माझी भटकंती एकविरा माता व लेणी कार्ला भाग क्र.५१
माझी भटकंती
क्रमशः भाग---५१
सहल प्रवास रविवार दिनांक २५ मार्च २०१२
एकविरा देवी व लेणी कार्ला
तदनंतर आम्ही कार्ला लेणी व एकविरा देवी च्या दर्शनासाठी निघालो.
लोणावळ्यातून ८ किमी अंतरावर लेणी डोंगरावर आहेत.पायथ्यापासून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायथ्याशी झाडीत गाडी पार्क करून आम्ही मातेच्या दर्शनासाठी निघालो.उन्हात पायऱ्या चढताना अंगातुन घाम फुटत होता. थंडगार वाऱ्याची आणि पाण्याची गरज भासत होती... तरीही गटागटाने गप्पामारत निघालो होतो. काहीजण जोडीजोडीने चालले होते.
रमतगमत अर्ध्या-पाऊण तासाने वर पोहोचलो.कार्ला येथील लेणी प्रसिद्ध असून ती राष्ट्रीय स्मारक म्हणून संरक्षित केली आहेत.सर्वांचे लेणी पहाण्याचे शुल्क भरून एन्ट्री पास घेतले.ततपुर्वी प्रथम मंदिर पहायला निघालो.
एकवीरा आई तू डोंगरावरी
नजर आहे तुझी कोळ्यावरी
अशा अनेक लोकगीतांच्या ठेक्यावर ताल धरायला गाजलेली लोकनृत्य लावतात.. गाण्यातून देवीचा महिमा सादर करतात.
एकवीरा देवी म्हणजे आदिशक्तीचे पीठ, आगरी कोळी समाजाचे दैवत.दर्शनासाठी हजारो भाविक येतात.तिथं एकसारखी तीन मंदीरे आहेत.मंडप, गोपुरे व गाभारा आहे.देवीचे भक्तीभावाने जोडीने देवदर्शन केले.उन्हाच्या चांगल्याच झळा जाणवत होत्या.. म्हणून मंदिराबाहेर थोडावेळ विसावा घेतला.. लेणी आणि परतीचा प्रवास यांवर चर्चा केली.
तदनंतर लेणी पहायला निघालो.भटकंती करणाऱ्यांना लेणी आणि गडकिल्ल्यांच्या अप्रतिम सौंदर्याची पर्वणीच असते.
. गडकोट म्हणजे अस्सल सौंदर्य स्थळ होतं.भटकंतीचं खरं समाधान लाभते.तिथं बौध्दकालिन लेणी आहेत.विलोभनीय कोरीव काम व स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना.लेणी पहाताना अक्षरश: कुतूहलाने पाहत रहावं असं वाटतं.१६ लोणी असून एक चैत्यगृह व इतर विहार आहेत.सिंह स्तंभ आहे.अनेक मजली प्रसादाचे देखावे आहेत.
गौतमबुध्दाच्या मूर्तीचे अप्रतिम कोरीव काम आहे.या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे चैत्यगृहातील खांबावर शिलालेख कोरलेले आहेत.
लेणी पाहून समाधान झाल्याचे चेहऱ्यावर दिसत होते. विविध पोजमध्ये फोटोग्राफी केली.सायंकाळ झाली होती... पायऱ्या उतरून खाली आलो.. परतीच्या वाटेचा प्रवास सुरू झाला....
गाण्यांच्या भेंड्या खेळत.हसतखिदळत, चेष्टा मस्करी करत मस्तपैकी परतीचा प्रवास सुरू झाला... गाण्यांच्या भेंड्या खेळण्यात व गाणे गायला लेडिज पटाईत .बऱ्याच गाण्यांच्या ओळी तोंडपाठ. एकमेकिंच्या साथिनं गायच्या.आमचं मात्र हसं व्हायचं... काही वेळा आलेल्या शब्दाच गाणं पटकन आठवायचा न्हाय मग हळूच नकळत मोबाईलमध्ये पाहून सांगायचो..आणि मग गायचो...
आनंदी आनंद अशोककुमार ही लहर आली की गाणं म्हणायचा.. काहिंचे घरुन फोन यायला लागले..'रात्रीचे जेवण करून येणार आहे.'परतीचा मेसेज दिला जात होता. सारोळ्या जवळील अमृता गार्डन मध्ये मस्तपैकी प्रत्येकाने आवडीच्या डीशची फर्माईश केली.सहलीतील ठिकाणांविषयी गप्पामारत व्हेज-नॉनव्हेज वर ताव मारला...
रात्री उशिरा घरी पोहोचलो..
एक दिवसाची खूप छान ट्रीप झाली.
🍂〰️➖🍂〰️➖🍂〰️➖
लेखन दिनांक १७ मे २०२०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com
मस्तपैकी सहल झाली होती....
ReplyDelete