माझी भटकंती कोंढावळे मुरा जंगलवाट भाग क्रमांक-१४८





कोंढावळे मुरा 

      जंगलवाटेने भटकंती

दिनांक १९ फेब्रुवारी २०२१

क्रमशः भाग-३

दाऱ्यातून  कड्यावरील जंगलपठारावर आलो.सभोवताली विहंगम नयनरम्य परिसर दिसत होता.

स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवा.एका झुडूपावर दोऱ्यांच्या गुंड्यासारखे गुंडाळलेले गोल गोल कापसाचे पुंजकेच  झाडाला लगडलेले दिसत होते.खूपच वेगळी नजाकत बघायला मिळाली.

दाऱ्यातून सगळीकडे समांतर दिशेला रायरेश्वर डोंगराची रांगेवरील रायरेश्वर, केंजळगड,

पांडवगड आणि जांभळीच्या खोऱ्यातील वळकी नदीचे म्हणजेच धोम धरणाचे पाणलोट क्षेत्र नजरेला पडत होते.पायथ्याशी असणारी गावं आणि शेतीचे हिरवाईचे चौकोनी आकार आणि उठावदार झाडांचे पुंजके दिसत होते.

आता आम्ही गर्दछायेच्या जंगलातून पुढे पाचोळ्याच्या वाटेने निघालो.सगळीकडे मोठाल्या वृक्षाचे अक्राळविक्राळ विविधांगी आकार आणि त्यात गुंतलेल्या वेढलेल्या वेलींचे वेटोळे दिसत होते.पायाखाली पाचोळा तुडवत दोन्हीकडे करड्या रंगांच्या फांद्या आणि वेली अन् पर्णिका बघत तर वर हिरव्यागार पानापानांतून आकाशाचा माग काढत पुढचं अंतर कापत होतो.

मोठाल्या फाद्यांचे आकार बघून त्यावर बसायला,चढायला आणि झोका घ्यायला मन बागडायला अधिर झालं होतं.

फोटोग्राफी टिपायला बहारदार वृक्षवेलींचे सौंदर्य खुणावत होतं.मस्तपैकी विविध पोजमध्ये मनसोक्त फोटोग्राफीचा आनंद घेतला.दोन वर्षाच्या  प्रदीर्घ कालावधीनंतर आज जंगलसफारीची भटकंती करायला मिळत होती.चंद्रमौळी झोपडीत जसा प्रकाशाचा कवडसा दिसतो तसं आज घनदाट वृक्षांमुळे पानांपानांतून प्रकाशाचे कवडसे दिसत होते.त्यातच वाऱ्याची भरारी आली की तनमनाला थंडाई स्पर्शून जाई,पानापानांची सळसळ वाढे,तुडवत चाललेल्या पाचोळ्याचा वेगळाच नाद तर अचानक पक्ष्यांचे अनोळखी आवाज कानी पडत होते.झाडवेलींचे वेगळेच आकार मनाला भुरळ घालीत होते.मनसोक्त करण्यातील जैवविविधतेचे आणि झाडोऱ्याचे वाचन आणि निरीक्षण करत ही वाट संपून कधी एकदा काशिनाथचं घर दिसतयं असं झालं होतं.मनात जंगलीश्वापदांची असणारी भीतीही मुलांशी संवादीत करत होतो.आपल्या या वाटेला माकडं आणि वानरंच दिसतील. साधारणपणे दीड दोन किलोमीटरवर जंगलवाट तुडविल्यानंतर घरं आणि शेतजमीन दृष्टीला पडली.गव्हाची काढणी करुन पेंढ्या रचून ठेवलेल्या होत्या.खळं शिंपण्याचं काम चालू होतं.जनावरांपासून पिकांची राखण करायला उपलब्ध साहित्याचा माळा तयार केला होता.कौलारुघर, राख आणि शेणानं सारवलेल्या भिंती आणि शेणानं सारवलेलं अंगण लखलखीत दिसत होतं.सभोवती जंगलव्याप्त परिसराच्या मधील शेतजमीन साड्यांलावून सीमांकित केली होती.जंगली जनावरं भिववण्यासाठी माळा उभारला होता आणि ठिकठिकाणी फुटके डबे आणि बाटल्या झाडाझुडुपांना टांगलेल्या होत्या.हवेच्या आवेगावर त्यांचा आवाजाचा चढ उतार होत होता.काढलेल्या गव्हाच्या वावरातूनच वाट काढीत दर्शनाच्या घराजवळ आलो.आत जावून किशनने किटली ठेवून तांब्याभरुन पाणी आणले.थंडगार पाणी घोटभर म्हणता पोटभर पिले.त्यांच्या घरात दोन छोटी मुलं आवाजाची चाहूल घेत बाहेर आली.'आतील बाईनं गुरुजी चहा पिवून जावा.चहा करते.' अशी अगत्याने पाहुणचाराची हाक दिली.मीच उशीर झालाय म्हणून नम्रपणे नकार देवून त्या मुलांच्या हातात बिस्किटपुडा ठेवला.त्यांच्या समवेत सेल्फि काढली आणि जंगलवाटेने पठारावरील काशिनाथच्या घराकडे मार्गस्थ झालो. 

यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.

https://raviprema.blogspot.com



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड