लग्नासवे प्रवास वर्णन
[12/30, 9:46 AM] santosh shinde np: *विवाहसोहळा* .. _एक निमित्त_
जुळल्या तारा प्रितीच्या
मैफिल नात्याची सजली
ऋणानुबंधाच्या पडल्या गाठी
युगायुगांची नाती जुळली
अथांग जनसागरात आपल्या जीवनाची साथ शोधायची,आशा,आकांक्षा,आवड आणि निवड यांचा मेळ घालायचा आणि सप्तपदीच्या पाऊलखुणांनी गृहस्थाश्रमाचा उंबरठा ओलांडण्याचा सुरेल सोहळा म्हणजे विवाह.खरसुंडीच्या अविस्मरणिय प्रवासातील परिचयाच्या गाठी आपल्या स्वभावकौशल्याने दृढ करणारे आणि आपल्या असामान्य काव्यकौशल्याने साहित्यिक,सांस्कृतिक,वैचारिक प्रभाव टाकणारे मित्रवर्य श्री रविंद्रजी लटिंगे यांच्या चिरंजिवाच्या,हर्षदच्या शुभविवाहास आपली सदेह उपस्थिती दर्शवावी आणि अनायासे कराडला जायचेच आहे तर त्या निमित्ताने समस्त शैक्षणिक विश्वाच्या आकर्षणाचे निमित्त झालेल्या,अवलिया भटकंतीकार अप्पांच्या लेखनकौशल्यातून संपूर्ण राज्यभर सुप्रसिद्ध झालेल्या शाळकरीचीही मजा चाखावी हा अंतस्थ हेतूही मनी ठेऊन डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीतही मनाने चिरतरुण चिकणेसाहेबांच्या सोबतीच्या उबार्यात महाबळेश्वर ते वाई दुचाकीवर आणि तेथून मित्रवर्य श्री शिवाजी निकम व कविवर्य श्रीगणेशजी शेंडे यांचेसह सदाहरित फोटोकार श्री उद्धव निकमांच्या वातानुकुलित क्विडमधून कराडकडे प्रस्थान केले.चिकणेसाहेबांनीही उद्धवच्या साथीला बसायचे ठरविल्याने संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याची क्रीडाधुरा असलेल्या दोन समर्थ खांद्यांमध्ये माझे मात्र खेलो इंडियाचे रजिस्ट्रेशन झाले.अतितच्या बसथांब्यावरील सेल्फसर्व्हिसयुक्त परंतु स्वादिष्ट अल्पोपहाराने क्षुधाशांती करुन पालीच्या खंडोबाच्या दर्शनात लग्नसोहळ्यातील हळदीच्या रंगांने रंगत तळबीडाकडे कूच केले.
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे समाधीस्थळ असलेले तळबीड.हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सोयराबाई यांचे तळबीड.राजाराम महाराजांच्या निष्क्रियतेवर स्वपराक्रमाने आणि स्वराज्यनिष्ठेने मात करुन औरंगजेबाच्या मगरमिठीतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याचे रक्षण करणार्या महाराणी ताराबाईंचे तळबीड.शौर्य,पराक्रमाचे आणि प्रसंगी नात्यागोत्यापेक्षा स्वराज्यनिष्ठेला प्राधान्य देणार्या कर्तव्यनिष्ठेचे प्रतिक असणार्या सरसेनापती हंबीररावांच्या समाधीवर नतमस्तक होऊन आणि ह्या निष्ठास्थानाला लागूनच असणार्या भव्य,सुंदर,देखण्या मंदिरातील भगवान प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन मग गुगलमॅपवर सुरु झाला कराडमधील विविहस्थळाचा शोध
क्रमशः
[12/31, 9:10 AM] santosh shinde np:
*विवाहसोहळा...एक निमित्त*
