माझी भटकंती वासोटा किल्ला भाग क्र---४९
शालेय उपक्रम
माझी भटकंती
पुस्तक परिचय
माझी ज्ञानमंदिरे
Lifestyle
प्रश्नपेढी
सामान्य ज्ञान
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
: ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
माझी भटकंती
क्रमशः भाग--४९
⛰️ वासोटा किल्ला ⛰️
🍀🌳🍀🌳🍀🌳🍀🌳🍀
इथं वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी मेठ -इंदवली नावाचं गाव होतं.कोयना धरणामुळे व अभयारण्यामुळे त्या गावाचे स्थलांतर झालेचे गाईडने सांगितले. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील वनदुर्ग वासोटा किल्ला.दुर्गयात्रींचे आवडते ठिकाण.जावळीच्या घनदाट जंगलातील वासोटा किल्ला.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवाई पर्यतच्या काळातील बंदिवासासाठी असलेला किल्ला..
चालताना आधारासाठी काठी हातात घेऊन पुढे निघालो होतो.जंगलातील प्राण्यांची व पक्ष्यांची नावासह चित्रांचे फलक होते...ते बघत ओढ्याजवळ आलो.पांढरेशुभ्र खळाळत वाहणारे पाणी .तेथील गुळगुळीत खडकांवर बसून विसावा घेतला.ओढ्याच्या जवळ हनुमानाचे मंदिर होते..या लोकेशनवर मस्तपैकी फोटोग्राफी केली.पाण्यात पाय सोडून निवांत पणे काही क्षण घालविले.
मोठमोठ्या वृक्षांच्या गर्द छायेत अवघड घसरट्या खडकाळ वाटेने गड चढताना सुध्दा अंगातुन घाम फुटायला सुरुवात झाली... काठीचा आधार घेत ,परिसर न्याहाळत ,गाईडच्या वासोट्याच्या गोष्टी ऐकत आम्ही चढण चढत होतो.गर्द सावलीतून जाताना उन जाणवत नव्हतं.वाटेत अनेक ठिकाणी झाडं पडलेली दिसतात..त्याचे वेगळेच काष्ठशिल्प दिसते. झाडाखाली बसून थोडावेळ थांबून तिथं बिस्किटे खाल्ली.वेष्टणाचे कागद सॅकमध्ये ठेवले.पुढे गेल्यावर एका झाडाला लावलेला "नागेश्वर" पाटी बघून जाधव सरांनी विचारलं ही वाट नागेश्वरकडे कशी कशी जाते.गाईडने आम्हाला नागेश्वर सुळक्याची माहिती दिली.तिथं महाशिवरात्रीला यात्रा असते.या पायवाटेने नागेश्वरला जाता येते..
घसरट्या वाटेने गुळगुळीत खडीतून आता एका टप्प्यावर येऊन पोहोचलो.तेथून कोयना जलाशयाचे दृश्य बघितले. बोट ते घनदाट जंगलातून आपण इथवर कसे आलो.ती वाट दिसतेय का याची दगडावर बसून चर्चा केली. तिथेच उभे राहून फोटो काढले. किल्ला नजरेच्या टप्प्यात होता.. अरुंद वाटेने काठीच्या आधाराने पायऱ्या चढत गडावर पोहचलो.. "छत्रपती शिवाजी महाराज की जय,'हर हर महादेव" घोषणा दिल्या. एका झाडाखाली सगळेजण निवांत बसलो.
चालल्याने शिणवटा आला होता..भूकेचीही जाणीव झाली होती.फरसाण, बिस्किटे खाल्ली.तिथं उपलब्ध झालेला मस्तपैकी लिंबूरस घेतला.तो खालून गडावर पाणी व साहित्य घेऊन वर आला होता.आणि पर्यटकांची मस्तच सोय करत होता.सलाम त्याच्या कष्टाला.
मग आम्ही गड फिरायला निघालो.गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ४२६७ फूट आहे.आम्ही थांबलो होतो तिथंच पलीकडे मारुतीचे बिन छताचे मंदिर आहे.तिथं दर्शन घेऊन आम्ही उजवीकडील माचीकडे (काळकाई ठाण्याकडे) निघालो.वाटेतील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.सर्वांचा ग्रुपफोटो काढला.. तेथून तसेच पुढे माची कडे गेलो.तेथून नागेश्वर सुळका व इतर डोंगररांगांचे विलोभनीय दृश्य दिसते... मोबाईलवर फोटोग्राफी केली.नागेश्वरच्या अलिकडे छोटा सुळका आहे.तेथून पश्चिमेकडे कड्याखालील अवघड वाट कोकणातील चोरवणे गावात उतरते.कड्यावरुन कोकणातील निसर्ग सौंदर्य पहात आम्ही पुन्हा मारुती मंदिराजवळील पायवाटेने पश्चिमेकडे गेलो.तिथं ताई तेलणीच्या वाड्याचे अवशेष आहेत.जोतं आपल्याला दिसते.. तिथून माघारी मंदिराजवळ आलो.डावीकडील बाजूने जंगलाकडे निघालो.जवळच दोन पाण्याची टाकी व चूना मळण्याची घाणी दिसते.पूर्वी बांधकाम करताना चूना बारीक करायला दगडाच्या घाणीचा उपयोग करत.जंगलवाटेने पूर्वेकडे कडा आहे .त्याला बाबू कडा म्हणतात.परमेश्वराने या भागात निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण केली आहे.समोरच आपल्याला जो किल्ला दिसतो.त्याला 'जूना वासोटा' म्हणतात.बाबू कडा आणि जून्या किल्ल्यामध्ये दरी आहे.तिथंही इको साऊंड (प्रतिध्वनी ) ऐकायला येतो.पूर्वेला घनदाट जंगल , पश्चिमेकडील डोंगरकडे आणि कोयना जलाशयाचा त्रिवेणी नजराणा न्याहाळत , विविध लोकेशनवर मस्तपैकी फोटोग्राफी करत वासोटा किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याचे मनसुबा पूर्ण होत आला.. गाईडने बरीच किल्ल्याची माहिती दिली.परतीच्या प्रवासाला सुरुवात केली..आता काठीचा उताराला सगळ्यात जास्त गरज भासणार जणूकाही हॅण्डब्रेकच तो...आल्यावाटेने ठेचकाळत तोल पुढे जात झोकांड्या घेत एक-दोन ठिकाणी घरंगळत आम्ही ओढ्यावर आलो..चालून चालून पाय ठसठसायला लागले होते.काही वेळा पायात फेटके येत होते.पण आज ट्रेकिंग पूर्ण करायचेच असा निर्धारच केला होता.ओढ्यात मस्तपैकी वॉश घेतला.हात पाय धुतले.पाण्यात पाय सोडून बसलो.गारव्यामुळं छान वाटत होते.. आज १०० टक्के शुद्ध वातावरणात, नैसर्गिक परिसरात , घनदाट जंगलाच्या सहवासात वासोटा किल्ल्यावर ट्रेकिंग करायचा आनंदच वेगळा. जीवनाला सकारात्मक ऊर्जेचे संचित मिळाले. ओढ्यातून पायवाटेने वनविभागाच्या इमारतीजवळ आलो.तिथं प्लॅस्टिक वस्तू दाखवून डिपॉझिट माघारी घेतले.आणि बोटी कडे निघालो..चिखल तुडवत बोटी जवळ आलो.गाईड म्हणजेच बोटमनने सर्व आल्याची खात्री करून बोट सुरू केली.. बोटीतून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला...सायंकाळचे दृश्य नजरेत साठवत , निसर्ग सौंदर्य मनातल्या कप्यात साठवत ,फोटो न्याहाळत प्रवास चालला होता..सगळे समाधानी आणि आनंदी होते.सफलता झाली होती.एक ट्रेकिंग पूर्ण केले होते.शेंबडीतील कोयना रिसॉर्टमध्ये उतरलो.बोट पुढे बामणोलीला गेली.भूक लागली होती.आचाऱ्याला पटकन जेवण लावण्याची सूचना केली...
मस्तपैकी मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतला..
नेहमी प्रमाणे ट्रेकिंग वर गप्पामारत वाईला आलो...
एकदम झकास अनुभव
🦋🌸🦋🌸🦋🌸🦋🌸🦋🌸
हा ट्रेकिंग अनुभव
हा ट्रेकिंग अनुभव
जानेवारी २०१६ ला- मी,श्री प्रशांत वाडकर,श्री शिवाजी फरांदे,श्री सुनील जाधव व श्री विक्रम वाडकर. यांच्या समवेत घेतला.
➖➖➖➖➖➖➖➖➖आॅक्टोंबर २०१६
मी,श्री शिवाजी फरांदे,श्री सुनील जाधव,श्री बाळकृष्ण पंडीत व श्री राहुल हावरे
➖➖➖➖➖➖➖➖➖ १डिसेंबर २०१९
मी,श्री कमलाकांत म्हेत्रे साहेब,श्री शेखर जाधव,श्री शिवाजी निकम,श्री प्रशांत पाटील,श्री निशांत राठोड,श्री कुमार जाधव ,कुमार आदित्य, कुमारी समू आणि कुमारी सृष्टी
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई





Comments
Post a Comment