कोकण गोवा भ्रमंती शिरोड्याचे अक्षरशिल्प
कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती
वेंगुर्ला तालुका पर्यटन
ऋषितुल्य गुरुवर्य साहित्यिक वि.स. खांडेकर स्मृतीस्थळ
दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग क्रमांक-११
गुरुवर्य वि.स.खांडेकर विद्या प्रतिष्ठान संचलित गुरुवर्य अ.वि.बावडेकर विद्यालय, शिरोडा शाळेच्या गेटजवळ पोहोचताच दोन शिक्षक दुचाकी वरून बाहेर निघाले होते.त्यापैकी एकाकडे स्मृतीस्थळा विषयी चौकशी केली.त्यांनी लगेच शाळेच्या कार्यालयात जावून संबंधित पर्यवेक्षक आणि शिपायास बंद असलेलं संग्रहालय उघडण्यास सांगितले.आम्ही भाऊसाहेबांची दुर्मिळ ग्रंथसंपदा बघण्यास आतुर होतो.नियोजित केलेले स्मृतीस्थळ बघायला मिळणार याच औत्सुक्य होतं.सन २०१५ ला या शाळेस शतक पूर्ण झाल्याने शाळेची सुविधायुक्त प्रशस्त देखणी इमारत रस्त्याला लागूनच होती.पूर्वाश्रमीच्या ट्युटोरियल विद्यालयात गुरुवर्य अ.वि.बावडेकरांच्या साथीनं भाऊसाहेब तथा वि.स.खांडेकर सहशिक्षक ते मुख्याध्यापक होते.
थोड्यावेळाने शिपायाने स्मृतीस्थळ उघडून दिले.एका स्नेहबंधू शिक्षक मित्राने स्वागतकक्षात येऊन ,'कुठून आलात ,कुणी माहिती दिली ?आपण कसे आलात ?आपण कोण आहात ?:अशी चौकशी केली.मी ही सर्वांची शांतपणे उत्तरे दिली. निमित्त होते माझे प्रेरणास्थान शिक्षक पत्रकार मित्र श्री सुनील शेडगे सरांनी शिरोड्याचे अक्षरशिल्प हा लेख नोव्हेंबर लिहिला होता.तो वाचतानाच मी मंत्रमुग्ध झालो होतो.
त्याचवेळी भविष्यात गोव्याला भटकंतीला गेलो की आवर्जून स्मृतीस्थळाला भेट देण्याचा मनोनिग्रह केला होता.तदनंतर सदरशिक्षकाने मोबाईल मध्ये शूट न करण्याचे आणि फोटोग्राफी न करण्याचे नम्रपणे आवाहन केले. अभिप्राय देण्याची सुचना करुन ते मार्गस्थ झाले.मला जाताना देणगी पावती आणि स्मरणिका भेट पर्यवेक्षकाकडून आठवणीने घ्यायला सांगितले.
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ऋषितुल्य प्रतिभावंत साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्यामुळे या शाळेचा नावलौकिक पसरलेला आहे.त्यांच्या ग्रंथसंपदेच्या स्मृतींचे जतन शाळेतच संग्रहालय स्वरुपात केले आहे.खरोखरच अप्रतिम स्वरुपात त्यांच्या गाजलेल्या कथा कादंबऱ्या,पटकथा आणि चित्रपटांचे मुखपृष्ठ प्रदर्शित केले आहेत.त्याची मांडणी चित्ताकर्षक आहे.त्यांच्या कथा कादंबरीतून जीवनाचे दर्शन घडून समाजभान व आत्मभानाचे अनेक पैलू उलगडतात.लेखनाच्या चिंतन स्थळांची चित्रे रेखाटली आहेत.समुद्रकिनारा,भिके डोंगरीची टेकडी,सुरुची बाग इथं त्यांची ग्रंथसंपदा लेखनीबध्द झाली.भाऊसाहेबांनी शाळेत असताना वापरलेल्या कपाट,टेबल, खुर्ची आणि स्टूल इत्यादी वस्तू आहेत.मिठावरील कर मोजणारी अर्धामण आणि मण प्रथमतःपहावयास मिळाली.
त्यांच्या साहित्यातील वेचक आणि वेधक विचारधन वेचे आपली दृष्टी वेधून घेतात.या स्मृतीतील दुर्मिळ समर्पक चित्र, पत्रे, छायाचित्रे,अक्षरंशिल्प आणि वस्तूतुन त्यांच्या जीवनपटाचा उलगडा होतो.
आयुष्यवाटा,वळणे आणि निर्णय हे शब्द आपणाला त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकतात.तिथं एक छोटेखानी व्यासपीठ असून तिथं शुटिंग कॅमेरा,स्पाॅट लाईटचा दिवा आणि हंस पिक्चर्सचे पोस्टर आपली नजर खिळवून ठेवतात.त्यांनी साक्षांतील केलेली पगारस्लिप आणि विद्यार्थी हजेरीपट आपली नजर वेधते.विद्यार्थी हजेरीपट ते सिनेमा पटकथांवर त्यांच्या अक्षरांची मोहोर उमटलेली आहे.स्मृतीतील वस्तुंचे जवळून अवलोकन करता आले.खरोखर पाहताना धन्यता वाटली.गुरुवर्य प्रतिभावंतांच्या आठवणींचा अनमोलठेवा संग्रहालय स्वरुपात जतन करून ठेवला आहे. हे नव्या पिढीला प्रेरणादायक आहे.इथंच शिक्षण झालेले जेष्ठ साहित्यिक सुप्रसिद्ध लेखक,नाटककार ठणठणपाळ या नावाने विनोदी लेखन करणारे श्री जयवंत दळवी याच शाळेचे विद्यार्थी होते, साहित्य क्षेत्रात लेखक म्हणून मान्यता मिळवायची असेल तर कांदबरी लिही असा सल्ला साहित्यिक भाऊसाहेब खांडेकरांनी कथालेखक जयवंत दळवी यांना दिला होता.याच भूमीत बहुविध साहित्यिक घडले. निसर्गसौंदर्याचा लौकिक असलेली चौपाटी आहे.
शतकमहोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित केलेली स्मरणिका घेऊन शिरोड्याच्या शिल्पास अभिवादन करुन पुढे वेंगुर्ल्याकडे मार्गस्थ झालो.
क्रमशः भाग-११
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com
Comments
Post a Comment