कोकण गोवा भ्रमंती शिरोडा चौपाटी
कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती
वेंगुर्ला तालुका पर्यटन
शिरोडा चौपाटी
दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग क्रमांक-१०
रस्त्यांच्या कडेला असणारी मिठागरे बघत बघत ८किमीवरील शिरोड्यात पोहोचलो.शिरोडा भूमीत
१९३०साली महात्मा गांधींच्या प्रतिसादाला साथ देवून मीठाचा सत्याग्रह स्थानिकांनी करुन स्वातंत्र्यपूर्व काळात इतिहास घडविला होता.शिरोडा चौपाटी अशी पाटी बघून गावातून बीचकडे निघालो.दुपारची वेळ होती.क्षुधाशांतीची वेळ झाली होती.पण सौंदर्य स्थळे बघण्यात मग्नता असल्याने भुकेची तीव्रता जाणवत नव्हती.ग्रामपंचायतीची पार्किंग रिसीट घेऊन आम्ही गाडी पार्क करून बीचकडे निघालो.सर्वत्र मऊशार वाळू चाळणीनं चाळल्यासारखी रुपेरी दिसत होती.
चालताना रेतीत पाय रुतत होते.सभोवताली आकाशाशी स्पर्धा करणारे उंचचउंच मोठमोठाली सुरुची झाडं होती.त्यांच्या सावलीत चालताना वेगळीच मजावाटत होती.अथांग दर्या, लांबसडक दिसणारा किनारा अन् किनाऱ्यावर येऊन फुटणाऱ्या सफेद लाटा ,समोर दिसणारा निळा दर्या बघण्याची मजा काही औरच असते.
याच सागरकिनारी जेष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकरांनी बहुविध ग्रंथसंपदेचे लेखन केले.अनेक अक्षरशिल्पे रेखाटली.इथचं गावातील सामाजिक वास्तवाचे लेखन कथा,कादंबरी आणि लघुनिबंधाचे केले आहे. लेखनाच्या विषयाचा आशय इथंच सूचलाही असेल अन् लेखणीबध्द झाला असेल.तीच ही नीरव शांततेची आणि लेखनास उद्युक्त करणारी शिरोडा चौपाटी त्यामुळेच भाऊसाहेब खांडेकर शिरोडा गावास आपलेपणाने माहेर मानतात.भाऊसाहेबांचे शिरोड्यातील वास्तव्य सन १९२०ते १९३८ पर्यंत अठरावर्षे होते."माझ्या सर्व जीवनस्मृती चिमुकल्या शिरोडा गावात गुंफल्या आहेत.",असे ते आवर्जून सांगतात.तिथून दूरवर सागरातील रेडी बीचवरुन फेरफटका मारताना पाहिलेला टायगर राॅक आणि बेट दिसत होते.मस्तच नजारा बघायला मिळाला.
अशा प्रेक्षणिय स्थळी निवांतपणे भटकायला मजाच येते. दर्यावरील लाटांचे तरंग आणि ऐकू येणाऱ्या गाजेच्या आवाज चिरकाल स्मरणात राहतो.खरचं फारच सुंदर दृश्ये चौपाटीवर बघायला मिळाली.
छानपैकी वेचक वेधक फोटो टिपून ऋषितुल्य गुरुवर्य ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रतिभावान साहित्यिक आदरणीय वि.स.खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकरांच्या कर्मभूमीतील जतन केलेल्या स्मृतीस्थळी अभिवादन करायला निघालो.
पार्किंग कर वसूल करणाऱ्यास विचारले,
'वि.स.खांडेकरांचे स्मृतीसंग्रहालय कुठं आहे? ' 'गावाच्या पुढे गेल्यावर उजवीकडील रस्त्याच्या पलीकडे शाळा आहे .त्याच शाळेत आहे.'असं त्याने सांगितले मग त्याप्रमाणे चौकशी करत शाळेजवळ पोहोचलो.
क्रमशः भाग-१०
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com
Comments
Post a Comment