माझी भटकंती कोंढावळे मुरा टोंगचीवाट भाग क्रमांक-१४७
कोंढावळे मुरा
टोंगवरची रानातली पाऊलवाट
क्रमशः भाग-२
टोंगवरची वाटही खडकाळ दगडाची निसरडी आणि उंचपुऱ्या पिवळ्या गवतातून जाणारी नागमोडी वळणाची होती.दम लागत होता.आजुबाजूचा विहंगम, नयनरम्य परिसर न्याहाळत पुढं सरकत होतो. थोडासा विसावा म्हणून वाटेवरच्या उंबराच्या झाडाखाली बसलो.झाडाच्या शेंडक्यात व एकाच बाजूकडे पालवी दिसली तर जमिनीलगतच्या फांद्या डहाळी व पर्णहीन होत्या. बारकाईने त्यांचे निरीक्षण केल्यावर त्या फांद्यांचे ओबडधोबड आकार पशुपक्ष्यांचे दिसले.मस्तच नजारा फांद्यांचा दिसत होता.तदनंतर टोंगवर पोहोचलो. कड्याखालील गवत व झाडोऱ्याचा भाग,पुढे दोन वाटा फुटलेल्या होत्या.डावीकडील माडगणीला तर उजवीकडील कड्याखालून पश्चिमेला जाणारी होती. आम्ही पश्चिमेच्या मळलेल्या लालसर वाटेने पुढं जात जनावरांच्या पाऊलखुणा न्याहाळत एका झऱ्याजवळ पोहोचलो.लगेच काशिनाथने ओणवे होवून तोंडलावून झऱ्याचे पाणी पिले.हाताला स्पर्श होताच पाणी फ्रीजसारखे जाणवले.झरा उंबराच्या झाडाखाली खडकात होता.त्याच्यापुढे दहा-पंधरा फुटावर दगडमातीचा बांध घालून डबके बनविले होते.त्या पाण्याचा उपयोग रानातील गुरे व श्वापदांना होत असल्याच्या पाऊलखुणा दृष्टीस पडल्या.
'सर, पावसाळ्यात या झऱ्याला भरपूर पाणी असतं,ओढ्यावाणी जोरात पाणी कड्यातनं खाली जातं.तोच धबधबा आपल्याला शाळेपासून दिसतो.
'काशिनाथ ही सुचक माहिती देत पुढं . म्हणाला,सर वाऱ्याचा वेग वाढला की पाणी खाली न जाता उलटं उडतं ते तुषार पडल्यासारखे दिसते.
कड्याखालच्या सपाटीला लालसर धुरळ्याच्या वाटेने चालत निघालो.इथंली कड्याखालची जमीन गावातील लोकांची झाडोऱ्याची गवताळ आहे.गुरं राकोळी पोरांचं छोटेखानी क्रिकेटचे मैदान दिसलं. तिथं दिसलेल्या स्टंपा,दीडबॅटच्या जागेवर पडलेलं खड्डे ,पिचवरली माती, दोन्हीकडील दगड आणि बॉंडरीवर उभारलेले दगड इत्यादी खुणां स्पष्ट दिसत होत्या.इथं कधीतरी खेळायला आलेली आणि सहभागी असलेल्या दोघांनीही या मैदानाची सविस्तर माहिती देऊन हातातल्या काठीची बॅट करुन सराईतपणे हवेत टाकलेला चेंडू लीलया भिरकाविण्याची सुपर अॅक्शन केली.ती लगेच मी मोबाईल मध्ये बध्द केली.दुर्गम भागातील वाडी वस्तीपर्यत आवडत्या क्रिकेट खेळाचा प्रसार झालेला पाहून समाधान वाटले.लहानापासून मोठ्यांपर्यंत हा खेळाची आणि खेळाडूची क्रेझ आहे. त्याच वेळी माझ्या मनात ओझर्डे येथील मराठी शाळेच्या मैदानावरील क्रिकेट खेळाची दृश्ये डोळ्यासमोर तराळू लागली.त्याचा आनंद घेत लाल पायवाट संपून झाडोरा आणि गवतातील अनवट वाटेने आमची पावले सावकाशपणे खालीवर आणि बाजूचा परिसर न्याहाळत पडत होती.'सहसा या वाटेने मुऱ्हयावरची लोक ये-जा करीत नाहीत.कारण माडगणी येथील कड्यातली वाट सोपी आणि पायऱ्यांची असून वर्दळीची असल्याचे दोघांनी सांगितले.आमी नेहमी तिकडूनच जातो.इथं या वाटेला जनावर चरायला असतात.दाऱ्यातली दगडी पाण्यानं आणि गवतानं शेवाळतात.
गवतातून पुढं काही दिसत नाही त्यामुळे आमची माणसं माडगणीच्या वाटेनेच ये-जा करायला लावतात,'असं काशिनाथ म्हणाला,' सर , तुम्ही म्हणाला या दाऱ्यानं जायचं म्हणून हिकडणं जातूय.'असे म्हणत तोही वाटेवर तोंडापुढं येणाऱ्या झाडांच्या डहाळ्या आणि गवत काठीनं बाजूला करत होता.त्याच्या मागं किसन आणि त्याच्या मागं मी अंतर कापत होतो.गारवा चांगलाच जाणवत होता.वाटेतल्या मोहरलेल्या आंबुळक्या आणि करवंदाच्या जाळ्या दोघं मला दाखवून ,सर सेल्फि काढा असं सांगत.मग सेल्फि काढत पुढे सरकत असू.एकदाचं आम्ही दाऱ्यात पोहोचलो.दोन्ही बाजूच्या कातळावर वाळलेलं गवत वाऱ्याच्या भरारीवर डुलत होतं.तर उंचावलेल्या गवताच्या ठोंबड्याची वेगळीच नजारा दिसतो होता.
कातळातीलच ओबड धोबड पायऱ्या चढून कड्यावरील जंगलव्याप्त परिसराच्या आरंभी आलो. मस्तपैकी विविध पोजमध्ये मनसोक्त फोटोग्राफी केली.भेटूया उद्या जंगलवाटेने मनसोक्त फिरायला….
क्रमशः भाग-२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
माझी भटकंती भाग क्रमांक-१४७
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment