माझी भटकंती कोंढावळे मुरा भाग क्रमांक-१५०
माझी भटकंती भाग क्रमांक-१५०
कोंढावळे मुरा
पठारावरील जंगलवाटेने भटकंती
माळ आणि पंचरंगी माती
क्रमशः भाग-५
दिनांक १९ फेब्रुवारी २०२१
जंगलवाटेची काशिनाथने सांगितलेली माहिती ऐकत ,हरभरा फस्त करुन आम्ही घराजवळ आलो.हातपाय धुतलं.फ्रीजसारखं थंडगार पाणी नळाचं होतं.हात गार झाले.मग आमची पंगत घरातल्या ओटीवर बसली.
रथसप्तमी सणानिमित्त पुरणपोळीच्या सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला.काशिनाथचे वडील म्हणाले, गुरुजी आज इथंच मुक्काम ठोका,आणि सकाळी गणेशनगरच्या पुढील कड्याने खाली जावा. मी तत्काळ नकार दर्शविला, नाही नाही म्हणत होतो आणि त्याचवेळी त्यांची मुलं मुक्कामाची आर्जव करीत होते .जेवणानंतर ते अनिकेतला म्हणाले, 'सरांना माळ,काळूबाई मंदिर आणि माडगणीच्या कड्याकडनं फिरवून आणा '….
जेवणानंतर मोबाईल रेंज पाहून घरी फोन केला.आज इथंच थांबून उद्या शाळा करुन घरी येईन असं गुज केलं.तदनंतर किसन माडगणीहून आलेल्या दोस्तांबरोबर त्याच्या घराकडे गेला.जेवणानंतर अंगणात बसलो होतो.त्यावेळी तिथं नेहमीच जंगलात भारा आणायला,मव्हं शोधाय जाणारी कड्याखालील माडगणीच्या पाड्यावरील माणसं येताजाता इथं थांबत असल्याचे दिसून आले.प्रत्येका बाप्याच्या हाती काठी आणि कमरेला कुंगळी होती. कोणं पाणी मागत तर कोणं त्यांच्याशी जंगलातल्या घडामोडी ,पीकपाणी आणि खुशालीच्या गप्पा मारत.तिथं आलेल्या काहींनी माझीही विचारपूस केली.त्यांनाही मी यापूर्वी इकडं आलेलो होतो.हे सांगितल्यावर त्यांनी त्याकाळातील त्यांच्या शिक्षकांची नावं सांगितली.ते शिक्षक सध्या कुठं असतात याची विचारपूस करुन ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास येण्याचं निमंत्रण दिले.
तदनंतर आम्ही तिघेजण त्यांच्या घरापासून दक्षिणेकडील वाटेने माळाला भटकायला निघालो.ढगाळ हवामानात पण पुर्वेचे वरचं वारं अधूनमधून अंगावर येत होते.'याच वाटेने आमच्या गाई चरायला जातात.
त्यांची राकोळी कुत्रा करत असतो.' असे अनिकेत बोलला. ते ऐकून मला नवलच वाटले.मी म्हणालो,'कसं काय?' पुढं तो सांगू लागला,'सर,आम्ही सकाळी सकाळी सगळ्या गुरांना वाटेला लावतो.त्यांच्या बरोबर कुत्रा जातो.आपुण जातोय या वाटेने गुरं कड्यापर्यतच चरत असतात.ती एकत्र उरतात,थोराड गाई वासरांच्या सभोवती कडं करतात'.एकत्र राहतात.कुत्र्याला एखाद्या प्राण्याची चाहूल लागली की तो जोरजोरात भुंकतो. त्याच्या भुंकण्याने गुरं सावध होतात.कुत्रा गुरांचा गुराखी बनून दक्ष रहातो हे ऐकल्यावर प्राणीजीवनाची थोरवी समजली.त्यांच्या गुरांच्या आणि जंगली प्राण्यांच्या वास्तवातील घटनांचे वर्णन ऐकत ऐकत आम्ही एका भुसभुशीत मातीच्या भागात आलो. माती लालसर धुरळ्यासारखी दिसत होती.आजूबाजूला दोन-तीन फुट उंचीचे जांभळे काळसर दगड दिसत होते.
झाडोरा विरळ होता.उताराच्या बाजूला भुसभुशीत माती पाहून रायरेश्वर येथील सप्तरंगाच्या मातीची आठवण झाली.लगेच अनिकेतने काशिनाथला झाडांची मोठाली पाचसहा पानं तोडायला सांगितली.
जवळच्याच झाडांची पाने काशिनाथने तोडली. बारकाईने लक्ष दिले तर वेगवेगळ्या रंगछटेची माती बघायला मिळतेय सर,असं अनिकेत मला सांगू लागला.प्रथमत:मलाही खरेच वाटेना म्हणून मी ही जवळ जावून बारकाईने पाहू लागलो .तर वेगवेगळ्या रंगांची माती दिसत होती.छोटासा तेथील दगड घेऊन त्यावरील तर खरवडले तर वेगवेगळ्या रंगछटा आढळल्या.साधारणपणे पिवळी, पांढरी, लाल, गुलाबी आणि विटकरी अशा पंचम रंगाची माती आढळली.
एक वेगळाच खजिना न्याहाळायला मिळाल्याचे समाधान वाटले.
क्रमशः भाग-५
माझी भटकंती भाग क्रमांक-१५०
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
Comments
Post a Comment