कराड शहरातील जिव्हेश्वराच्या मंदिरात उभारलेल्या लग्नमंडपातील भोजन समारंभाच्या देखरेखीत व्यस्त कार्यमालक लटिंगे सरांना आपल्या उपस्थितीची जाणिव करुन देऊन मोकळ्या श्वासासाठी आम्ही पुन्हा बाहेर पडलो.तळबीडात वाचनवेड्या मनाचे लक्ष वेधणार्या पुस्तकांचे अभ्यासू लेखक,प्रभावी वक्ते,प्रतिथयश प्रकाशक आदरणिय सी.डी पवार यांचे समवेत चहापानाबरोबरच विविधांगी चर्चेचा आनंद घेऊन शुभमुहूर्ताची वेळ गाठण्यासाठी पुन्हा विवाहमंडपात दाखल झालो.शाळकरीच्या ओढीने वरपिता लटिंगेसरांना शुभेच्छा द्यायच्या आणि लगेच निघायचे या विचाराने विवाहमंडपातील गर्दीत शिरलेली पाऊले मात्र पौराहित्य करणार्या कुलकर्णीकाकांच्या धीरगंभीर आणि विवाहमुहूर्ताचे,मंगलअक्षदारुपी शुभाशिर्वांदांचे महत्त्व पटवून देणार्या विवेचनाने लग्नघटिका होईपर्यंत जागच्या जागी खिळली.पूर्णपणे निःशब्द होऊन मनामध्ये केवळ आणि केवळ वधूवरांच्या शुभकामनांचाच विचार ठेऊन उजव्या हातानेच अक्षदारुपी शुभेच्छांचा वर्षाव करण्याचा आणि मंगल अक्षदा ह्या अत्यंत शुद्ध,स्पष्ट स्वरुपातच म्हणण्याचा जोशीकाकांचा आदेश मनात खोलवर रुजला आणि त्याचबरोबर लग्नसोहळ्यास उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे स्वागत पुष्प व पुस्तकभेटीतून करण्याची कार्यमालकाची अभिनव कल्पना एक नविन दृष्टिकोन देऊन गेली.ह्या नवविचाराचे सार्वत्रिक अनुकरणाची संकल्पना मनी रुजवत लटिंगेसरांचा आणि त्याचबरोबर ह्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने आपल्या शिक्षकबंधूच्या खांद्याला खांदा देऊन त्याच्या सहाय्यासाठी स्वागतसमारंभाची धुरा संभाळणार्या वाईतील शिक्षकवर्गाचा निरोप घेऊन भुकेल्या पोटाने शाळकरी गाठली.
शब्दप्रभू अप्पांच्या लेखणीतून अनुभवलेल्या शाळकरीचा शब्दशः अनुभव घेत क्षुधाशांती करताना लटिंगेसरांची भोजनव्यवस्था नाकारल्याची शिवाजीरावांच्या मनातील खंत सर्वांनाच जाणवली.शाळकरीच्या अभिनव संकल्पनेतील वातावरणाचा अनुभव घेत असतानाच प्रत्यक्ष अप्पांचेच परतीच्या वाटेवरील चहापानाचे निमंत्रण आले.आणि मग गाडी नागठाण्याच्या दिशेने वेगाने प्रवास करु लागली.आपल्या नातलगांच्या लग्नकार्यातील गडबडीतही शिक्षकवेड्या आणि माणूसवेड्या अप्पांनी आमच्याअगोदरच भरतगाव गाठले होते.अप्पांच्या शेजारीच वास्तव्य असणारा आणि त्यांच्या नावाशीच साधर्म्य असणारा डी.एड मित्र सुनिल शेडगेच्या भेटीने अप्पांच्या समवेत त्यांच्याच घरच्या चहापानाचा आनंद द्विगुणित झाला.त्यांचे आणि केवळ त्यांचेच नव्हे तर अनेकांचे प्रेरणास्थान,श्रद्धास्थान असलेल्या त्यांच्या वडिलांच्या उपस्थितीत अप्पांच्या भटकंतीचे विलक्षण अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकताना वेळेचे भान कुणाला?पण आम्ही विसरलो म्हणून सूर्यदेव थोडेच थांबणार?ढळत्या दिवसाबरोबर अस्तंगत होणार्या नारायणाबरोबर वाढत जाणार्या थंडीने अप्पांच्या घरातून बाहेर पडण्यास तयार नसलेले मन आवरावे लागले.प्रत्यक्ष त्यांच्याच स्वाक्षरीने त्यांच्याच हातून निरोपाची भेट म्हणून मिळालेले । *साताराच्या सहवासात* उराशी कवटाळत पुन्हा वाईच्या दिशेने निघालो.वाईपर्यंत चारचाकीतील उबदार प्रवासाचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा वाढत्या थंडीत आणि महाबळेश्वरहून परतीच्या प्रवासातील पर्यटकांच्या गर्दीत दुचाकीवरुन घाटातील वळणे पार करीत चिकणे साहेबांना सुरक्षित घरपोहोच करण्याचे कार्य संपन्न केले.
श्री संतोष शिंदे नगरपालिका शिक्षक पाचगणी
Comments
Post a Comment