कोकण गोवा भ्रमंती आजऱ्याचा सुवासिक घनसाळ तांदूळ
माझी भटकंती
६ मार्च २०२१
कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती
आजऱ्याचा सुवासिक घनसाळ तांदूळ
क्रमशः भाग-१
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेल्या तळ कोकणातील ऐतिहासिक वास्तूंना भेट देवून अभिवादन करायला निघालो. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या कोकण भूमीत कोणत्याही ऋतूत भटकंती केली तरीही त्याचा आंबा काजू नारळ फणसासारखा रसाळ गोडवा अन्य सोलकढीची मधूर चव ओठावर रेंगाळतच राहते.
नयनरम्य मनवेडे करणारे समुद्र किनारे, सह्याद्रीच्या कुशीत वसलेली नारळी पोफळीच्या बागेत लपलेली वाडी,जांभ्या दगडाची कौलारू घरे,
आकर्षक शैलीतील ग्रामदेवालये आणि कोकणची खासयित चवीची असलेली मस्याहारी खाद्यसंस्कृती तिचा निर्भेळ आनंद घ्यायला चवीनं यथेच्छ खानपान करायला, वेचक वेधक टिपायला मन अधिर झालं होतं.लॉकडाऊनमुळे खंडित झालेल्या कोकण भटकंतीला कधी जातोय असं झालं होतं.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याची खाण असलेल्या सावंतवाडी, वेंगुर्ले ,
मालवण आणि देवगड तालुक्यातील नयनरम्य चौपाटी,मंदिरे ,तलाव आणि सह्याद्रीच्या डोंगररांगेची नवलाई न्याहाळायला , ऋषीतुल्य साहित्यिकांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीने पावन झालेल्या परिसरातील साहित्यिक वारसा जतन करणाऱ्या स्मृतीस्थळांची धूळ मस्तकी लेयाला,सागरी मार्गाने भ्रमंती करायला निघालो.
वाई पाचवड करत लिंबखिंडीतील कुसूम पेट्रोलपंपावर टायर चेकिंग करायला ड्रायव्हरने गाडी थांबवली.
उजवीकडील मागच्या चाकातील हवा चेकिंग करताना टायरपंक्चर असल्याचे हवा भरणाऱ्याने सांगितले.मग तिथंच पंक्चर काढून तदनंतर कराडला प्रस्थान केले.तिथं पाहुण्यांचे आदरातिथ्य स्विकारुन पाचच्या सुमारास गोव्याला मार्गस्थ झालो.
हायवेला गाडीचा वेग वाढत होता.कारण बराच लांबचा पल्ला गाठायचा होता.वाहनांची वर्दळही कमीच होती.कोल्हापूर बायपासने हायवेने निपाणी पुढील डोंगर माथ्यावर आलो.हायवेला गुडबाय करत हाॅटेल कावेरी येथून लेफ्ट घेऊन आम्ही आजरा मार्गे मार्गस्थ झालो.सायंकाळ होवून दिवे लागणीची वेळ झाली होती. गोव्याला जायचं होतं तेही रात्रीचा प्रवास करत.अवेळी जाण्याऐवजी मध्येच सुयोग्य स्थळी आंबोली अथवा सावंतवाडी जवळ थांबण्यासाठी नेटवरुन चौकशी करुन बुकिंग होतयका पहायला मुलाला सांगितले .हल्ली प्रगत तंत्रज्ञानामुळे गुगलमॅपिंग आणि गुगलमुळे पाहिजे शब्द टाईप केले अथवा बोललं की उमटविलेल्या शब्दांची जंत्रीच माहिती, इमेज पुस्तक नकाशे ते युट्यब स्वरुपात येते.फक्त क्लिक करायचा अवकाश सत्वर पाहिजे तो डेटा उपलब्ध होतो.फोन करून संपर्क साधायला सुरुवात केली.
सुमारे तीनएक तासांच्या दीर्घ पल्ल्यात एकसारखी गाडी चालली होती.अंधार वाढतच होता घरगुती गप्पा मारत आजऱ्याला पोहोचलो.
आजरा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील तालुका.
भरपूर पावसाचा भाग ,ज्या भागातील खाण्यासाठी आणि पेहरावासाठी प्रसिध्द आणि सुपरिचित फेमस चीजवस्तू असतात त्या घेण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे तेथील आठवणी स्मृतीत राहतात.जवळच्या दोस्तांना आठवणींची भेट द्यायला उपयोगी पडतात.दोन वर्षांपूर्वी गोव्याला याच मार्गाने जाताना आजरा रस्त्याच्या दुतर्फा खाऊच्या दुकानांसोबत अस्सल स्थानिक आजरा घनसाळ वाणाची तांदुळ विक्रीची दुकाने थाटलेली दिसत होती.हा तांदुळ राज्यभर सुवासिक वाण म्हणून प्रसिद्ध आहे.त्यासोबत लोणची पापड आणि सेंद्रिय गुळ आणि काकवी ,फळे आणि फळांवर प्रक्रिया केलेल्या उत्पादनांची दुकानं पावलोपावली दृष्टित पडलेली होती.त्यावेळी गूळ आणि काकवी खरेदी केली होती.दुकानांच्या पाट्या न्याहळत एक दुकान दिसल्यावर संकेतला गाडी थांबवायला लावली.
आम्ही दोघं खाली उतरून वीसेक पाउलं उलट्या दिशेने लक्ष्मी तांदूळ विक्री केंद्रात गेलो.शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेल्या तांदळाची थेट ग्राहकांना विक्री केली जात होती. अस्सल आणि पारंपरिक वाण घरगुती पद्धतीने बनविलेले असल्याने पर्यटकरुपी ग्राहकांची पावलं वळतात.मला जास्तीत जास्त पाच-सहा तांदळाच्या वाणांची नांव माहित होती.घरी इंद्रायणी अन् बासमती तांदळाचा वापर. पारंपरिक वाणांचे संकरण झाल्याने अस्सल गावरान वाण दुर्मिळ झाले आहेत.
आम्हाला तिथं आजरा घनसाळ या प्रसिध्द नामांकित वाणासोबत इतरही वाणांचे तांदूळ बघायला मिळाले.काहींची नावे नव्याने ऐकायला मिळाली.प्रत्यक्ष वाण (जाती)हातात घ्यायला मिळाले.
घनसाळ,आंबेमोहर,दप्तरी, शुभांगी,
काळाजिरगा,जाडा ज्वारी, रत्नागिरी,बासमती इत्यादी नावांचे तांदूळ उपलब्ध होते.कमी पाॅलीश आणि हातसडीचे इंद्रायणीचे तांदूळ होते.भाताच्या अनेक नवनवीन जातींचा शोध सुरू असताना आजरा घनसाळने आपले पारंपरिकत्व जपले आहे. या भाताला वेगळाचा सुवास आहे .त्याची चव चाखायला आम्ही आजरा घनसाळ आणि हातसडीचा पिवळसर इंद्रायणी तांदूळ खरेदी केला.त्याच विक्रेत्या सोबत तांदळाची माहिती सोबत बोलताना इथं जवळपास जेवणाला चांगलं हॉटेल रोडलाच कोणतं आहे याची चौकशी केली.त्याने फडके वाड्याचे नाव सांगितले,पाचच किमीवर चांगल्या सोयीचं मस्तच हाॅटेल आहे.तदनंतर तांदूळ घेऊन आम्ही पुढं आंबोलीकडे निघालो.
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment