.. प्रसाद,खाऊ घेण्याची आरोळी ऐकायला येत होती.एका खाऊच्या दुकानाजवळ चपला ठेवून आम्ही देवळाकडे निघालो.दर्शनाची रांगेत उभे राहिलो. देवदर्शन झालेल्या लोकांच्या हास्यातून समाधान झळकत होते. ओळखीच्यांना एकमेकांना गुलालाने माखवत होते. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने दर्शनाला वेळ लागत होता.प्रशस्त मंदिराचे बांधकाम चालले होते.मंदिराचे सभामंडप आणि गाभारा असे दोन भाग आहेत.भाविक मंदिराच्या बांधकामासाठी उस्फूर्तपणे देणगी देत होते.त्याची घोषणा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त माईकवरुन नावगाव व रक्कमेचा उल्लेख करत होते. डोंगराचा राजा नाईकबा माझा ,असं भारदस्त तेजःपुंज मुर्तीच मुखवट्याचे रुप दिसतं.नाईकबा भगवान शंकराचा अवतार.
गाभाऱ्यात जावून गुलाल खोबरे वाहिले. घरुन आणलेला नैवेद्य दाखविण्यासाठी पुजाऱ्यांकडे दिला. तो देवास अर्पण केला.मनोभावे श्री नाईकबाचे देव दर्शन घेतले.श्रीफळ वाढविले.देवस्थान परिसर बघितला.आमचे साहित्य ठेवलेल्या खाऊच्या दुकानात प्रसाद घेतला.आणि परतीच्या प्रवासाला लागलो.
दुचाकीवरुन घाट उतरून खाली ढेबेवाडीत आलो.एका हॉटेलवजा खानावळीत शाकाहारी थाळीचा आस्वाद घेतला. तदनंतर गाडी लावलेल्या ठिकाणी हिरव्यागार फुटभर लांबीच्या व घोसाळ्यापेक्षा कमी जाडीच्या काकड्या बघितल्या.कराड,सांगली आणि कोल्हापूर भागात 'वाळकं' या नावाने ओळखले जाते.अतिशय चवदार असतात.त्या आवडतात म्हणून दोघांनीही खरेदी केल्या.व आलेल्या मार्गाने आमचा घराकडे प्रवास सुरू झाला.रमतगमत गप्पागोष्टी करत सायंकाळी वाईला पोहोचलो.एक रविवार निसर्गरम्य ढेबेवाडी भागातील धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री नाईबाच्या देवदर्शनाचा लाभ घेतला.तदनंतर कुटूंबियासमवेत दोन वेळा देवदर्शनाला जाण्याचा योग आला होता.
भाग क्रमांक- १२५
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment