माझी भटकंती लोणावळा भाग-५०
🌱🔅🌱🔅🌱🔅🌱🔅🌱
माझी भटकंती
क्रमशः भाग---५०
🛕शिरगाव (पुणे )-लोणावळा वॅक्स म्युझिअम 🛕
➖➖➖➖➖➖➖➖➖
सहल प्रवास रविवार दिनांक २५ मार्च २०१२
मेणवली केंद्रातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा केंद्रप्रमुख सौ विजया कांबळे मॅडम यांनी एकदा मेणवलीत आयोजित केली होती.सभेतील विषय पूर्ण झालेवर माहिती संकलित करताना सहज माझ्या मनात एक दिवसाच्या सहलीचा विषय आला मग तो इतरांशी शेअर केला.कांबळे बाईंनाही कल्पना दिली... उपस्थित सर्वांनी सहलीला होकार देताच..सर्वानुमते एक मनपसंत स्थळ ठरवून एका रविवारी जायचं निश्चित केले... मला,श्री राहुल हावरे सर,श्री दत्ता गोळेसर ,श्री महेश सपकाळ सर,श्री गजेंद्र ननावरे सर व श्री राजेन्द्र क्षीरसागर सर यांना ट्रीपचे नियोजन करायला कांबळे मॅडमनी सांगितले.या संयोजक टीमने इतरांशी संपर्क साधून सर्व सहमतीने नियोजन केले.... अन् पिकनिक स्पॉट ठरला.... पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे निसर्गरम्य पर्यटनस्थळ लोणावळा आणि एकविरा माता व कार्ला लेणी....
त्यानुसार आम्ही २५ मार्च रविवारची गोपीमुक्ताची ट्रॅव्हल्स बुक केली.पाणी बॉटल बॉक्स, चॉकलेटं व लेमन गोळ्या इत्यादी साहित्य सर्वांसाठी घेतले.
सकाळी सात वाजता वाईतील गणपती मंदिराजवळ सगळे जमून तद्नंतर लोणावळ्याला निघालो.गाडी खानापूर मार्गे निघाली.तिथं श्री अशोककुमार यादव सहभागी झाले.बोपेगांव मध्ये श्री यशवंत शिंदे व सौ जयश्री शिंदे मॅडम आणि कवठे येथे श्री राजेन्द्र क्षीरसागर सर सहभागी झाले..... खंडाळ्यात श्री रवी ओवाळ सर सहभागी झाले...कोरम पूर्ण झाला.मेणवली केंद्रातील शिक्षक व शिक्षकपरिवार मिळून तीस जणांची एकदिवसीय सहल लोणावळ्याला निघाली.
एकाच केंद्रातील सर्वपरिचय असल्यानेआपोआपल्या मित्रांसमवेत गप्पामारत ,गाणी गातं व टेपवरील गाणी ऐकत चाललो होतो. युनिटी करून सहलीला जायची अन् तेही एकाच केंद्रातील सहकारी शिक्षकांसोबतची पहिलीच वेळ...
खेड शिवापूर जवळील जोशीज् वडे या हॉटेलवर गाडी थांबवून मस्तपैकी आवडीने वडासांबरचा , मिसळपाव व पुरीभाजीचा नाष्टा केला.चहा घेऊन पुढे निघालो.. माझ्या सीटजवळील अशोक यादव सर गोष्ट सांगायला,गाणी म्हणायला लगेच तयार .त्याच्या गप्पागोष्टी ऐकत. ऐकत आमची गाडी म बायपासने नऱ्हे जवळ आली होती..ड्रायव्हरला,' शिरगाव येथील प्रतिशिर्डी मंदिर बघायला जायचं आहे.फाटा आल्यावर गाडी मंदिराकडे घ्या.'अशी सूचना केली.
शिरगाव येथे साईबाबांची प्रतिशिर्डी उभारली आहे... नेमके दुपारी बाराच्या दरम्यान मंदिरात आलो.त्यावेळी आरती सुरू होती.सगळेजण आरतीला थांबलो...श्रध्दा,सबुरी व भक्तिभावाने साईबाबांचे दर्शन घेतले.मंदिर परिसर पाहून तद्नंतर लोणावळ्याला निघालो...
हायवेच्या प्रवासात सर्वत्र गाड्यांचे कर्णकर्कश आवाज ऐकत,सृष्टीतील वृक्षांना फुटलेली नवपालवी पहात, रंगिबेरंगी फुलांची नवलाई बघत ,ग्रीष्माचा चटका सहन करत, बागायती शेतीची हिरवाई बघत बघत
, गप्पा मारत, चेष्टा मस्करी करत आणि आवडत्या गाण्यांना साथ देत मजेत हसत खिदळत अंतर कमी कमी होत होते.
गाडीत पुरुष मंडळी पाठीमागे बसलो होतो.राजकारण, सिनेमा व क्रिकेट या विषयावर गप्पा मारत प्रवास चालला होता.आज शाळा आणि माहिती विषयाला तहकुबी होती.वीक एन्ड व योगायोगाने मार्चएण्ड साजरा करायला सहल नियोजित झाली होती.अशा काही समयसूचकतेने येणाऱ्या प्रतिक्रिया शेअर करत करत मार्गक्रमण सुरू होते.. उन्हाळ्याची धग चांगलीच जाणवत होती.थंड पाणी पिलंकी हायस वाटत होतं.लेमन गोळ्या नाहितर चॉकलेट चघळत मजेत प्रवास चालला होता.काहीजणांची डुलकी लागत होती. गप्पागोष्टी मुळे लोणावळा कधी आले हे समजलेच नाही....गाडी पार्क करून लोणावळ्यात बाजारपेठेत फिरलो.लोणावळा येथील फेमस चिक्कीचा एका स्टॉलवर सॅम्पल टेस्ट केली.मग विविध प्रकारची चिक्की गरजेनुसार खरेदी केली.इतरही वस्तुंचे शाॅपिंग केले.पिस्ता आईसस्क्रीम खाल्ले.तदनंतर एका हॉटेलमध्ये शाकाहारी जेवणाचा आस्वाद घ्यायला गेलो.ऑडर दिल्यानंतर दहा ते तीस मिनिटांच्या फरकाने प्रत्येकाला शाकाहारी भोजन थाळी मिळाली.
तदनंतर लोणावळ्यातील वॅक्स म्युझियमला भेट देण्यासाठी निघालो.हायवेजवळच हे म्युझियम आहे... तिथं जगातील व भारतातील नामवंत व प्रथितयश मिळविलेल्या महानव्यक्तींचे मेणापासून बनविलेले प्रदर्शनिय पुतळे ठेवलेले आहेत.विशेषत:
सुप्रसिध्द अभिनेते, विचारवंत,सामाजिक नेते,खेळाडू,राजकारणी नेते, संगीतकार,गायक, इत्यादी महनीय व्यक्तींचे डेकोरेटिव पुतळे आहेत.म्युझियमला प्रतिव्यक्ती १०० रुपये प्रवेश शुल्क होते.एन्ट्री पास काढून म्युझियम बघायला आत आलो.संपूर्ण म्युझियम वातानुकूलित आहे.
तेथील पुतळ्यांचे बोलके डोळे, चेहऱ्यावरील हावभाव व सुरकुत्या आणि पेहराव पाहुन प्रत्यक्ष त्या व्यक्तिशीच बोलतोय किंवा सहवासात आहे.असं वाटतं .जेम्स बॉण्ड, महात्मा गांधी, सर्वांनी विवेकानंद
पंडित नेहरू,मदर तेरेसा,श्री श्री रविशंकर, मायकल जॅक्सन, ऐ.आर.रहिमान, कपिलदेव, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी वाजपेयी,आण्णा हजारे, शरदचंद्र पवार ,अमरिश पुरी , व इतर अनेक नामवंत व्यक्तिंचे पुतळे बघितले..सोबत फोटोग्राफी केली.मस्तच अनुभव मिळाला.समाधान वाटले.काही नामवंत व्यक्तिंना बघण्याचे स्वप्न हुबेहूब प्रतिकृतीत पुतळे पाहून झाल्याचे समाधान वाटले.
शिक्षकमित्रांनी व भगिनींनी मस्त प्रदर्शन पहायला मिळाल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या.संयोजक टीमचे बहुमोल योगदान लाभत होते.
पूर्वरंग
क्रमशः भाग ५०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com
Best tour
ReplyDelete