कोकण गोवा भ्रमंती वेंगुर्ला चौपाटी
कोकण गोवा निसर्ग भ्रमंती , खाद्यसंस्कृती
वेंगुर्ला चौपाटी पर्यटन
दिनांक ८ मार्च २०२१
क्रमशः भाग क्रमांक-१२
ऋषितुल्य प्रतिभावंत साहित्यिक वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालयील साहित्याचा अनमोल दुर्मिळ ठेवा पाहून मन तृप्त झाले.नियोजित मनोनिग्रह पूर्ण झाला.आम्ही आता ३७ किलोमीटरवर असणाऱ्या वेंगुर्ला नगरीकडे समुद्रकिनारा मार्गाने चाललो होतो.हा समुद्रमार्ग विजयदुर्ग पर्यत जातो.आता खरी भुकेची जाणीव झाली होती मघाशी शिल्प बघायच्या तंद्रीत भुकेकडे जणू कानाडोळा केला होता.पण आता धीर सुटत होता,अधिरता वाढली होती.कधीएकदाचं हॉटेल दिसतंय याची वाटच बघत होतो.अर्ध्यातासाने शहराच्या अलिकडेच दोन-तीन हॉटेल दृष्टिस पडली.त्यातीलएका भोजनालायाकडे सत्वर गेलो.भिंतीवरील मेनू बोर्ड मनात वाचून दोन सुरमई थाळी आणि एक आमरसासह शाकाहारी थाळीची आॅडर दिली.तिथला मेनूबोर्ड पाहून मनातल्या मनात हास्य उमटले.सुरमई थाळी, पापलेट थाळी,बांगडा थाळी,कोळंबी थाळी,
तिसऱ्याची थाळी आणि शाकाहारी भोजनथाळी असं लिहून त्यापुढं बरोबर आणि चूक अशी चिन्ह काढली होती.बरोबर चिन्ह आजची थाळीची उपलब्धता आणि फुलीचे चिन्ह अनुपलब्धता दर्शवित होतं.साडेतीन चारचा सुमारास भोजनालये बंद होण्याची वेळ त्याच वेळी आमचं खानपान होतं.थाळी येईपर्यंत बोलणार तरी काय?भरल्यापोटी काहीही सुचतं, त्यामुळे तिघही गप्पगार भोजन कधी येतय याची वाट बघत होतो.तिथं हातातल्या बोटावर मोजता येईल एवढेच खवय्ये होते.दोघांचे भातावर आलेलं तर तिघं वाटबघे.आॅडर ,वेटर आणि कॅशिअर अशा तिहेरी भूमिकेत एकच जेष्ठ व्यक्ती दिमतीला हजर होती.मच्छी परतल्याचा खमंग वास दरवळत आला, त्यामागोमाग दोनच मिनिटात आमची थाळी टेबलवर हजर.मग काय पटापट घास घ्यायला सुरुवात झाली.चमचमीत जेवण भुकेच्या तडाख्यात हादडत होतो. सुरमईचा तळहातापेक्षा मोठा तळलेला पीस आणि मऊशार गरमगरम चपाती आणि माश्याचे मालवणी पद्धतीचे कालवण.मस्तच स्वादिष्ट भोजनावर यथेच्छ ताव मारला.भुकेने कासावीस झालेला जीव उदरभरणाने तृप्तीचे ढेकर देवू लागला.
काहीवेळाने बंदराचा मार्ग विचारुन आमची गाडी बंदराकडे वळली. जगप्रसिध्द क्रिकेटपटू लिटील मास्टर या नावाने ओळखले जाणारे सुनील गावसकर यांची नगरी तर साहित्य अकादमीचे पारितोषिक विजेते विद्याविभूषण जेष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांची जन्मभूमी वेंगुर्ला.मराठी साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अवीट गोडीची श्रवणीय गाणी,'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,
शुक्रतारा मंदवारा, भातुकलीच्या खेळात नवी राजा आणिक राणी 'यांचे गीतकार कविवर्य मंगेश पाडगावकर यांची जन्मभूमी.
वेंगुर्ला हे शहर पूर्वी व्यापारी बंदर होते.मुंबई व गोवा मार्गावरील महत्त्वाचे बंदर होते.तसेच पूर्वी सागर किनाऱ्यावर पोर्तुगीज,डच आणि इंग्रजांच्या वखारी होत्या.त्यापैकी डचांची तटबंदीयुक्त वखार केवळ वेंगुर्ल्यात आहे.नैसर्गिक टेकडीजवळच हे बंदर आहे.
टेकडीवर दीपगृह आहे.या बंदरातून सुर्योदय आणि सुर्यास्ताचे दर्शन करायला रमणीय प्रेक्षणिय ठिकाण.
आकाशातील रंगांची मुक्त उधळण आणि दर्याचा अथांग सागरासमवेत सुर्याचं चैतन्य दीप बघण्याची मजा काही औरच वाटते.बंदरावर बोटींना लागणारं गरजेचं साहित्य चढविण्यासाठी प्रवेशमार्ग.
बघताना बोटी बंदरावर येऊन माल कसा भरलाउतरला जातो याची माहिती समजते.सागरात लांबवर मोठाल्या बोटींच्या कडेकडे लहानशा बोटीही दृष्टीत पडत होत्या.
बंदराच्या समोरील पांढऱ्याशुभ्र रेतीवर बसलेला समुद्री पक्षांचा थवा फारच छान दिसत होता.काही वेळात मुक्त संचारुन रेतीवर येत होता.सुंदर दृश्य.इथं कोकण कृषी विद्यापीठाचे काजू संशोधन केंद्र आहे.
तसेच खवय्येगिरीत केवळ इथंच चौकोनी पाव मिळतात.अस्सल कोंकणी चाकरमानी चौकोनी पाव उसळ,भजी आणि कट चहाचा आस्वाद घेणारच्.अशी इथल्या पावाची खासियत आहे.तदनंतर आम्ही नारळी पोफळीच्या बागेतून प्रवास करीत दर्याच्याअथांग जलाशयाची निळाई बघत,अस्ताला जाणाऱ्या दिवाकराचे झाडोऱ्यातून प्रकाशमान दिसणारं रुप मनात साठवत५०किमीवरील मालवणला सागरी महामार्गाने प्रस्थान केले.वाटेतल्या कर्ली नदीच्या पुलावरून खाडीआणि नदीची सायंकाळची रम्यदृश्ये टिपली.एका नारळाच्या झाडासवे निसर्गाच्या देखाव्याची छबी कॅमेऱ्यात बध्द केली आणि पुढं मार्गस्थ झालो.
क्रमशः भाग-१२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या कविता आणि लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://ravipreama.blogspot.com
Comments
Post a Comment