कोकण गोवा भ्रमंती रेडी बेट व मामाभाचा राॅक







कोकण गोवा निसर्ग भ्रमंती ,
 खाद्यसंस्कृती 
वेंगुर्ला तालुका पर्यटन 
 मामाभाचा रॉक,टायगर रॉक आणि बेट(Island) रेडी
दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग-८
मंदिरातील दर्शनानंतर आमची पावलं बीचकडे वळली.हौशी,दर्दी भटकंतीची आवड असणाऱ्यांचीच पावलं  शांत ,रम्य ,नाविन्यता आणि तुरळक पर्यटक असणाऱ्या अशा रेडी बीच कडे वळतात.लालग्या पाऊलवाटेने जात होतो.अथांग दर्यासागराचे निळेशार पाणी पाहून मन तृप्त झाले.समोरच दर्यात दिसणाऱ्या काळ्याभिन्न खडकाने नजर वेधली.लगेचच ते दृश्य मोबाईलमध्ये टिपले.मस्तच तो खडकअजस्त्र माश्याच्या परासारखा दिसत होता. येथील किनारा खडकाळ आहे. एक बोट सफरिंगला किनाऱ्यावरुन निघण्याच्या तयारीत होती.आम्हाला दिसताच बोटमन आमच्याजवळ येऊन बोटिंग करत समुद्रातील स्पाॅट बघायला येताय का? विचारलं,मग काय पत्नीकडे नेत्र कटाक्ष टाकताच तिनं संमती दिली , आणि मग आमची दहा पर्यटकांची बोट मामाभाचा रॉक,
             टायगर रॉक आणि  बेट बघायला निघाली.प्रथम लाईफ जॅकेट परिधान केले.मघाशी फोटोग्राफी केलेला खडक जवळून न्याहाळता येणार याचा मनस्वी आनंद झाला.अगदी वेळ न दवडता बोटिंगची संधी मिळाली. समुद्रसफरीची संधी मिळाल्याने सगळेच खुशीत होते. बोट निळेशार पाणी कापत, खडकाचे आणि आमचं अंतर कमी करत होती.आमच्या बोटमन वजा गाईडने तिथं पोहोचल्यावर मामा भाचा खडकाची आख्यायिका सांगायला सुरुवात केली.
    लांबून दिसणारा एकच खडक प्रत्यक्ष पाहिल्यावर दोन अलग कमी-जास्त आकाराचे खडक होते.ते पाहून खरच नैसर्गिकरीत्या असलेल्या रॉकचे कुतूहल वाटले.
दुरुन एकच भासणारा खडक प्रत्यक्षात दोन वेगवेगळे होते. त्या दोहोंच्या मधून बोटमनने बोट चालवली.अर्वणनीय क्षण होता.सुंदर नजारा अवतीभवती पाण्याची निळाई,मध्येच दोन शिळामधून जाणारी आमची बोट,सुपर सिनरीची भेट झाली.मस्तपैकी त्या मामाभाचा रॉकला सेलिब्रिटी करुन उपलब्ध क्षणात फोटोग्राफी केली.फारच अप्रतिम दृश्य बघितल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होते.आमच्या सोबतच्या बोटीतल्या सहपर्यटकांच्या बोलण्यावरुन ते इचलकरंजी कोल्हापूरचे असावेत हा अंदाज त्यांच्याशी हितगुज केल्यावर खरा ठरला. पहिला स्पॉट पाहून आम्ही टायगर रॉक बघायला मार्गस्थ झालो.
    इथं प्रत्यक्ष जवळून पहायला मिळत नाही कारण बोट तिथं जाणं दुरापास्त होत. खाली खडकाळ पाषाणामुळे बोट चालविण्याच्या अचूक अंदाज येत नाही.त्यामुळं लांबूनच दर्शन होते.गाईड सांगत होता की, वाघाच्या उघडलेल्या जबड्यासारखा खडकाचा आकार आहे.वरचा आणि खालच्या जबड्याचे दोन वेगवेगळे खडक असून वरचा खडक त्यावर येऊन पहुडला आहे.मस्तच लोकेशन बघायला मिळाले.उघडलेला जबडा बघून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांवरील कवन स्फुरते, वाघाच्या जबड्यात घालुनी हात,मोजणी दात ही जात मरह्ट्याची ….
विलोभनीय दृश्य बघून त्यालाच जोडून असलेलं बेट मनमोहक दिसत होते.चारही बाजूंनी समुद्राने वेढलेलं बेट म्हणजे रात्रीच्या नभांगणातील एक तेजस्वी प्रकाशमान चांदणीच दिसत होती.समोरचा किनारा आणि बेटाच्या मधोमध कातळ खडकांचे उंचवटेही दृष्टीपथात येतात.त्याच्या पलीकडे बंदरातून बार्जमध्ये टीपरमधील खनिज रत्नागिरीकडे रवाना केले जाते, अशी गाईडने माहिती दिली.
बोटिंग करुन आम्ही किनाऱ्यावर आलो.

क्रमशः भाग-८
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड